महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खऱ्याखोट्याची दुनिया

06:26 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माणसाचे बरेच आयुष्य स्वसमर्थनार्थ खोटे बोलण्यात खर्च होते. खरेखोटे करण्यातही बराच काळ निघून जातो. पुढे त्याचा काहीही उपयोग नसतो. वयाचे टप्पे ओलांडल्यावर लक्षात येते की खोट्याचे खरे करताना आतला आवाज लाल दिवा दर्शवत असूनही न थांबता पुढे निघून जाणे ही चूक होती. कधी कधी खोटे मनावर इतके पक्के बिंबवले जाते की तेच खरे वाटू लागते. खरे बोलणे हे जीवनमूल्य आहे. परंतु आयुष्यात ते माणसाला साधत नाही. कारण तो भौतिक सुखात पुरता गुंतलेला असतो. जगताना स्वार्थ मध्यवर्ती असतो आणि तोच खोटे बोलायला भाग पाडतो.

Advertisement

लहान मुलांना खोटे बोलायला कोण शिकवते? ‘सांग सांग भोलानाथ’ हे लोकप्रिय बालगीत आहे. त्यात एक छोटी मुलगी भोलानाथाला विचारते, ‘भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर?’ हा तिचा प्रश्न अवघ्या बालविश्वाचा आहे. खरोखरच पोटात दुखतेय हे पटवून देण्यासाठी बालबुद्धी सुचेल तसे बोलते. शाळेला दांडी मारण्यासाठी त्यांना भन्नाट कारणे सुचतात. लहान मुले आई-बाबांच्या छत्रछायेखाली असतात म्हणून खोटे बोलतात. परंतु आई-वडिलांचे काय? ते का बरे मुलांशी खोटे बोलतात? परिस्थिती त्यांना खोटे बोलायला बाध्य करते.

Advertisement

महाभारतातील अश्वत्थाम्याचे उदाहरण खोटे बोलण्याचे किती दूरगामी आणि विचित्र परिणाम होतात हे सांगते. लहानग्या अश्वत्थाम्याने  आई गौतमीजवळ दुधाचा हट्ट केला. तिच्याकडे दूध नसल्यामुळे तिने पिठामध्ये पाणी कालवून दूध म्हणून त्याला प्यायला दिले. जोपर्यंत खऱ्या दुधाची चव चाखली नव्हती तोपर्यंत अश्वत्थामा पीठ कालवलेले पाणी दूध म्हणून पीत होता. जेव्हा त्याला मित्राकडे खरे दूध प्यायला मिळाले तेव्हा त्याने आई गौतमी आणि वडील द्रोणाचार्य यांना त्यांच्या खोटे बोलण्याचा जाब विचारला. साधे दूध ते काय पण ते सुद्धा आपल्या मुलाला मिळू नये याचे विलक्षण दु:ख द्रोणाचार्यांना झाले. त्यांचे पितृहृदय हेलावले. धनसंपत्ती जवळ असली पाहिजे या हेतूने ते मित्र द्रुपद याच्याकडे त्याने पूर्वी दिलेल्या वचनानुसार अर्धे राज्य मागण्यास गेले. तिथे त्यांचा अपमान झाला आणि ते सदैव खोटे बोलणाऱ्या, खोटे वागणाऱ्या कौरवांच्या गटात सामील झाले.

कौरव द्युत खेळताना पांडवांशी खोटे वागले. डाव जिंकले. तेव्हा द्रौपदीची भर सभेत विटंबना करणाऱ्या कौरवांना द्रोणाचार्य काहीही बोलू शकले नाहीत. कारण ते हतबल होते. द्रोणाचार्यांचा वध देखील खोटे बोलणे खरे मानल्यामुळे झाला.आयुष्यात नेहमी खरे बोलणारा धर्मनिष्ठ, शूरवीर युधिष्ठिर त्यावेळी खोटे बोलला. महाभारताच्या युद्धामध्ये अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारून द्रोणपुत्र अश्वत्थामा मारला गेला अशी अफवा श्रीकृष्णाने पसरवली आणि युधिष्ठिर ‘नरो वा कुंजरोवा’ असे म्हणाला. धर्मराजाच्या या बोलामुळे द्रोणाचार्यांनी शस्त्रs टाकली आणि त्यांचा वध झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या अश्वत्थाम्याने हीच खोटेपणाची सूत्रे हाती धरून, युद्धाचे सारे नियम मोडून खोटेपणाने पांडवांच्या तंबूत मध्यरात्री शिरून द्रौपदीच्या सगळ्या पुत्रांना झोपेत मारून टाकले. एका खोटेपणामुळे केवढा तरी अनर्थ झाला.

