Solapur : पाटकूल येथे 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषाने खंडोबाच्या यात्रेस सुरुवात
पाटकुल येथील खंडोबाच्या यात्रेस प्रारंभ
by सुहास परदेशी
पाटकूल : मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथे प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्री खंडोबाची यात्रा दि. २५ ते २७ नोव्हेंबर रोजी होत असून यात्रेची जोरदार तयारी सुरु आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणावर पंचक्रोशीतील भाविक येत असल्याने ग्रामस्थामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात यात्रेच्या पार्श्वभुमीवर घरोघरी भाविक व नातेवाईकांच्या स्वागताची तयारी सुरु असल्याचे दिसत आहे.
पाटकुल येथे श्री खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरत असते. याहीवर्षी ही यात्रा जोरदार होणार आहे. यात्रा अवघ्या काही दिवसावर आली असुन यात्रेची नागरिकांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. नवसाला पावणारा खंडेराया अशी या देवसस्थानाची पंचक्रोशीत ओळख आहे. परिसरातील गावो गावचे नागरिक दर्शनासाठी येथे गर्दी करीत असतात.
या पार्श्वभुमीवर ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छते सह इतर तयारीला वेग आला आहे. यात्रेनिमित्त गावामध्ये दि.२५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत श्रींची पालखी मिरवणुक, शोभेची दारु आदींसह कुस्त्या व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहेत. यात्रे दरम्यान भाविकासह व्यापाऱ्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे