जगास आता कळून चुकले...
भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करून जे काही घवघवीत यश संपादन केले आणि त्यातही पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करीत त्यांच्या घरात घुसून जी त्यांच्यावर कारवाई केली, त्यामुळे पाकिस्तानमधील नागरिकांचे हातपाय लटपटले. एवढेच नव्हे तर पाकिस्तानी सैनिक देखील घाबरले. हा चमत्कार नसून ही वस्तुस्थिती आहे. नेहमीच भारताला अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला योग्यवेळी योग्य धडा भारताने शिकविला. भारताने ही कारवाई ज्या ठिकाणावरून केली त्या अदमपूर हवाई तळावर जाऊन जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना सलाम केला त्यावेळी जवानांच्या तोंडून जी घोषणा निघाली ती होती ‘भारत माता की जय’. या युद्धामुळे किंवा
ऑपरेशन सिंदूरमुळे एक गोष्ट प्रकर्षाने दिसून आली, ती म्हणजे भारतातील मुसलमान मंडळी देखील भारत सरकारच्या बाजूने भक्कमपणे उभी राहिली. त्यांनाही कळून चुकले की देश संरक्षणासाठी मोदींचे नेतृत्व हे अत्यंत योग्य आणि अचूक आहे. जरी भारत बुद्धाची भूमी असली तरी देखील ती गुऊ गोविंद सिंह यांची देखील भूमी आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. याचा अर्थ असा आहे की आम्हाला शांतता देखील हवी आहे, परंतु आम्ही शांतपणे ज्यावेळी पुढे जात असतो त्यावेळी आमच्या वाटेत येऊन काटे टाकून आमचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला, आमच्या माता-भगिनींचे कुंकू पुसण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केलात, तर शस्त्र उचलणारच! गुऊ गोविंद सिंह यांनी एक तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. त्यात त्यांनी म्हटलेले आहे की सव्वा लाखसे एक लढाऊँ चिडियन ते मै बाज तुडाऊं तबै गुऊ गोविंदसिंह नाम कहावूं. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलणं ही आपली परंपरा आहे आणि पंतप्रधानांनी हेच वाक्य भारतीय जवानांसमोर उद्धृत केलं आणि त्यावेळी पुन्हा एकदा ‘भारत माता की जय’च्या घोषणा घुमल्या. पंतप्रधान म्हणतात की आमच्या बहिणी आणि मुलींचं कुंकू पुसून काढलं तेव्हा त्यांनी क्रौर्याचे फार मोठे शिखर गाठले. आता इथे आम्ही शांत बसू शकत नाही. त्यामुळेच दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांचे पंख छाटलेले आहेत. संपूर्ण जगात आज भारत ताठ मान करून स्वाभिमानाने उभा आहे. भारत माता की जय या घोषणेमध्ये जी ताकद आहे ती भारतीय जवानांनी संपूर्ण जगाला दाखवून दिली. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकला कायमचा धडा शिकवलाच. त्याचबरोबर संपूर्ण जगाला ठासून सांगितले की ‘या भूमीवर वीरश्रीने सीमेवर लढतात जवान, जगास आता कळून चुकले, भारत काही नाही लहान’. धडा केवळ पाकिस्तानलाच होता असे नाही, चीनलाही त्यातून एक प्रकारे संदेश भारताने पोहोचविला. चीनने तयार केलेली क्षेपणास्त्रs किती तकलादू होती याचा पुरावाच भारताने त्यांची क्षेपणास्त्रs निकामी करून दाखवून दिला. पाकला पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी आता किमान सात-आठ वर्षे तरी निश्चितच लागतील. भारताशी पंगा घेतला की काय अवस्था होते असे म्हणण्यापेक्षा ‘त्याचा पाकिस्तान होतो’ अशी नवी व्याख्या या ऑपरेशन सिंदूरद्वारे स्पष्ट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्कम नेतृत्व आणि दूरदृष्टीकोन यामुळेच पाकिस्तान भारताला घाबरून उरले. आता पुन्हा भारताकडे वक्रदृष्टी करण्याचा धीर यापुढे कधीही पाकिस्तानला होणार नाही. शस्त्रसंधी शिवाय पाकिस्तानकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण घटनेनंतर मंगळवारी सायंकाळी देशाला उद्बोधन करताना लपून राहिलेल्यांचा देखील तेथेच बीमोड करू असा सज्जड इशारा दिला. त्याचबरोबर यानंतर भारताशी जरासुद्धा आगळीक केली तर गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला आहे. एवढेच नव्हे तर सिंदूर अभियान हे संपलेले नसून ते तात्पुरते थांबविलेले आहे. पाकिस्तानने जर का दहशतवादाचा खात्मा केला नाही तर पाकिस्तानला भयंकर परिस्थितीला तोंड द्यावे लागेल आणि त्यावेळी पाकिस्तानच्या मदतीला कोणीही येणार नाही. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे 26 भारतीयांची निर्घृण हत्या करणाऱ्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी अनेक भारतीय नारीचे कुंकू पुसले. या कुंकवाची किंमत काय आहे हे दाखवून देण्यासाठीच भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांना संपुष्टात आणण्याकरिता जे अभियान राबविले त्याला सिंदूर हे नाव दिले आणि या ऐतिहासिक कारवाईतून पाकिस्तानला कायमचा धडा भारताने शिकविला. भारतीय सैनिकांनी अणुबॉम्बच्या धमकीची हवाच काढून घेतली आणि हे करीत असताना आकाशापासून पाताळापर्यंत एकच आवाज घुमतो तो म्हणजे भारत माता की जय आणि या घोषणेतून भारतीय जवानांनी भारतीयांची मान उंचावली अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचे कौतुक केले आणि त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला. एवढेच नव्हे तर या जवानांमध्ये त्यांनी प्रेरक असे वातावरण निर्माण केले. त्यांच्या मनगटात ताकद निर्माण करण्याचे काम पंतप्रधानांनी केलेले आहे. म्हणूनच त्यांनी अदमपूरच्या तळाला भेट देऊन जवानांचे कौतुक केले आणि जवानांमध्ये चैतन्य निर्माण केले. ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीयांमध्ये पुन्हा एकदा जागृती निर्माण झाली. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलणे ही आपली परंपरा आहे आणि त्या तत्त्वांचे पालन आपल्याला करावंच लागेल हे निवेदन करून पंतप्रधानांनी संपूर्ण देशभरात युवाशक्तीमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. भारताच्या सिंदूर अभियानातून देशातील सर्व जाती धर्मातील मंडळींना एकत्र आणण्याचे काम केलेले आहे. राजकारणाची वल्कले बाजूला ठेवून सारे देशवासी या ठिकाणी एकत्र आले आणि त्यामुळेच भारताला घवघवीत यश संपादन करता आले. वास्तविक हे अभियान साधेसुधे नसून भारताने एका निर्णयाप्रत लढाई जिंकलेली आहे. पाकिस्तानचा भारताने थरकाप उडवून दिला. यानंतर भारताला आव्हान देण्यापूर्वी पाकिस्तानला चारवेळा विचार करावा लागेल. सिंदूर
ऑपरेशनमुळे भारताने जगाला दोन गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही शांतता राखण्यासदेखील नेहमीच पुढाकार घेतो परंतु गरज नसताना आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ शकतो आणि तशी आमची क्षमता आहे.