For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्मस्वरूप जाणलेला योगी पुन्हा संसाराच्या मायाजालात फसत नाही

06:33 AM Oct 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
आत्मस्वरूप जाणलेला योगी पुन्हा संसाराच्या मायाजालात फसत नाही
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

भगवंत म्हणाले, अर्जुना जो जन्मतो, त्याला मृत्यू नि:श्चित आहे आणि जो मृत्यू पावतो, त्याला पुन्हा जन्म आहे. ज्याप्रमाणे सूर्याचा, उदय आणि अस्त निरंतर होत असतो, त्याप्रमाणे देहाचे, जन्म-मरण अखंड होत असते. सर्व प्राणिमात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात. जन्मल्यावर व्यक्त होतात व पुन्हा मृत्यूनंतर ते अव्यक्त होतात मग शोक कसला? ह्या अर्थाचा

भूतांचे मूळ अव्यक्ती । मध्य तो व्यक्त भासतो। पुन्हा शेवट अव्यक्ती । त्यामध्ये शोक कायसा ।। 28 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार हे सर्व जीव हे जन्मापूर्वी अव्यक्त होते, मग जन्मल्यानंतर त्यांना देहाकार प्राप्त होतो, मृत्यूनंतर ते पुन्हा अव्यक्तात जातात. आत्म्याच्या ठिकाणी मायेमुळे हा देहाचा आकार दिसतो. मायेने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट तात्पुरती असते. त्याप्रमाणे आत्म्याने धारण केलेल्या देहाचा आकार तात्पुरता असतो. त्यामुळे कालांतराने तो नष्ट होतो. भगवंत पुढे म्हणाले, मायेच्या ह्या कृत्याकडे लक्ष देण्यापेक्षा निर्विकार, नित्य असे जे ब्रम्हचैतन्य आहे, त्याकडे तू पूर्ण लक्ष दे. मनुष्य योनीत जन्म मिळाल्यावर जाणून घेण्याची तीच एकमेव वस्तू आहे. ती जाणली तर माणसाच्या जन्माचे सार्थक होते.

Advertisement

ज्याना ह्या ब्रह्मचैतन्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची तळमळ लागून राहते ना, त्यांना विषय नकोसे होतात. ज्याप्रमाणे पंडित सभेत आले की मूर्ख लोक आपणहूनच निघून जातात त्याप्रमाणे एखाद्याला आत्मस्वरूप जाणण्याची तळमळ लागली की आता येथे आपले काही चालणार नाही हे ओळखून विषय आपणहून निघून जातात. त्यासाठी साधकाला वेगळी खटपट करावी लागत नाही. आत्म्याचा विचार करत असताना कित्येकांचे अंत:करण शांत होते आणि त्यांना संसाराचा विसर पडतो.

काळाच्या अफाट कालावधीच्या तुलनेत मायेमुळे निर्माण झालेल्या मनुष्यदेहाचे क्षणभराचे अस्तित्व फारसे महत्त्वाचे नसते हे सांगून झाल्यावर भगवंत अर्जुनाचे लक्ष त्याच्या मूळ स्वरूपाकडे म्हणजे आत्म्याकडे वेधत आहेत. पुढील श्लोकात ते म्हणतात, काहीजण आत्म्याला आम्ही पाहिले आहे असे म्हणतात त्यांचे मला आश्चर्य वाटते. आत्म्याला आम्ही पाहिले आहे असे म्हणणारे त्याचे वर्णन करत असतात तेही आश्चर्यच होय. ते वर्णन आम्ही ऐकले असे काही म्हणतात हे तर आणखीनच आश्चर्यकारक आहे. याप्रमाणे पाहून, वर्णन करून, ऐकुन कुणी आत्म्याला जाणू शकत नाही.

आश्चर्य जो साच चि ह्यास देखे ।आश्चर्य जो देखत ह्यास वर्णी । आश्चर्य जो वर्णन ते हि ऐके । ऐके तरी शून्य चि जाणण्याचे ।। 29।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, ज्यांनी आत्म्याला जाणले आहे ते आत्मस्वरुपात मग्न होतात, त्यामुळे त्यांना संसाराचा विसर पडतो. आत्म्याचे चिंतन करताना ते आजूबाजूच्या जगाचे भान विसरलेले असल्याने त्यांच्या चित्तात अखंड वैराग्य उत्पन्न होते. त्यामुळे ते आत्म्याशी तद्रूप होतात.

ब्रम्हचैतन्याचे स्वरूप जाणून ते शांत होतात. त्यांना त्यांच्या देहाचे भान रहात नाही. ते केव्हाच चैतन्यात मिसळून गेलेले असतात. त्यामुळे तेथून ह्या मायावी जगात परत येण्याचा संभवच नसतो. समुद्रात पाणी मावत नाही म्हणून, नदीचे पाणी माघारी फिरत नाही त्याप्रमाणे ज्याने आत्मस्वरूप जाणले आहे तो परमात्म्याशी एकरूप होतो. मग तो योगी पुन: देहभानावर येऊन संसारात किंवा देहादि मायाजालात फसत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.