युवा विकास प्रतिष्ठानचे रक्तदान चळवळीतील कार्य कौतुकास्पद
प्रतिष्ठानच्या दशकपूर्ती सोहळ्यात २५० रक्तदात्यांचा सन्मान
ओटवणे: प्रतिनिधी
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असुन एका व्यक्तीने केलेले रक्तदान तीन जणांचे प्राण वाचवू शकते. त्यामुळे युवा विकास प्रतिष्ठान गेल्या १० वर्षांपासून पवित्र अशा रक्तदान चळवळीमध्ये सक्रिय असल्याने सांगेली पंचक्रोशीसह परिसरातील अनेक गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा करून त्यांना जीवदान देण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे. त्यामुळे या सेवाभावी संस्थेचा दशक पूर्ती सोहळा या भागासाठी अभिमानास्पद आहे. असे प्रतिपादन निवृत्त पोलीस उपअधीक्षक तथा ऑनकॉल रक्तदाता संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी केले.सांगेली येथील ‘युवा विकास प्रतिष्ठान’ या संस्थेच्या दशकपूर्ती सोहळा निमित्त सांगेली केंद्रशाळेत आयोजित रक्तदान शिबिर आणि रक्तदाता सन्मान सोहळ्यात दयानंद गवस बोलत होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ लक्ष्मण राऊळ, सांगेली सरपंच लवू भिंगारे, सिंधुदुर्ग बँक संचालक रविंद्र मडगावकर, सैनिक पतपेढीचे चेअरमन तथा माजी सैनिक बाबुराव कविटकर, महाव्यवस्थापक सुनिल राऊळ, ऑन कॉल रक्तदाते सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, उपसरपंच संतोष नार्वेकर, केंद्रशाळा मुख्याध्यापक बाबली चिले, वामन नार्वेकर, बबन सांगेलकर, दीपक सांगेलकर, अजय गोलतेकर व कुटूंबीय गोवा, संजीव मोहिते, माजी सैनिक आनंद राऊळ, शशिकांत पाटकर, अंकुश राऊळ, अजित राऊळ, मिलिंद राऊळ, आनंद राऊळ, प्रकाश राऊळ, प्रमोद कदम, विनायक सावंत, अमित राऊळ, रमेश सावंत, रविंद्र तावडे, अनंत सावंत, विजय ठाकर, मोहिते, सागर सांगेलकर, गुरुप्रसाद राऊळ, महेश राऊळ उपस्थित होते.यावेळी पंढरीनाथ राऊळ यांनी युवा विकास प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असून या प्रतिष्ठान मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सांगेली गावाची ओळख ही रक्तदात्यांचे गाव अशी निर्माण झाली असल्याचे सांगितले. यावेळी महेश रेमुळकर यांनी कॉलेजमध्ये एका वर्गात बसणाऱ्या मित्रांनी एकत्र येऊन ९ वर्षांपूर्वी लावलेल्या युवा विकास प्रतिष्ठान या रोपट्याचे आज वटवृक्षांमध्ये रूपांतर होत असल्याचे सांगून सध्याच्या काळात रक्ताची वाढती गरज लक्षात घेता रक्तदानासाठी तरुणांना पुढे येण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही प्रतिष्ठानच्या रक्तदान चळवळीतील कार्याचे कौतुक केले.
२५० रक्तदात्यांचा विशेष सन्मान
या कार्यक्रमात युवा विकास प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या १० वर्षांपासून नियमित रक्तदान करणाऱ्या आणि तातडीच्या वेळी गोवा, ओरोस, कसाल, कोल्हापूर, बेळगांव येथे रक्तदान करणाऱ्या २५० हून अधिक नियमीत रक्तदात्यांना 'रक्तदाता गौरव सन्मानचिन्ह' देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्वाधिक वेळा रक्तदान करणाऱ्या महिला व तरुण रक्तदात्यांसह सांगेली दशक्रोशीमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करणाऱ्या मित्रसंस्था आणि मंडळांनाही गौरविण्यात आले. या सर्व रक्तदात्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. प्रतिष्ठानच्या या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय डॉ. अभिषेक कांबळे, रक्तपेढी तंत्रज्ञ श्रीम. प्रियांका रेडकर, श्रीम. बागेवाडी, अनिल खाडे यानी रक्त संकलन केले. यावेळी युवा विकास प्रतिष्ठानचे सदस्य पंढरी सावंत, लक्ष्मण रेमुळकर, पुंडलिक राऊळ, गिरिधर राऊळ, गुरुनाथ कुंभार, आशिष अमरे, सागर राऊळ, राजन कुंभार, मानेत डिसोजा, शिवप्रसाद सावंत, संतोष सावंत, संस्थेचे सहकारी उमेश राऊळ, समीर सावंत, स्वप्निल जाधव, बबलू राऊळ , राजेश राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा विकास प्रतिष्ठानचे सदस्य महेश रेमुळकर, सूत्रसंचालन प्रा. रामचंद्र राऊळ यांनी तर आभार संस्थेचे सदस्य सचिन राऊळ यांनी मानले.