श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोन्ही विष्णूचेच अवतार. श्रीराम नेहमी सत्य बोलतात आणि ते साधे-सरळ, संतोषी आहेत. मात्र श्रीकृष्ण सारखा खोटे बोलतो. लबाडपणा करतो. सगळे काही करून साळसूदपणाचा आव आणतो. सवंगड्यांसह खेळताना श्रीराम मुद्दाम हरतात. डाव मित्रांना देतात. श्रीकृष्ण गोपाळांसवे  खेळताना खोटे खेळतो आणि त्यांना मिळत असलेला डाव स्वत:ला घेतो. कृष्णाचा खोटेपणा लक्षात येताच त्याचा मित्र पेंद्या आपल्या बोबड्या भाषेत म्हणतो, की ‘किश्ना थमाल ले थमाल ले थमाल आपुल्या गाई, आम्ही घलास जातो भाई.’ तूच खेळ एकटा. आम्ही घरी जातो. श्रीराम भावंडांशी, मित्रांशी खेळताना दुसऱ्यांना विजय मिळावा म्हणून खोटे खेळत स्वत:चा डाव दुसऱ्यांना देतात. कृष्ण खोटे खेळत शिक्षण देतो की खोटे खेळणारे ओळखा आणि झगडून विजय मिळवा. कृष्ण चोरून लोणी खातो तेव्हा माता यशोदा त्याला धरून दटावते त्यावेळी चूक कबूल न करता तो तिला खोट्याचे खरे करून युक्तिवाद करत म्हणतो, ‘मैंया मोरी मैं नही माखन खायो’।

कृष्णाच्या खोड्यांना कंटाळून यशोदेने संकष्टचतुर्थी व्रत केले. गणपतीबाप्पाला प्रार्थना केली की ‘माझिया मुकुंदा गुण देई’. गणपती बाप्पाला खोटे पाडायचे नाही म्हणून कृष्णाने एक महिना खोडी केली नाही. यशोदा म्हणाली, ‘धन्य धन्य गणपती.’ संकष्टचतुर्थीला तिने साखरमिश्रित लाडू आणि एकवीस मोदक केले. कृष्णाने विचारले, ‘आई मला लाडू कधी देशील? यशोदा म्हणाली, ‘नैवेद्य झाल्यावर.’ श्रीकृष्णाला धीर धरवला नाही. माता थोडी बाहेर जाताच त्याने सगळा नैवेद्य स्वाहा केला व उगीच बसला. यशोदामातेने त्याला जाब विचारताच तो म्हणाला, ‘सत्यवचन मानी माते। एक सहस्र उंदीर आले येथे । त्यात एक थोर होता तो मूषक। वरी विनायक बैसलासे। सकळही लाडू सोंडेने उचलिले । सर्व आकर्षिले एकदाच?’ यशोदेला हे काही खरे वाटले नाही, तेव्हा कृष्णाने आईला मुख उघडून दाखवले. त्यात तिला असंख्य गणपती दिसले. संत नामदेव महाराज म्हणतात, ‘परब्रम्ह निष्काम तो हा गौळीया घरी’

सुभद्रा ही श्रीकृष्णाची सख्खी बहीण. तिचा पुत्र अभिमन्यू चक्रव्यूहात लढताना मृत्युमुखी पडला. तेव्हा त्याची पत्नी उत्तरा गर्भवती होती. या गर्भस्थ बाळाचा अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राने संहार केला तेव्हा श्रीकृष्णाने त्याला जीवनदान देण्याचा कृतनिश्चय केला.

उत्तरेचे बाळ मृतावस्थेत जन्मले तेव्हा कृष्णाने महाकाळाला आव्हान देत म्हटले, ‘हे कळीकाळा मी जर कधीच खोटे बोललो नसेल, कधी युद्धात पाठ दाखवून पळ काढला नसेल, सत्य व धर्म या ठायीच माझे चित्त असेल तर हे मृत बालक जिवंत होवो.’ काळाने श्रीकृष्णाच्या कथनाचा स्वीकार करून बाळाला जीवित केले. श्रीकृष्ण म्हणतात, ‘जो अनासक्तीने, ब्रह्मार्पण वृत्तीने कर्म करतो, तो पाण्यापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे पापापासून अलिप्त राहतो.’

कृष्णाची खऱ्या-खोट्याची दुनिया दिव्य आहे. तिच्या जवळपासदेखील सामान्य माणूस पोहचत नाही.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article