For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘स्मार्टफोन्स’चं विश्व नि ‘अॅपल’ची वाढती मोहिनी...

06:35 AM Jun 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘स्मार्टफोन्स’चं विश्व नि  ‘अॅपल’ची वाढती मोहिनी
Advertisement

भारत हा मध्यंतरी जगात ओळखला जात होता तो स्मार्टफोन्सची अग्रणी बाजारपेठ म्हणून...मात्र आता त्याच्या जोडीला आपण ख्याती मिळविलीय ती उतपादन नि निर्यातीसाठी देखील. याकामी मोलाचा हातभार लागलाय तो चीनवरील अवलंबन कमी करून आपल्याकडे मोर्चा वळविलेल्या ‘अॅपल’चा...महत्त्वाचं म्हणजे या दिग्गज अमेरिकी कंपनीचं महात्म्य केवळ त्यापुरतं मर्यादित राहिलेलं नसून त्यांचे ‘आयफोन’ अत्यंत महागडे असूनही भारतीयांवर विलक्षण भुरळ घालू लागलेत. या पार्श्वभूमीवर ‘आयफोन 17’नं आपल्याकडील विक्रीत अव्वल क्रमांक मिळवून साऱ्यांना चाट पाडलंय...

Advertisement

भारतावर ‘अॅपल’ची भुरळ...

‘अॅपल’नं भारतावर मोहिनी घातलीय असं म्हटल्यास ते अजिबात चुकीचं ठरणार नाहीये...‘अॅपल आयफोन 17’नं 2026 सालच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च, कॅलेंडर वर्षाप्रमाणं) विक्रीच्या बाबतीत अव्वल क्रमांक मिळविलाय आणि या क्षेत्रातील विश्लेषकांवर अक्षरश: पाळी आलीय ती तोंडात बोटं घालण्याची...खरं सांगायचं झाल्यास भारताची बाजारपेठ सध्या विभागली गेलीय ती महाग स्मार्टफोन्स अन् कमी किमतीची उपकरणं यांच्यात. पहिल्या तिमाहीत ‘अॅपल आयफोन 17’ (किंमत 92 हजार 900 रु.) नि ‘ओप्पो ए-6 एक्स 5 जी’ (16 हजार 999 रु.) यांनी काबिज केलीत पहिली दोन स्थानं...त्यांचा बाजारपेठेतील हिस्सा समान...

Advertisement

त्यानंतर क्रमांक लागतोय तो ‘व्हिवो वाय 19 एस 5जी’ (12 हजार 499 रु.) नि ‘व्हिवो वाय 31 5जी’ (19 हजार 999 रु.) यांचा...पाचवं स्थान मिळविलंय ते ‘व्हिवो’च्याच ‘वाय 31 प्रो 5जी’नं (19 हजार 999 रु.)...यापूर्वी प्रथम स्थानावर असलेल्या ‘आयफोन 16’नं ताब्यात घेतलीय ती दोन टक्के बाजारपेठ. विश्लेषकांच्या मते, महाग स्मार्टफोन्सची किंमत अधिक असूनही त्यांनी ग्राहकांना, खास करून युवा पिढीला अक्षरश: वेड लावलंय...

पहिल्या तिमाहीतील विक्रीची स्थिती...

फोनचं नाव                                           बाजारपेठेतील टक्केवारी

अॅपल आयफोन 17                                  4 टक्के

ओप्पो एd-6 एक्स 5जी                                4 टक्के

व्हिवो वाय-19 एस 5जी                               3 टक्के

व्हिवो वाय-31 5जी                                    3 टक्के

व्हिवो वाय-31 प्रो 5जी                              2 टक्के

‘हिंदुस्तान युनिलिव्हर’लाही ‘अॅपल’ टाकणार मागं...

अमेरिकी कंपनी ‘अॅपल’चा आणखी एक पराक्रम म्हणजे आस्थापन सिद्ध झालंय ते भारतातील महत्त्वाची ‘एफएमसीजी’ कंपनी ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ला महसुलाच्या बाबतीत धक्का देण्यास...याचाच अर्थ भारतीयांची जीवनशैली बदललीय आणि ‘डिजिटल लाईफस्टाईल’नं मोलाचं स्थान पटकावलंय. ‘अॅपल इंडिया’चा आर्थिक वर्ष 2025-26 मधील महसूल सज्ज झालाय तो 1.4 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्यासाठी. ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’चा (एचयूएल) महसूल 64 हजार 468 कोटी रुपयांवर रेंगाळतोय...आर्थिक वर्ष 2020-21 आठवतंय ? तेव्हा ‘अॅपल इंडिया’नं नोंद केली होती ती 22 हजार 845 कोटी रुपयांच्या महसुलाची. त्या आर्थिक वर्षापासूनच सारं चित्र 360 अंशांत फिरलंय...

