दबाव झुगारून तरुणपिढी सीमालढ्यात
प्रकाश मरगाळे यांचे प्रतिपादन : हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मानले आभार
महाराष्ट्र एकीकरण समितीचे बळ वाढल्याने महामेळावादेखील यशस्वी करण्याचा निर्धार
प्रतिनिधी/ बेळगाव
1 नोव्हेंबर रोजी काळ्यादिनानिमित्त आयोजित सायकल फेरीनंतर मराठा मंदिर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, युवानेते आर. एम. चौगुले, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, रणजित चव्हाण-पाटील उपस्थित होते.
महामेळावा होणारच
सायकल फेरी यशस्वी होऊ नये, यासाठी प्रशासनाने आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. परंतु, तरीही शनिवारी हजारोंच्या संख्येने सीमावासीय फेरीमध्ये सहभागी झाले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे बळ वाढले असून महामेळावादेखील यशस्वी करणारच, असा निर्धार प्रकाश मरगाळे यांनी बोलून दाखविला.
कार्याध्यक्ष मनोहर किणेकर म्हणाले, सीमालढ्यामध्ये आता पाचवी पिढीही सहभागी झाल्याचे चित्र फेरीमधून पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील शिवसेनेचे पदाधिकारी फेरीमध्ये सहभागी होणार होते. परंतु, त्यांना कोगनोळी टोलनाक्याजवळ अडविण्यात आले. सीमावासियांवर झालेल्या अन्यायाविरोधात केंद्र सरकारचा निषेध फेरीमधून केला जातो. मागील काही वर्षांत बेळगावमधील मराठी भाषा संपविण्याचा घाट प्रशासनाने घातला असून त्याला मराठी भाषिकांनी आजवर सडेतोड उत्तर दिले आहे.
सरकारी कार्यालयांत मराठी फलक लावा
शहरातील रस्ते, गटारी यांची अवस्था दयनीय झाली असताना महानगरपालिका मात्र मराठी व इंग्रजी फलक हटविण्यामध्येच धन्यता मानत आहे. कन्नड वाढवा, असा आदेश असताना मराठी पुसा असा कुठलाही आदेश नाही.
त्यामुळे कोणीही मराठी फलक काढण्यास आले तर त्यांनी तात्काळ म. ए. समितीशी संपर्क साधावा. आधी सरकारी कार्यालयांवर कन्नडसह मराठीमध्ये फलक लावा आणि नंतरच दुकानांवरील फलकांना हात लावा. जसे दुकानांवर 60 टक्के कन्नड व 40 टक्के इतर भाषा लिहिण्याची सक्ती आहे. तशीच सक्ती प्रथमत: सरकारी कार्यालयांनाही करा, अशी तंबी किणेकर यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूनेच
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा खटला सुरू आहे. 21 जानेवारी 2026 रोजी खटल्याची सुनावणी होणार असल्याने मराठी भाषिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या घडामोडी पाहता सीमाप्रश्नाचा खटला हा मराठी भाषिकांच्याच बाजूने लागेल, असा ठाम विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच हा काळादिन सीमावासियांसाठी शेवटचा ठरो, अशी मागणी परमेश्वराकडे करण्यात आली.
महिलांची समर्थ साथ...
काळ्यादिनाची निषेधफेरी शनिमंदिरकडून थेट पोस्टमन सर्कलपर्यंत जाण्याची सूचना पोलिसांनी केली. परंतु, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रणरागिणींनी पोलिसांना न जुमानता ताशिलदार गल्लीत प्रवेश केला. त्यामुळे काहीकाळ पोलीस व म. ए. समितीच्या नेत्यांमध्ये वादावादी झाली. परंतु, महिलांनी नेतृत्व घेतल्यामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली आणि ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली या परिसरात फेरी निघाली. त्यामुळे या महिला रणरागिणींचेही सभेमध्ये कौतुक करण्यात आले.