जगातील सर्वात मोठे रेल्वेस्थानक
170 फुटबॉल मैदानांइतका आकार
अनेक देशांमध्ये एक साधारण रस्ता किंवा छोटेसे स्थानक उभारण्यास एक दशकाचा कालावधी लागतो. परंतु चीनचा वेग आणि इंजिनियरिंगची अनोखी कामगिरी पूर्ण जगाला अचंबित करणारी आहे. पूर्णपणे उंच-उंच शिखरांनी वेढलेल्या ठिकाणी चीनने एका पूर्ण पर्वताला अस्तित्वहीन करत जगातील सर्वात विशाल आकाराचे रेल्वे स्थानक निर्माण केले आहे. हा प्रकार एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटातील आलिशान सेट वाटू शकतो, परंतु चीनने त्याला वास्तवात उतरविले आहे. या महाप्रकल्पाला पाहून पाश्चिमात्य जगतातील दिग्गज आर्किटेकटही चकित झाले आहेत.
हे आधुनिक आश्चर्य चीनच्या चोंगकिंग प्रांतात निर्माण झाले असून त्याला चोंगकिंग रेल्वे स्थानक नाव देण्यात आले आहे. क्षेत्रफळाप्रकरणी याला अधिकृत स्वरुपात जगातील सर्वात मोठे रेल्वेस्थानक घोषित करण्यात आले आहे. हे स्थानक एकूण 1.22 दशलक्ष चौरस मीटर म्हणजेच सुमारे 12 लाख 20 हजार चौरस मीटरच्या विशाल भागात फैलावलेले आहे.
याची तुलना केल्यास हे स्थानक फुटबॉलच्या 170 मैदानांच्या आकाराइतके आहे. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध ग्रँड सेंट्रल स्टेशनपेक्षा 6 पट आणि युरोपमधील सर्वात मोठ्या स्थानकापेक्षा 15 पट मोठे आहे. याचा आकार व्हॅटिकन सिटीसारख्या छोट्या देशापेक्षाही दुप्पटीने अधिक आहे. या 8 मजली आलिशान स्थानकाच्या वर 16,500 टन वजनी स्टीलच्या पाइपद्वारे निर्मित एक जादुई छत लावण्यात आले असून ते याच्या सौंदर्यात आणखी भर घालते.
हे स्थानक प्रत्यक्षात एका उंच पर्वतावर स्थित आहे, चोंगकिंग शहर स्वत:च्या खडकाळ अन् ओबडधोबड पर्वतीय मार्गांसाठी पूर्ण जगात ओळखले जाते, तेथे अशाप्रकारचे मोठे ट्रान्सपोर्ट हब निर्माण करणे अशक्य मानले जात होते. परंतु तुमच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान, अतूट हिंमत अन् कामगारांची विशाल फौज असेल तर कुठलाही पर्वत तुम्हाला रोखू शकत नाही. चिनी इंजिनियर्सनी सर्वप्रथम डायनामाइट आणि अवजड विस्फोटकांच्या मदतीने पूर्ण पर्वताला स्फोट करत नष्ट केले, यानंतर तेथील ओबडधोबड जमिनीला पूर्णपणे समतल करण्यात आले. या स्थानकाला निर्माण करण्यासाठी जवळपास 20 लाख क्यूबिक मीटर काँक्रिट आणि 3 लाख 66 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
या अशक्यप्राय वाटणाऱ्या मोहिमेला पूर्ण करण्यासाठी चीनने सुमारे 40 हजार कामगार आणि रोबोटिक मशीन्सची एक मोठी फौज दिवसरात्र कामाला जुंपली होती. याचुमळे हे पूर्ण रेल्वेस्थानक केवळ 38 महिन्यांमध्ये पूर्ण झाले आहे. या स्थानकावर एकूण 29 प्लॅटफॉर्म आणि 15 रेल्वेमार्ग निर्माण करण्यात आले आहेत, जेथे चीनच्या सर्वात लांब हायस्पीड बुलेट ट्रेन्स सहजपणे थांबू शकतात. याच्या 400 मीटर लांब प्लॅटफॉर्म्सना अशाप्रकारे डिझाइन करण्यात आले आहे की सण किंवा गर्दीच्या वेळी तेथे दर तासाला 16 हजारांहून अधिक प्रवासी सहजपणे ये-जा करू शकतील.