सर्वात तरुण अब्जाधीश निखिल कामत
भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश निखिल कामत यांची सध्या जोरदार चर्चा आहे. कोणत्याही क्षेत्रात कष्ट करण्याची धमक असेल तर यश लोटांगण घालत तुमच्या नशिबी येते. हे अनेकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. आज आपण अशाच एका अवलियाची यशोगाथा जाणून घेणार आहोत. जो कधीकाळी प्रतिमहिना आठ हजार रुपयांवर काम करत होता मात्र आज करोडो रुपयांच्या कंपनीचा मालक बनला आहे.
एका साध्या कुटुंबातील निखिलने अपार कष्ट करून आणि आपल्या कल्पकतेने तो आज देशातील सर्वात तेजस्वी गुंतवणूकदार बनला आहे. काही मुला-मुलींना शिक्षणात खास रस नसतो. पण तरीही आपल्या आवडत्या क्षेत्रात, मेहनतीने ते यशस्वी होतात. अशीच कहाणी निखिल कामत यांची आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी औपचारिक पदवी असणे आवश्यक नाही याचा पुरावा म्हणजे उद्योगपती निखिल कामत. जीवनात औपचारिक शिक्षणाचा अभाव असेल तर आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने आपले स्वप्न पूर्ण करता येते. उद्योगपती निखिल कामत आणि त्याचा मोठा भाऊ नितीन कामत आता झिरोधाचे मालक आहेत. झिरोधा ही एक फिनटेक कंपनी आहे, जी यावर्षी 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमावणारी ठरली आहे. औपचारिक शिक्षणाअभावी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की निखिल कामत यांनी शाळा सोडली होती कारण त्यांना शाळेत जाणे अजिबात आवडत नव्हते.
निखिल यांनी वयाच्या 14 व्या वर्षी फोन विकायला सुरुवात केली, ज्यामुळे त्यांच्या आईला खूप राग आला आणि तिने सर्व फोन टॉयलेटमध्ये फेकून दिले होते. निखिल कामतला अभ्यासात रस नसल्यामुळे शाळा व्यवस्थापनही खूप नाराज होते. शाळेने त्यांना दहावी बोर्डाच्या परीक्षेला बसू दिले नाही. यानंतर कामतने शाळा सोडली. झिरोधाच्या संस्थापकाने आपल्या व्यावसायिक करिअरची सुरुवात एका कॉल सेंटरमध्ये काम करून केली. जिथे त्यांना दरमहा 8000 रुपये पगार मिळत होता. केवळ चौदाव्या वर्षी जेव्हा निखिल कामत यांनी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनी त्यांना अनेक सल्ले दिले असतील. आज तब्बल 20 वर्षांनंतर 34 व्या वर्षांच्या बंगळूरूमधील उद्योजकाने देशातील सर्वात तरुण अब्जाधीशाचे मानांकन पटकावले आहे. निश्चितच निखिल यांच्या यशाने हे दाखवून दिले आहे की त्यांचे हे मार्गक्रमण म्हणजे एक नियोजित धाडस होते जे फायदेशीर ठरले. परंतु त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या अनुभव कथनात ते म्हणतात की, मित्रांना पुढे जाताना पाहताना माझी ध्येयनिश्चिती अजून झालेली नसल्याने भीती वाटायची.
