पानांची दुनिया
देवपूजेसाठी जेवढे फुलांचे महत्त्व आहे तेवढेच पानांचे सुद्धा आहे. गौरीगणपती, सत्यनारायण, मंगळागौर यांसारख्या मोठ्या पूजेसाठी पत्री हवी असते. पत्री अर्थात पाने देवाला वाहताना नेमकी संख्या असते. गौरीला सोळा, गणपतीबाप्पाला एकवीस, अनंत चतुर्दशीला चौदा पत्री अर्पण करतात. सगळ्याच झाडांची पाने देवासाठी तोडत नाहीत, तर विशिष्ट झाडांची पाने देवाला चालतात.
वृक्षांशिवाय प्राणीमात्रांचे जगणे संभवत नाही. श्री दत्तप्रभू म्हणतात, वृक्ष परोपकारी असतात, अहंकारशून्य असतात. जेव्हा फुलाफळांनी बहरून जातात तेव्हा ते खाली झुकतात. संपत्ती येताच ताठा न धरता नम्र होतात. हा गुण माणसांनी शिकावा. वृक्षाला येणाऱ्या फळाफुलांचा जेवढा उदो उदो होतो तेवढा पानांचा होत नाही. पाने वृक्षांचे पोषण करतात तसेच जीवसृष्टीचे देखील. जंगल पानांनी नटलेले असते. हत्तीसारखा अवाढव्य प्राणी असो किंवा लहानशी अळी सुरवंट; दोघांचीही वाढ पाने खाऊनच होते. माणसांचे रोजचे साधे जेवण बघा. त्यात पानांची रेलचेल असते. जेवायला केळीचे पान किंवा पानांची पत्रावळ. पालेभाजी प्रकृतीला चांगली म्हणून पालक, मेथी, चुका, चाकवत, चवळी, घोळ, अंबाडी, माठ... अशा कित्येक भाज्या दैनंदिन जीवनाचा भाग असतात. कोथिंबिरीशिवाय ताटातला पदार्थ सजतच नाही आणि चवही वाढवत नाही. फोडणीचे वरण असो वा सांबार किंवा कढी. कढीपत्ता हवाच. कांदा, लसूण पात, पुदिना, मुळ्याचा पाला हे तर तोंडी लावण्याला घरोघरी असते. एवढेच कशाला माणसाची रोजची सकाळ चहापत्तीच्या सेवनाशिवाय होत नाही आणि भोजनाची समाप्ती ही विडा खाऊन झाली तरंच जेवणाला पूर्णता येते.
देवपूजेसाठी जेवढे फुलांचे महत्त्व आहे तेवढेच पानांचे सुद्धा आहे. गौरीगणपती, सत्यनारायण, मंगळागौर यांसारख्या मोठ्या पूजेसाठी पत्री हवी असते. पत्री अर्थात पाने देवाला वाहताना नेमकी संख्या असते. गौरीला सोळा, गणपतीबाप्पाला एकवीस, अनंत चतुर्दशीला चौदा पत्री अर्पण करतात. सगळ्याच झाडांची पाने देवासाठी तोडत नाहीत, तर विशिष्ट झाडांची पाने देवाला चालतात. श्रावण महिन्यात बेलवृक्षाची पाने शिवपूजेसाठी मिळाली की भक्तांना आनंद होतो. श्रावणी सोमवारी एकशे आठ, तर शिवरात्रीला महादेवाला सहस्त्र बिल्वपत्रं वाहतात. बेलाच्या झाडाला श्री वृक्ष म्हणतात. ते श्री लक्ष्मीचेही प्रतिरूप आहे. देवपूजेसाठी बेलाची पाने तोडताना त्या वृक्षाची मनापासून प्रार्थना करायची असते- ‘हे अमृतापासून उद्भवलेल्या बिल्ववृक्षा, शिवाच्या पूजेसाठी तुझी पाने आम्हाला हवी आहेत. अत्यंत आदराने मी तुझी पत्री घेऊन जातोय.’ शिवाचे वाहन नंदी आहे. ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी बेलपत्रांची फांदी बैलाच्या कपाळाला बांधतात आणि नंतर बैलाची जोडी महादेवाच्या पूजेला नेतात. गणपती बाप्पाची पूजा शमीपत्र वाहिल्याने आनंद देते. अमंगलाचे मंगल करणारी शमीपत्रे दुष्कृत्ये व दु:स्वप्ने यांचा नाश करणारी आहेत. शमीपत्रे ही प्राचीन काळापासून पवित्र मानली आहेत. सिंधूसंस्कृतीमध्ये तिचे महत्त्व होते.
