अनेक दिवसांपर्यंत उंदीर खात राहिली युवती
चीनमध्ये 25 वर्षीय युवती 35 दिवसांपर्यंत जंगलात उंदरांची शिकार करत स्वत:चे पोट भरत राहिली. जिवंत राहण्यासाठी तिने उंदरांसोबत किडेही खाल्ले आहेत. हे सर्व केवळ स्पर्धेत मिळालेल्या एका चॅलेंजपोटी तिने केले आहे. याच्या बदल्यात तिला काही रक्कम मिळाली आहे. चिनी महिलेला जंगलात जिवंत राहण्याच्या स्पर्धेत 35 दिवसांपर्यंत टिकून राहिल्याप्रकरणी कांस्य पदक आणि रोख इनाम मिळाले आहे. या स्पर्धेदरम्यान जिवंत राहण्यासाठी खूप काही झेलावे लागले, परंतु याचा सर्वात मोठा लाभ म्हणजेच माझे वजन 14 किलोग्रॅमने कमी झाल्याचे महिलेने सांगितले आहे.
झाओ तिएझू नाव असलेली 25 वर्षीय युवती 1 ऑक्टोबरपासून या स्पर्धेत सामील झाली होती. ही स्पर्धा पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतातील एका बेटावर सुरू झाली होती आणि ती 5 नोव्हेंबरपर्यंत या जंगलात राहिली. जंगलात वास्तव्यादरम्यान झाओला 40 अंश तापमानाला सामोरे जावे लागले, तिचे हात कठोर परिस्थितींमुळे होरपळले आणि तिच्या पायांवर किटकांच्या दंशाच्या खुणा तयार झाल्या. हे कष्ट सार्थकी लागले, कारण माझे वजन 85 किलोग्रॅमवरून कमी होत 71 किलोवर आल्याचे झाओने सांगितले आहे.
दरदिनी उंदरांवर ताव
वजन उच्चप्रोटीनयुक्त भोजन म्हणजेच खेकडे, सागरी अर्चिन आणि अबालोनमुळे कमी झाले. याचबरोबर 35 दिवसांत 50 उंदरांची शिकार केली. उंदरांना भाजून खाल्ले होते, असे तिने सांगितले आहे. 4 नोव्हेंबरला बेटावर धडकलेल्या वादळानंतर झाओने या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी स्वत:चे लक्ष्य गाठले होते आणि आता मी स्वत:च्या बेडवर चांगली झोप घेऊ इच्छिते असे तिने सांगितले.
युवतीला मिळाली रक्कम
स्पर्धेत झाओ तिसऱ्या क्रमांकावर राहिली असून तिला 1 हजार डॉलर्स म्हणजेच 88 हजार रुपयांचा पुरस्कारनिधी मिळाला. या नियमानुसार 30 दिवस जिवंत राहिल्यास 840 डॉलर्स तसेच अतिरिक्त प्रत्येक दिवसासाठी 40 डॉलर्स दिले जातात.
दोन जण अद्याप स्पर्धेत टिकून
स्पर्धा व्यवस्थापक गेंग यांच्यानुसार दोन जण अद्याप 7 हजार डॉलर्सचे पहिले पुरस्कार जिंकण्यासाठी बेटावर आहेत. चीनमध्ये जंगलात जिवंत राहण्याच्या खेळांमध्ये रुची वाढली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक काळापर्यंत टिकेल त्याला 28 हजार डॉलर्सचे रोख इनाम मिळणार आहे. प्रत्येकाकडे सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक व्यापक रसद आणि वैद्यकीय सहाय्य नसल्याने लोकांनी इतरांची नक्कल करू नये असे या स्पर्धेचे आयोजक लोंग यांनी म्हटले आहे.