जगातील सर्वात दुर्गंधीयुक्त ठिकाण
दुर्गंधीचा अनुभव घेण्यासाठी येतात लोक
निसर्ग आणि मानवाच्या अनोख्या कलेचे मिलन पाहण्यासाठी जगभरात अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत. परंतु मोरक्कोच्या फेज शहरातील चोउथरा टॅनरी बहुधा जगातील सर्वात दुर्गंधीयुक्त परंतु सर्वात आकर्षक स्थानांपैकी एक आहे. पाहण्यासाठी हे ठिकाण रंगबिरंगी पाण्याच्या कुंडांनी भरलेले इंद्रधनुष्यासारखे वाटते, परंतु इतका तीव्र दुर्गंध येतो की, पर्यटक 5 मिनिटेही तेथे उभे राहू शकत नाही, तरीही दरवर्षी हजारो-लाखो पर्यटक दूरवरून येत असतात.
चोउआरा टॅनरीची कहाणी
फेज शहर मोरक्कोचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक केंद्र मानण्यात येते. येथील जुनी मेडिना युनेस्को जागतिक वारसास्थळ आहे. चोउआरा टॅनरी 11 व्या शतकापासून सातत्याने काम करत आहे आणि याला जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठ्या सक्रीय टॅनरीपैकी एक मानण्यात येते. काही परंपरांनुसार हे 9 व्या शतकापासून चालत आले आहे.
दुर्गंधीचे रहस्य
टॅनरीमध्ये चामडे तयार करण्याची प्रक्रिया आजही पूर्णपणे पारंपरिक आहे. कातड्यांना प्रथम साफ करण्यासाठी त्यांना चुन्याच्या मिश्रणात भिजवण्यात येते आणि मग त्यांना नरम करण्यासाठी विशिष्ट पदार्थांमध्ये बुडविण्यात येते. या दोन्ही गोष्टी नैसर्गिक स्वरुपात कातड्याला मुलायम आणि केसांपासून मुक्त करतात. परंतु यातून निघणारा दुर्गंध अत्यंत तीव्र असतो. सडणारे मांस, स्थिर पाणी आणि या रसायनांचे मिश्रण आसपासच्या हवेला इतके भारी करून टाकते की श्वास घेणेही अवघड ठरते. स्थानिक लोक पर्यटकांना प्रवेशानंतर पुदिन्याची ताजी पानं देतात. त्यांना नाकानजीक ठेवून हुंगल्यास काही काळासाठी दुर्गंधाचा प्रभाव कमी होते. तरीही उन्हाळ्यात तर दुर्गंध आणखी तीव्र होत असतो.
रंगबिरंगी सौंदर्य
दुर्गंधी असली तरीही हे ठिकाण छायाचित्रकार आणि पर्यटकांसाठी नंदनवन आहे. शेकडो गोल-गोल दगडी कुंड विविध रंगांनी भरलेले दिसतात. हे सर्व रंग नैसर्गिक गोष्टींनी तयार करण्यात येतात. यात हिना, केसर, वृक्षाची साल इत्यादींचा वापर होतो. कामगार कुंडांमध्ये उभे राहून कातड्यांना रंगवित असतात, वरून पाहिल्यास हे पूर्ण दृश्य अत्यंत सुंदर वाटते. ही पारंपरिक पद्धत रोजगार पुरविते, परंतु पर्यावरणासाठी आव्हान देखील आहे. टॅनरीतून निघणारा कचरा आणि रसायनं फेज नदीला प्रदूषित करतात. सरकार आणि पर्यावरणतज्ञ अनेकदा आधुनिक पद्धत अवलंबिणे किंवा टॅनरीला दुसऱ्या स्थानी हलविण्याबद्दल बोलत असतात, परंतु पर्यटन आणि परंपरेमुळे हे अद्याप त्याच ठिकाणी सुरु आहे.