सिंधूसंस्कृतीच्या उत्खननात एक चित्र सापडले आहे. त्यात देव-दानव शमीवृक्षाची फांदी हस्तगत करण्यासाठी आपसात भांडत आहेत. आंब्याच्या पानांना सर्व धार्मिक सणांमध्ये, उत्सवांमध्ये फार महत्त्व आहे. शुभ विधी हा आंब्याच्या पानांशिवाय होतच नाही. अवघी सृष्टी उन्हाळ्यात पोळत असताना आंब्याला कोवळी पालवी फुटते. गोड रसाळ फळ देणाऱ्या आंब्याच्या पानांचे तोरण घराच्या प्रवेशद्वारावर लावतात. हिरवीगार लुसलुशीत पाने जणू सुचवीत असतात की घरावर संकटे आली तरी डगमगून जाऊ नका.
जीवनात कडू घोट पचवले की पुढचे आयुष्य अमृतासमान होते असा अनमोल संदेश देणारा कडुलिंब वृक्ष हा दारी असावा असा पूर्वजांचा आग्रह होता. कडुलिंबाचा पाला अत्यंत औषधी आहे म्हणून त्याला आदिवासी लोक माऊलीचे, आईचे झाड असे संबोधतात. गुढीपाडवा, राम जन्माच्या दिवशी कडूलिंबाच्या पानांचा रस पितात. उन्हाळ्यात थंडावा देणारी कडूलिंबाची पाने कांजण्या, गोवर, खरुज, नारू या रोगावर औषध म्हणून परिणामकारक असतात. धान्याची सुरक्षितता करणारी पाने आईप्रमाणे रक्षण करतात.
माणसाच्या जीवनात पानांची शिकवण बहुमोल आहे. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली म्हणतात- ‘ना तरी वृक्षाची पाने जेतुली । तेतुली रोपे नाही लाविली ।। ऐसी अद्वैत दिवसे पाहली । रात्री जया’ एका झाडाला अनेक पाने आहेत. त्या प्रत्येक पानाला वेगळे रोप लावले होते का? त्याप्रमाणे हे विश्व सगळे एका परमात्म्यातून आलेले आहे. अज्ञानाची रात्र संपून दिवस उजाडला तर तिथे फक्त तूच आहेस. नागवेलीला फक्त पाने असतात. त्यांचा आकार माणसाच्या हृदयासारखा असतो. विड्याच्या पानांचे महत्त्व पूजेमध्ये प्राधान्याने आहे. माऊली म्हणतात-‘कां न फळताही सार्थका । जैसिया नागलतिका । तैसिया करी नित्यादिका । क्रिया जो का ?’ नागवेलीला फळे न येतात त्या सफल आहेत. त्याप्रमाणे सात्विक पुरुष फळाची आशा न धरता कर्म करतो तरीही त्याचे कर्म सफलच आहे. पिंपळवृक्षाची पाने ही चैतन्याचे प्रतीक आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने ‘वृक्षांमध्ये मी अश्वत्थ आहे’ असे म्हटले आहे. जी मुले बोबडे बोलतात त्यांची वाणी शुद्ध व्हावी म्हणून पिंपळाची पाने त्यांना चाटायला देतात किंवा पिंपळाच्या पानांची पत्रावळ करून त्यावर जेवायला वाढतात. सदैव सळसळ करणारे पिंपळपान कलासृष्टीत वैशिष्ट्यापूर्णरीत्या प्रकट होते. पूर्वीच्या काळी सधन घरांमध्ये मुलगी जन्माला आली की तिच्या गळ्यात सोन्याचे