त्यावेळी ‘एचयूएल’चा महसूल होता 47 हजार 28 कोटी रुपये. गेल्या पाच वर्षांचा विचार केल्यास ‘अॅपल’चा भारतातील उद्योग वाढलाय तो चक्क 6.2 पटींनी. आपल्याकडील शहरांत राहणाऱ्या लोकांची मानसिकता कशी बदललीय त्याचं हे सर्वोत्तम उदाहरण. भारतीय ग्राहक पारंपरिक वस्तूंबरोबरच आता महाग उपकरणांचा विचार देखील करायला लागलाय. त्यात समावेश स्मार्टफोन, डिजिटल सेवा, पर्यटन आदींचा...

‘अॅपल’नं ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’वर मात केलेली असली, तरी अन्य कंपन्यांचं आव्हान मोडीत काढण्यासाठी त्यांना बरीच मजल मारावी लागेल. उदाहरणार्थ ‘रिलायन्स इंडस्ट्रिज’चा वार्षिक महसूल 10 लाख कोटी रुपयांहून अधिक, तर ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’चा 8 लाख कोटी रुपयांहून जास्त...‘सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स’ स्मार्टफोन्स नि अन्य ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती करतोय आणि त्यांचा महसूल पोहोचलाय तो 1.1 लाख कोटी रुपयांवर. ‘अॅपल’ त्यांनाही मागं टाकणार हे सांगण्यासाठी फार मोठ्या अर्थतज्ञाची गरज नाहीये...

‘अॅपल’च्या भारतातून निर्यातीत मोठी उसळी...

आंतरराष्ट्रीय डेटा कॉर्पोरेशननुसार ‘अॅपल’नं 2025 मध्ये निर्यात केली ती 14 दशलक्ष ‘आयफोन्स’ची. 2024 वर्षाशी तुलना केल्यास हा आकडा 16 टक्क्यांनी अधिक. विशेष म्हणजे भारत आस्थापनाचं चौथ्या क्रमांकाचं वैश्विक मार्केट बनलंय. 2026 सालच्या पहिल्या तिमाहीचा विचार केल्यास भारतानं निर्यात केलेल्या स्मार्टफोन्समधील ‘अॅपल’चा हिस्सा नऊ टक्के. त्यामागचं कारण लपलंय ते ‘आयफोन 17’च्या प्रचंड मागणीत...

‘अॅपल’मुळं भारतीयांच्या कारभाराला जोर...

? 2024 मध्ये ‘अॅपल’च्या ‘अॅप स्टोअर’माध्यमातून भारतात विक्री झाली ती 45 हजार कोटी रुपयांची...

? त्या वर्षी आपल्याकडे विकसित करण्यात आलेले ‘अॅप्स’ विश्वातील 755 दशलक्षांहून जास्त लोकांनी ‘डाऊनलोड’ केले...

? 80 टक्के भारतीय डेव्हलपर्सची कमाई झाली ती जगभरातील ग्राहकांच्या आधारे...

? ‘अॅपल’च्या बेंगळूर येथील ‘डेव्हलपर सेंटर’शी निगडीत आहेत 17 हजारांहून अधिक डेव्हलपर्स...

? ‘अॅपल’च्या ‘अॅप डेव्हलपर इकोसिस्टम’नं भारतात 10 लाखांहून अधिक नोकऱ्यांची निर्मिती केलीय...

? भारतीय डेव्हलपर्सची वैश्विक कमाई गेल्या पाच वर्षांत वाढलीय ती तिपटीनं...

भारतीय कंत्राटी उत्पादकांची झेप...

भारतात एका सुखद बातमीनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय आणि ती म्हणजे आपल्याकडे उत्पादन होणाऱ्या चार स्मार्टफोन्सपैकी किमान एकाची निर्मिती ही स्थानिक ‘काँट्रेक्ट मेन्युफॅक्चरर’कडून झालेली असते...देशाच्या इलेक्ट्रॉनिक इकोसिस्टममध्ये झालेला हा फार मोठा बदल. या वृद्धीचं नेतृत्व केलंय ते ‘डिक्सन टेक्नोलॉजी’ नि ‘भागवती प्रॉडक्ट्स’नं...‘डिक्सन’ ही भारतातील सर्वांत जास्त उपकरणांची निर्मिती करणारी कंपनी ठरलीय. विशेष म्हणजे त्यांनी 2025 मध्ये शर्यतीत मागं टाकलंय ते ‘सॅमसंग इलेविट्रॉनिक्स’ला...‘डिक्सन टेक्नोलॉजिस’नं ‘इलेक्ट्रॉनिक मेन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस’मध्ये (ईएमएस) तब्बल 89 टक्क्यांच्या उ•ाणासह 19 टक्के हिस्सा काबिज केलाय. त्यात फार मोठा वाटा ‘मोटोरोला’, ‘रिअलमी’, ‘शाओमी’सारख्या ब्रँड्सच्या ऑर्डर्संचा...

