For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्माची गती गहन असते

06:43 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
कर्माची गती गहन असते
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

भगवंत म्हणाले, जन्माला आलेल्या प्रत्येकाने ठरवून दिलेले कर्म केलेच पाहिजे. अगदी मलासुद्धा जन्माला आल्यामुळे कर्म करावेच लागते. अवतारकाळात मी माझे ठरलेले कर्म जरूर करतो पण कर्माच्या फळामध्ये माझी आसक्ती नसते, म्हणून कर्मे मला जखडू शकत नाहीत, जो माझे हे तत्व जाणतो, तोही तसंच वागत असल्याने त्यालाही कर्म बाधत नाही. ह्यात पथ्य एकच आहे ते म्हणजे अगदी विद्वान जरी झाला तरी त्याने स्वत:च्या मनाने कोणते कर्म करायचे हे न ठरवता नीतीन्यायाचा आधार घेऊन यथायोग्य कर्म करणे आवश्यक आहे. कोणते कर्म करणे योग्य आहे आणि कोणते कर्म करणे अयोग्य आहे हे ठरवताना अगदी शहाणा मनुष्यसुद्धा गोंधळून जातो.

ह्या अर्थाचा

Advertisement

नेणती जाणते ते हि काय कर्म अकर्म हे । तुज ते सांगतो कर्म जाणूनि सुटशील जे ।। 16।।

हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार सांगायचे झाले तर केवळ मनाच्या संकल्पाने प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्यांच्या अंगी आलेले असते असे सिद्ध, महापुरुषदेखील काही वेळा गोंधळून चुकीचे कर्म म्हणजे अकर्म करत असताना दिसतात. आपण अकर्माचे आचरण करतोय हे त्यांच्या गावीही नसते. त्यामुळे ते आम्हाला कर्म आणि अकर्मातला फरक चांगला कळतो असे सांगतात आणि आम्ही योग्य तेच कर्म करतो अशी प्रौढी मिरवतात. आपल्याला कर्मबंधन लागू होत नाही अशा गैरसमजुतीतून ते अकर्माचे आचरण करून कर्माच्या पाशात अलगद अडकतात. कर्मा अकर्माविषयी चांगले चांगले विद्वान दूरदर्शी देखील मूढ बनतात तर मग जे मूळचेच अज्ञानी आहेत, त्या बिचाऱ्या मूर्खांची काय कथा? येथे कोमल हृदयाचे माउली अशा लोकांना एकदम मूर्ख कसे काय म्हणतात असे वाटणे साहजिकच आहे परंतु ज्याला आपण म्हणजे हा देह असे वाटून स्वत:च्या आत्मस्वरूपाचा विसर पडलेला आहे त्या सर्वांनाच भगवंत मूर्ख म्हणत असल्याने माउलींनी तो शब्द वापरला आहे. अर्जुन अशांच्यापैकीच एक असल्याने त्यालाही भगवंतांनी मूर्ख असे म्हंटले आहे. ऐन युद्ध करायच्यावेळी आत्मस्वरूपाचा विसर पडल्याने तो स्वत:चे कर्तव्य विसरला आणि त्यामुळे अकर्म करण्यास प्रवृत्त झाला.

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, कर्म, विकर्म, अकर्म म्हणजे काय, हे जाणले पाहिजे. कारण कर्माची गती गहन आहे.

सामान्य कर्म जाणावे विकर्म हि विशेष जे । अकर्म ते हि जाणावे कर्माचे तत्व खोल हे ।।17 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, जे कर्म केल्याने या विश्वाला आकार निर्माण होतो, ते योग्य कर्म होय. अशा विधायक कर्माचे ते सुरू करण्यापूर्वी यथार्थ ज्ञान करून घेतले पाहिजे. मग वर्ण व आश्रम ह्यानुसार जे विशेष कर्म म्हणून सांगितले आहे, त्याची देखील उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे. नंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात, त्याचेही स्वरूप समजून घ्यावे. याप्रमाणे कर्माचे स्वरूप जाणून घेतले, म्हणजे माणूस कर्माने बध्द होत नाही. हे जग कर्माच्या अधीन आहे. कर्म करण्याच्या नादात कोण, मनुष्य कोणत्या उद्देशाने कर्म करेल आणि त्यामुळे किती खालच्या पातळीला उतरेल हे सांगणे कठीण आहे म्हणून कर्माची गती गहन आहे असे म्हणतात.

ज्याने कर्म, अकर्माबद्दल विशेष ज्ञान करून घेतलेले आहे अशा बुद्धिमान माणसाचे वैशिष्ट्या सांगताना भगवंत म्हणतात, जो कर्म करत असताना, चुकून आपण अकर्म करत नाहीना ह्याबद्दल दक्ष असतो किंवा अकर्माचे आचरण हातून घडू लागल्यावर सावध होऊन जो कर्म करू लागतो, तो बुद्धिमान होय.

क्रमश:

Advertisement
Tags :

.