पदवी नसल्याने आपल्याला कोणी नोकरीवर घेणार नाही हे समजल्यावर त्यांनी आपल्या वयाच्या पाच वर्षांपासून खेळत असलेल्या बुध्दिबळ खेळालाच पैसे कमवण्याचे साधन बनवले. अनेक सामने खेळल्यानंतर त्यांना हे समजून चुकले की, आपण या क्षेत्रात म्हणावे तितक्या उंचीपर्यंत जाऊ शकत नाही व त्यातून आपला चरितार्थही होणार नाही. अनेक व्यवसाय कल्पनांवर नशीब आजमावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. निखिल कामत यांनी 2005 नंतर स्वत:चं काहीतरी सुरू करायचं या हेतूने स्वत:चा सल्लागार व्यवसाय सुरू केला. पुढे 2010 मध्ये जेव्हा ‘एनएसई’ ने फ्री ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लाँच केले, तेव्हा नितीनला झिरोधा सुरू करण्याची आयडिया आली. हीच एक आयडिया नितीन कामत आणि निखिल कामत या दोघा भावांचे आयुष्य बदलून गेली. 17 व्या वर्षी अनेक व्यवसाय करताना बंधू नितीन कामतसोबत ट्रेडिंग सुरू केले. ज्यात असे अनुभव आले की, किरकोळ गुंतवणूकदारांना ब्रोकरेजसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क द्यावे लागते. यातून शिकवण घेत त्यांनी 2010 मध्ये देशातील पहिली ऑनलाइन डिस्काऊंट ब्रोकरेज झिरोधा नामक कंपनी सुरू केली. कोणत्याही जाहिरातीविना मिळवले एक यशस्वी स्थान. केवळ पाच लोकांना हाताशी घेत सुरू केलेली ही कंपनी आता देशातील सगळ्यात मोठी कंपनी बनली आहे. तर 5 अब्ज ट्रेड्स दररोज नोंद होतात. इतकेच नव्हे तर निखील आणि त्यांचे बंधू नितीन यांना फोर्ब्जच्या देशातील सर्वाधिक 100 श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. निखील यांच्या मते त्यांनी हे स्थान कोणत्याही जाहिरातींविना मिळवलेले आहे. अलीकडेच त्यांचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सीईओमध्ये देखील आले होते. एका मीडिया रिपोर्टनुसार गेल्या आर्थिक वर्षात निखिल कामत आणि त्यांचे भाऊ निखिल कामत यांना 100-100 कोटी रुपयांचा पगार मिळाला होता. यामुळे ते सर्वात जास्त मानधन घेणारे सीईओ बनलेत. भारतातील कोणतेच स्टार्टअप संस्थापक एवढ्या मोठ्या प्रमाणात वेतन घेत नाहीत. 2010 मध्ये सुरु झालेल्या अवघ्या सहा वर्षांच्या काळात 70000 ग्राहकांनी या कंपनीवर विश्वास दाखवला. तथापि कंपनीची ही ग्रोथ 2016 नंतर अधिक पाहायला मिळते. कंपनीने शून्य ब्रोकरेज इक्विटी गुंतवणूक सुरू केल्यानंतर या कंपनीवर लोकांचा विश्वास वाढला. ‘झिरोधा’ ही देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म असून ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत या कंपनीने अनेक मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांना मागे टाकले आहे सध्याच्या स्थितीत म्हणजेच 2025 मध्ये या कंपनीची ग्राहक संख्या 80 लाख 76 हजार एवढी आहे. तसेच या दोघा बंधूंची एकूण संपत्ती 48,754.5 कोटी रुपये एवढी असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. झिरोधा ब्रोकिंग लिमिटेड ही कंपनी आज या क्षेत्रात भारतात प्रथम क्रमांकावर आहे. झिरोधामध्ये आज 1100 हून अधिक लोक काम करतात. कोणतीही बाह्य गुंतवणूक नसल्याने झिरोधा ब्रोकिंग लिमिटेड, निखिल कामत आणि बंधूंचं विशेष कौतुक सध्या होत आहे.
बंगळूरमध्ये हेड ऑफिस असलेल्या झिरोधा ग्रुपला 2014 आणि 2015 मध्ये ‘इमर्जिंग इक्विटी ब्रोकिंग हाऊस अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, 2016 मध्ये झिरोधाला ‘इकॉनॉमिक टाईम्स स्टार्टअप अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आलं. यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजने झिरोधाला 2018 मध्ये ‘रिटेल ब्रोकर अवॉर्ड’ हा पुरस्कार बहाल केला. ऑनलाईन ट्रेडिंग मराठी घरात नेहमीच भीतीने बघितला जाणारा विषय. आपण ‘मार्केट रिस्क’ हा शब्द इतका लावून धरतो, की त्या वाटेला जाणंच नको हे ठरवूनच टाकतो. बहुतांश लोकांचं असं होतं. काहीजण मात्र या भीतीवर मात करतात. हे क्षेत्र कसं चालतं? हे शिकून घेतात. त्याला आवश्यक तो वेळ देतात आणि ‘ट्रेडर’ म्हणून करिअर करतात. आणि निखिल कामत यांनी वयाच्या 14 व्या वर्षी ‘ट्रेडिंग’चं काम सुरू केले आणि आज जगातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून फोर्ब्सच्या यादीत ते समाविष्ट झाले आहेत. ही कहाणी अत्यंत भन्नाट आणि प्रेरक अशीच आहे.
प्रा. डॉ. गिरीश नाईक