पिंपळपान असलेला दागिना घालत. सासरी जाताना तो दागिना तिच्याबरोबर असे. जर यदाकदाचित तिचा मृत्यू झाला तर तिच्या मरणाची बातमी तोंडाने न सांगता तिच्या माहेरी ते पिंपळ पान दाखवीत. त्यावरून लेक परलोकाला गेली हे माहेरची माणसं समजून घेत. जात्यावरची ओवी अशी आहे - ‘गेला माया जीव भले भीतीशी खुटवा । सोन्याचं पिंपळपान माझ्या माहेरी पाठवा? त्या मालनीला वाटते की माझी शेवटची बोळवण आई-बाप-भावाकडून व्हावी म्हणून ती म्हणते की ते येईपर्यंत मला नेण्याची घाई करू नका. भिंतीशी ठेवा. जागेपणी स्वत:च्या मरणाची स्वप्ने जुन्या सासुरवाशिणींनी बघितली. कारण समाजाने त्यांना स्वस्थपणे जगू दिले नाही.
अळूच्या पानांची भाजी सणावारात करतात. अळूच्या पानावर पाणी टिकत नाही. ते चटकन निसटून जाते. त्यालाच अळवावरचे पाणी असे म्हणतात. माणसाचे आयुष्य अळवावरच्या पाण्यासारखेच असते. कधी निसटून जाईल काही सांगता येत नाही. आद्य शंकराचार्य कैवल्य अष्टकात म्हणतात- ‘विश्वासाला अपात्र कोण आहे? तर त्या शब्दांमध्ये असलेला श्वास. श्वासावर कधीही विश्वास ठेवता येत नाही. कधी निघून जाईल काही सांगता येत नाही.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रातील एक गोष्ट आहे. माऊलींना एकदा मांडे खाण्याची इच्छा झाली. खरे म्हणजे ही एक लीला आहे. सामान्यांचे जीवन ऊर्ध्वगामी करण्याची. मुक्ताबाईंना मांडे करण्यासाठी कुठेही विस्तव मिळाला नाही. विसोबांनी मांड्यासाठी लागणारे मडकेही फोडून टाकले. तेव्हा ज्ञानोबा माऊलींनी योगाग्नी जागृत केला आणि माऊलींच्या पाठीवर मुक्ताईने मांडे भाजले. हे सारे दृश्य माऊलींच्या झोपडीच्या फटीतून विसोबांनी पाहिले. खरे तर त्यांची फजिती बघण्यास ते आले होते. मात्र आतले हे दृश्य पाहून त्यांना पश्चाताप झाला. ज्ञानदेवादिकांची जेवणे होण्याचा अवकाश की विसोबा झोपडीचे दार उघडून वेगाने आत शिरले आणि माऊलींची उष्टी पत्रावळ त्यांनी चाटण्यास सुरुवात केली. ते बघून ज्ञानोबा म्हणाले, अरे तू काय खेचर आहेस का? त्या क्षणापासून ते विसोबा चाटीचे विसोबा खेचर झाले.
वटवृक्ष हा पवित्र वृक्ष आहे. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात विष्णू बालमुकुंद रूपात वटपत्रावर शयन करतात असे म्हटले आहे. याचा अर्थ जगबुडी झाली तरी वटपत्र अक्षय आहे. वृक्षावरची विविध कलाकुसर केलेली तऱ्हेतऱ्हेची पाने बघितली की विश्वाच्या चित्रकारापुढे आपण नतमस्तक होतो व काही काळ अंतर्मुखता लाभते.
-स्नेहा शिनखेडे