दुसऱ्या क्रमांकावर आहे तो 18 टक्क्यांनिशी ‘सॅमसंग’ (2024 साली 20 टक्के), तर तिसऱ्या स्थानावर आहे ती तैवानची ‘फॉक्सकॉन’ व त्यांचा हिस्सा 16 टक्के (2024 साली 12 टक्के)...‘फॉक्सकॉन’चा सारा भर आहे तो ‘अॅपल’च्या निर्यातीवर...‘भागवती प्रॉडक्ट्स’ ही ‘माईक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्स’ व ‘चायनीज ओरिजिनल डिझाईन मेन्युफॅक्चरर हुआकिन टेक्नोलॉजिस’ यांची संयुक्त कंपनी.. त्यांनी पहिल्या पाच आस्थापनांत स्थान मिळविलंय ते नऊ टक्के हिश्श्यासह. ‘भागवती प्रॉडक्ट्स’चे ग्राहक आहेत ते ‘व्हिवो’, ‘ओप्पो’ व ‘रिअलमी’...त्यामुळं सिद्ध झालंय की, चिनी स्मार्टफोन ब्रँड्स स्थानिक आस्थापनांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत...

उत्पादनाबरोबर निर्यातीतही वाढ...

2025 साली भारताच्या स्मार्टफोन्सच्या उत्पादनात वाढ झाली ती आठ टक्क्याची, तर निर्यात वाढली चक्क 28 टक्क्यांनी. याउलट स्थानिक विक्रीत वृद्धी झाली ती मात्र अवघ्या एक टक्क्याची. या क्षेत्रातील विश्लेषकांच्या मतानुसार, फार मोठा हातभार लावण्याचं काम केलंय ते सरकारच्या विविध योजनांनी. अन् त्यात मोठा वाटा ‘प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह’चा आणि बदललेल्या विदेशी गुंतवणुकीसंबंधीच्या नियमांचा...

चिनी कंपन्यांकडूनही ‘आऊटसोर्सिंग’...

‘ओप्पो’ व ‘व्हिवो’नं आऊटसोर्सिंगवर दिलेला भर हा महत्त्वाचा भाग ठरलाय. दोन्ही कंपन्यांनी आऊटसोर्सिंगला सुरुवात केली ती 2024 साली आणि त्याचा लाभ मिळालाय तो ‘डिक्सन, ’भागवती’सारख्या आस्थापनांना. चीनच्या ‘हुआकिन’नं पुरवठ्याचं सुसज्ज जाळं निर्माण केलेलं असून त्याचा फायदा ‘भागवती’ला मिळतोय. चीनमधून भारतात आलेल्या गुंतवणुकीची मोठ्या प्रमाणात छाननी होत असल्यानं चिनी आस्थापनांनी भर दिलाय तो स्थानिक कंपन्यांशी भागीदारी करण्यावर...2026 मध्ये देखील महत्त्वाचं स्थान मिळेल ते ‘स्मार्टफोन्स’च्या निर्यातीला. त्यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला पुढं नेण्याचं काम अगदी नेटानं केलंय. परंतु सध्याची भूराजकीय परिस्थिती, अमेरिका व इराणमधील युद्ध यांच्यामुळं सुरळीत चाललेल्या प्रवासाला फटका बसण्याची शक्यता मात्र नाकारता येणार नाही...

‘एंट्री लेव्हल’ स्मार्टफोन्सना फटका...

भारताचं स्मार्टफोन्सचं ‘एंट्री लेव्हल मार्केट’ मात्र 2026 च्या पहिल्या तिमाहीत कोसळलंय असं म्हणण्याजोगी परिस्थिती निर्माण झालीय. असं घडलंय ते सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती आणि ग्राहकांचा कमी झालेला उत्साह यामुळं...जानेवारी ते मार्च तिमाहीत भारतातील स्मार्टफोन्सची निर्यात गेल्या वर्षाशी तुलना केल्यास 4.1 टक्क्यांनी कमी झालीय आणि पोहोचलीय 31 दशलक्ष युनिट्सवर. परंतु सारा दबाव आलाय तो 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोन्सना ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्यानं...‘एंट्री लेव्हल सेगमेंट’ची निर्यात तब्बल 59 टक्क्यांनी घसरलीय आणि बाजारपेठेतील हिस्सा 18 टक्क्यांवरून पोहोचलाय तो 8 टक्क्यांवर...

गट आकडेवारी (पहिल्या तिमाहीत)

स्मार्टफोन्सची एकूण निर्यात        31 दशलक्ष

ऑफलाईन हिस्सा     62 टक्के (गेल्या वर्षी 58 टक्के)

ऑनलाईन वाटा 38 टक्के (गतवर्षीं 42 टक्के)

एंट्री लेव्हलचा (10 हजार रु. पेक्षा कमी किमतीचे स्मार्टफोन) बाजारपेठेतील हिस्सा       18 टक्क्यांवरून 8 टक्के

संकलन : राजू प्रभू

Advertisement
Tags :

.