जगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन
वृत्तसंस्था/ टोकियो
जगातील सर्वात वृद्ध महिला अशी ओळख असलेल्या जपानमधील रहिवासी टोमिको इटुका यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे वय 116 वर्षे होते. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव सर्वात वयोवृद्ध म्हणून नोंद आहे. 29 डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती जारी करण्यात आली आहे. त्यांचा जन्म 23 मे 1908 रोजी ओसाका येथे झाला होता. 1979 मध्ये पतीच्या मृत्यूनंतर त्या नारा येथे राहत होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि पाच नातवंडे असा परिवार असून ते त्यांचे जीवन आणि वारसा जपत आहेत.
टोमिको इटुका यांच्यापूर्वी स्पेनमधील रहिवासी असलेल्या 117 वर्षीय मारिया ब्रानास यांची सर्वात वृद्ध म्हणून नोंद होती. त्यांच्या निधनानंतर टोमिको इटुका ह्या जगातील सर्वात वृद्ध महिला ठरल्या होत्या. इटुका यांच्या नावावर इतर विक्रमही आहेत. त्यांनी 10,062 फूट उंच माउंट ओंटाके शिखर दोनदा सर केले होते.