For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एका उडीने संपलेले जग

06:10 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
एका उडीने संपलेले जग
Advertisement

खवड्या डोंगरावर तीन जीव गेले; पण त्या दरीत फक्त तीन माणसे पडली नाहीत. एका कुटुंबाची स्वप्ने, एका आईचे मातृत्व, एका वडिलांचे भविष्य आणि एका तरुणाच्या असंख्य शक्यता त्या दरीत कोसळल्या. या घटनेची शोकांतिका आपल्याला एक कठोर धडा देऊन जाते. माणूस संकटात असताना त्याला सल्ल्यापेक्षा आधी सहवास हवा असतो; दोषारोपांपेक्षा आधी ऐकून घेणारे कान हवे असतात आणि निराशेच्या अंधारात सर्वांत आधी एक हात पुढे यायला हवा.

Advertisement

छत्रपती संभाजीनगर जिह्यातील खवड्या डोंगरावर घडलेली घटना महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावणारी आहे. वडिलांसोबत झालेल्या वादातून अवघ्या 19 वर्षांच्या कुणाल मुरलीधर चांदगुडे याने डोंगरावरून उडी घेत जीवन संपविले. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या वडिलांचा, मुरलीधर दामोदर चांदगुडे यांचाही दरीत पडून मृत्यू झाला. डोळ्यांसमोर पती आणि मुलाला गमावल्याचा आघात सहन न झाल्याने आई संगीता मुरलीधर चांदगुडे यांनीही काही क्षणांत त्याच डोंगरावरून उडी घेतली. अवघ्या काही क्षणात एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. ही केवळ तीन मृत्यूंची बातमी नाही. ही एका क्षणाच्या असह्य भावनेने संपूर्ण आयुष्यावर कसा घाला घातला जाऊ शकतो, याचा भयावह आरसा आहे. कुणाल हुशार होता. दहावीच्या गुणवत्ता यादीत आलेला आणि भविष्यात वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणारा हा तरुण नीटच्या तयारीत होता. त्याच्यासमोर संपूर्ण आयुष्य पडले होते. स्वप्ने होती, संधी होत्या, कुटुंबाची अपेक्षा होती आणि उद्याचा मोठा प्रवास बाकी होता. पण एका क्षणाच्या रागाने त्याच्या विवेकावर मात केली. त्या एका क्षणानंतर मागे वळून पाहण्याची संधीच मिळाली नाही. आणि त्याच्या निर्णयाची किंमत केवळ त्यालाच नव्हे, तर आई-वडिलांनाही जीव देऊन मोजावी लागली. आज महाराष्ट्रासमोरचा खरा प्रश्न आहे हा अनर्थ टाळता आला असता का? बहुधा हो. कदाचित त्या क्षणी कुणीतरी त्याला थांबवले असते, त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले असते, त्याच्या रागामागची वेदना समजून घेतली असती, तर परिस्थिती वेगळी झाली असती. पण ‘कदाचित’ हा शब्द आता केवळ वेदना वाढवतो. कारण गेलेले तीन जीव परत येणार नाहीत. नैराश्य, राग, अपयश, अपेक्षाभंग किंवा मानसिक ताण यांना आपण अजूनही अनेकदा ‘काय मोठे झाले?’ या दृष्टिकोनातून पाहतो. शरीराला ताप आला तर डॉक्टरकडे धाव घेतो; पण मनाला ताप आला तर त्याकडे दुर्लक्ष करतो. एखादा तरुण सतत शांत राहतो, चिडचिड करतो, एकटा राहू लागतो, छोट्या गोष्टींवर तीव्र प्रतिक्रिया देतो किंवा ‘मला काहीच नको’ असे म्हणतो, तेव्हा त्याला समजावण्यापेक्षा आपण अनेकदा त्याला सुनावतो. हीच मोठी चूक ठरू शकते. नैराश्य अचानक निर्माण होत नाही. अनेकदा त्याची बीजे मनात हळूहळू रुजत असतात. अपयश, सततची तुलना, पालकांच्या अपेक्षा, अभ्यासाचा ताण, नात्यांमधील संघर्ष, आर्थिक चिंता किंवा स्वत:बद्दल निर्माण झालेली न्यूनगंडाची भावना, या सगळ्यांचा परिणाम मनावर होत असतो. बाहेरून सर्व काही ठीक दिसत असले तरी आतून एखादी व्यक्ती तुटत असू शकते. म्हणून मुलांच्या गुणपत्रिकेपेक्षा त्यांच्या मनाची स्थिती विचारण्याची वेळ आली आहे. ‘किती गुण मिळाले?’ या प्रश्नाबरोबर ‘आज मन कसे आहे?’ यावरही (आपल्या सर्व वेदना, राग गिळून) पालकांना चिंतन करावे लागणार आहे. मुलांच्या स्वप्नांना दिशा देताना त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादले जात नाही ना, याचाही विचार पालकांनी करायला हवा. तितकेच महत्त्वाचे म्हणजे रागाच्या क्षणी घेतलेले निर्णय अंतिम असतातच असे नाही. राग काही मिनिटांचा असतो; पण त्यातून घेतलेला निर्णय आयुष्यभराची शोकांतिका ठरू शकतो. म्हणून रागाच्या भरात थोडे थांबणे, त्या जागेपासून दूर जाणे, कोणाशी बोलणे, मन मोकळे करणे, अशा साध्या गोष्टी जीव वाचवू शकतात. मानसिक वेदना ही कमजोरी नाही. मदत मागणे म्हणजे पराभव नाही. समुपदेशक, मानसोपचारतज्ञ, डॉक्टर, शिक्षक, मित्र किंवा कुटुंबातील विश्वासू व्यक्तीशी बोलणे ही धैर्याचीच खूण आहे. समाजानेही अशा व्यक्तीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याऐवजी संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. खवड्या डोंगरावर तीन जीव गेले; पण त्या दरीत फक्त तीन माणसे पडली नाहीत. एका कुटुंबाची स्वप्ने, एका आईचे मातृत्व, एका वडिलांचे भविष्य आणि एका तरुणाच्या असंख्य शक्यता त्या दरीत कोसळल्या. या घटनेची शोकांतिका आपल्याला एक कठोर धडा देऊन जाते. माणूस संकटात असताना त्याला सल्ल्यापेक्षा आधी सहवास हवा असतो; दोषारोपांपेक्षा आधी ऐकून घेणारे कान हवे असतात आणि निराशेच्या अंधारात सर्वांत आधी एक हात पुढे यायला हवा. ती वेळ आधीच टाळल्याने ही दुर्घटना घडली. कुणालच्या आयुष्यातील तो एक क्षण परत आणता येणार नाही. मुरलीधर आणि संगीता यांचे जीवनही परत मिळणार नाही. पण या तीन मृत्यूंच्या राखेतून आपण एक सामाजिक संकल्प उभा करू शकतो. आपल्या घरातला, शेजारचा, मित्रपरिवारातील किंवा वर्गातील एखादा माणूस आतून तुटत असेल, तर त्याच्या चेहऱ्यावरचे मौन वाचूया. त्याला थांबवूया. ऐकून घेऊया. कारण कधी कधी एखाद्याला जगवण्यासाठी मोठ्या उपायांची गरज नसते. ‘... मी तुझ्यासोबत आहे.’ इतके शब्दही पुरे असतात....! त्यातून भविष्यात होणारा कडेलोटही टळू शकतो..!!

Advertisement
Advertisement
Tags :

.