जगातील सर्वात रहस्यमय माणूस
आकाशातच विमानातून झाला होता गायब
आकाशातील विमानातूनच माणूस गायब होऊ शकतो का? 53 वर्षांपूर्वी अमेरिकेत असे घडले होते आणि त्या इसमाबद्दल आजवर काहीच कळलेले नाही. ही गोष्ट 1971 मधील आहे. हा इसम सूट-बूटात होता आणि हातात काळ्या रंगाची बॅग घेऊन अमेरिकन विमानतळावर पोहोचला होता. त्याने काउंटवर जात सिएटल येथे जाणाऱ्या फ्लाइटचे तिकीट घेत तेथे स्वत:चे नाव डॅन कूपर सांगितले होते. हे त्याचे खरे नाव नव्हते, परंतु आजही त्याला डीबी कूपर या नावानेच ओळखले जाते.
डॅन हा तिकीटासह थेट स्वत:च्या फ्लाइटकडे गेला होता, त्याच्या विमानाचे नाव बोइंग 727 होते. डॅनने विमानातील सर्वात मागील सीट मिळविली होती. तो थेट जाऊन स्वत:च्या सीटवर बसला. उर्वरित प्रवाशांप्रमाणे त्याने स्वत:ची बॅग वर न ठेवता स्वत:कडेच ठेवली. विमानाने उ•ाण करताच डॅनने फ्लाइट अटेंडेंटला कागदाचा एक तुकडा दिला, त्यावेळी तो एखादा उद्योजक असून आपल्याला स्वत:चा नंबर देत असल्याचे अटेंडेंटला वाटले. परंतु हा कागद बघताच अटेडेंटला धक्का बसला.
प्रत्यक्षात त्या कागदाच्या तुकड्यावर ‘माझ्याकडे बॉम्ब आहे’ असे लिहिले होते. कूपरने फ्लाइट अटेंडेटला स्वत:ची बॅग उघडून दाखविली, त्यात खरोखरच बॉम्ब् होता. यानंतर कूपरने स्वत:च्या सर्व अटी तिला सांगितल्या आणि विमान नजीकच्या विमानतळावर उतरविण्यात यावे आणि त्यात इंधन भरले जावे असे त्याने सांगितले. तसेच त्याने 2 लाख डॉलर्स आणि 4 पॅराशूटची मागणी केली होती.
कूपरच्या मागण्या ऐकून फ्लाइट अटेंडेट थेट वैमानिकाकडे पोहोचून घडलेला प्रकार सांगितला. यानंतर वैमानिकाने त्वरित विमान अपहरण आणि कूपरच्या मागण्यांविषयी सिएटलच्या हवाई वाहतूक नियंत्रकाला कळविले. मग सर्वत्र खळबळ उडाली, पोलिसांपासून एफबीआयला याची माहिती देण्यात आली. प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याने अमेरिकेच्या सरकारने कूपरच्या मागण्या मान्य केल्या आणि दोन लाख डॉलर्सने भरलेली बॅग त्याच्याकडे विमानात पोहोचविण्यात आली. परंतु त्यापूर्वी एफबीआयने संबंधित नोटांचे नंबर नोंदवून घेतले होते.
खरा खेळ वेगळाच
कूपरच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्यावर त्याने वैमानिकाला विमानाचे उ•ाण करण्यास सांगितले. रात्रीची वेळ होती आणि त्याने वैमानिकाला विमान मेक्सिकोत नेण्याची सूचना केली. तर अमेरिकेच्या वायुदलाने स्वत:ची दोन विमाने पाठलागासाठी तैनात केली होती, जेणेकरून लँडिंगवेळी कूपरला पकडता येईल. विमान आकाशात असताना कूपरने सर्वांना पायलट रुरमध्ये जाण्यास सांगितले तसेच दरवाजा आतून बंद करण्याची ताकी दिली. यानंतर काही वेळातच वैमानिकाला विमानात हवेच्या दबावात फरक जाणवला. सहवैमानिकाने रुमबाहेर जाऊन पाहिले असता विमानाचा दरवाजा खुला होता, त्याने त्वरित जात दरवाजा बंद केला आणि कूपरला विमानात शोधले, परंतु त्याचा काहीच सुगावा लागला नाही. त्याने विमानातून खाली उडी घेतली होती.
सर्वांनाच धक्का
विमान विमानतळावर उतरताच त्याला चहुबाजूने घेण्यात आले. सर्वांना कूपर पकडला जाईल असे वाटले होते. परंतु त्यापूर्वीच पसार झाला होता. अखेर कूपर विमानातून कधी बाहेर पडला याचेच सर्वांना आश्चर्य होते. वायुदलाच्या विमानातील सदस्यांनाही कूपरच्या पसार होण्याविषयी काहीच कळले नाही. कूपरला सर्वत्र शोधण्यात आले, परंतु आज वर त्याचा शोध लागला नाही. तर त्याच्या छायाचित्राच्या नावावर केवळ एक स्केच आहे. त्याचे खरे छायाचित्र कुणाकडेच नाही. तसेच तो कोण होता, कुठून आला होता आणि त्याने हे का केले हे कुणालाच ठाऊक नाही.