टेस्लाची उडणारी कार पाहून जग थक्क!
टेस्ला कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात एक ऐतिहासिक आणि थक्क करणारी कामगिरी केली आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर, टेस्लाने आपल्या बहुप्रतिक्षित ‘रोडस्टर’ सुपरकारचे नवीन प्रोटोटाइप अमेरिकेतील टेक्सास स्पेस एक्स रॉकेट चाचणी केंद्रावर लोकांसमोर सादर केले. या कार्यक्रमादरम्यान टेस्लाने चक्क एक कार हवेत उडवून दाखवली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. विशेष म्हणजे, या कारमध्ये पारंपरिक इंजिनाऐवजी रॉकेट विज्ञानाचा वापर करण्यात आला असून, 2028 पर्यंत याचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल अशी घोषणा करण्यात आली आहे.
याविशेष अनावरण सोहळ्यात टेस्लाने कोणतीही पारंपरिक पद्धत न वापरता थेट इलेक्ट्रिक रोडस्टर कार हवेत झेपावताना दाखवली. एअरोस्पेस आणि रॉकेट तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या या वाहनाने सर्वांनाच आपल्या कामगिरीने थक्क करून सोडले. स्पेसएक्सच्या अभियंत्यांनी या कारमध्ये विशेष एअर थ्रस्टर्स आणि शोषण प्रणाली बसवली आहे. एका रॅम्पवरून धावताना या कारने हवेत एक उलटी कोलांटी मारली, पुन्हा स्वत:ला सावरले आणि थ्रस्टर्सच्या जोरावर सुरक्षितपणे जमिनीवर आली. या कारच्या उडण्यामागे आणि कसरतींमागे अत्यंत प्रगत विज्ञान काम करत आहे. वाहनाच्या तळाशी
फॅन-आधारित विशेष सक्शन प्रणाली आहे. यामुळे कार रॅम्पवर अगदी उलटी असतानाही घसरत नाही. रॉकेटप्रमाणे ही कार नियंत्रित करण्यासाठी यात डझनभर नोझल्स आणि मागील बाजूस थ्रस्टर्स देण्यात आले आहेत. यात प्रत्येकी 600 लिटर क्षमतेच्या दोन अति-उच्च दाबाच्या टँक्समध्ये सुमारे 250 किलो हवा असते. ही हवा 10 नोझल्सद्वारे बाहेर टाकली जाते, ज्यामुळे कारला हवेत उचलणे शक्य होते. या कारच्या कामगिरीबाबत एलॉन मस्क यांनी दावा केला आहे की, ही कार अवघ्या 1 सेकंदापेक्षा कमी वेळेत 0 ते 60 मैल प्रति तास (सुमारे 96 किमी/तास) इतका प्रचंड वेग पकडू शकते. तसेच, या सुपरकारचा कमाल वेग 230 मैल प्रति तास (370 किमी/तास) पेक्षा जास्त आहे.
15 ऑक्टोबर 2026 रोजी अमेरिकेतील टेक्सास राज्यातील स्पेसएक्सच्या रॉकेट डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग सेंटरमध्ये हे प्रात्यक्षिक पार पडले. यावेळी रोडस्टर 2 ने मोठ्या वक्राकार रॅम्पवर उलट्या दिशेने प्रवास केला, हवेत पलटी घेतली आणि काही क्षण हवेत राहिल्यानंतर सुरक्षितपणे खाली उतरली. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी या कामगिरीनंतर समाधान व्यक्त केले. कंपनीच्या व्हेईकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख लार्स मोरावी यांनीही या टेक्नोलॉजीला उडणाऱ्या कारच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हंटले आहे. प्रात्यक्षिकात कारने कंपनीच्या इतर वाहनांच्या वरून झेप घेत सायबरट्रकच्या वर हवेत तरंगल्याचेही दाखवण्यात आले. पण या कामगिरीचे प्रत्यक्ष रस्त्यावरील वापरात रूपांतर करण्यासाठी आणखी चाचण्या आणि तांत्रिक पडताळणी महत्त्वाची असेल. कारची प्रात्यक्षिकं दाखवताना मस्क यांना ही कार रस्त्यांवर धावू शकेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मस्क यांनी गंमत करत, ‘तुमचा रस्ता कसा आहे यावर ते अवलंबून आहे,’ असं म्हटलं. पण, वापरण्याच्या दृष्टीकोनातून ही ‘व्यावहारिक गाडी’ असेल असा दावा त्यांनी केला. ही कार कोल्ड-गॅस थ्रस्टर तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याचा उपयोग अवकाशात रॉकेट आणि उपग्रहांची दिशा बदलण्यासाठी केला जातो. यामध्ये उच्च दाबानं संकुचित हवा/वायू सोडून वाहनाला अतिरिक्त बळ दिलं जातं. या गाडीचा डेमो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी अनेक शक्यता व्यक्त केल्या. ही गाडी टोल बूथजवळ पोहोचल्यावर त्याच्यावरून उडून जाईल, असं काही लोक म्हणत आहेत. तर काहींनी ख•s असलेल्या ठिकाणी ही कार उडवून नेण्याची कल्पना मांडली. पण, हा रोडस्टर कारचा फक्त एक डेमो आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या विशेष तंत्रज्ञानासह ही कार बाजारात आणली जाईल, आणि ती चालवण्यासाठी रस्त्यांची परिस्थिती आणि इतर कशाची आवश्यकता असेल हे अद्याप स्पष्ट नाही.
खरंच खरेदी करता येणार का टेस्लाची ही कार?
टेस्लाच्या नव्या रोडस्टरचे आकर्षक सादरीकरण पाहून अनेकांना ही कार खरेदी करण्याची उत्सुकता असू शकते. मात्र, कारचे सादरीकरण होणे आणि तिचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊन ग्राहकांपर्यंत पोहोचणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. विशेषत: कारच्या रॉकेट व्हेरिएंटबाबत रस्त्यावर वापरण्याच्या कायदेशीर परवानगीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. उपलब्ध माहितीनुसार, या व्हेरिएंटला सामान्य रस्त्यांवर चालवण्याची वैधता नसल्याचे कंपनीच्या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कार आरक्षित केली, तरी तिचा वापर सामान्य रस्त्यांवर करता येईलच, याची खात्री नाही.
कार बुक करण्यासाठी मोजावे लागणार अडीच लाख डॉलर!
टेस्लाने या कारसाठी आरक्षणाची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. कारच्या आरक्षणासाठी सुरुवातीला 5,000 डॉलर भरावे लागतील. त्यानंतर पुढील 10 दिवसांत आणखी 2 लाख 45 हजार डॉलर भरावे लागतील, असे दिलेल्या माहितीत नमूद आहे.
प्रा. डॉ. गिरीश नाईक
