देवगणहट्टीत जलकुंभचे काम अद्याप अर्धवट
तरीही जलकुंभचे काम पूर्ण झाल्याचा फलक उभारल्याने शासनाच्या गलथान कारभाराबद्दल आश्चर्य
वार्ताहर/धामणे
देवगणहट्टी येथे जलजीवन अभियान अंतर्गत शासनाकडून जलकुंभ निर्माण करण्यासाठी 2020 साली मंजूर झाले होते. गेली पाच ते सहा वर्षे झाली तरी हा जलकुंभ आजही अर्धवट अवस्थेत पडून आहे. परंतु गेल्या 15 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जुन्या जलकुंभशेजारी 2020 साली मंजूर झालेला जलकुंभ पूर्ण झाल्याच्या माहितीचा फलक उभारण्यात आल्याने देवगणहट्टी व परिसरात शासनाच्या या गलथान कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. धामणे ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील देवगणहट्टी येथे जलजीवन अभियान अंतर्गत शासनाकडून 2020 साली नव्याने जलकुंभ निर्माण करण्यासाठी 28 लाख रुपये मंजूर झाले होते. हे जलकुंभ निर्माण करण्यासाठी देवगणहट्टी येथील शिवलिंगय्या मास्तमर्डी या शेतकऱ्याने आपल्या शेतातील सर्व्हे क्रमांक 461 मध्ये जागा दिली आणि जलकुंभ कामाला सुरुवात झाली. परंतु जलकुंभचे कॉन्ट्रॅक्टर बसवराज हुली हे काम अर्धवट करून सोडून गेले आहेत. परंतु आता दहा-बारा दिवसांपूर्वी हे जलकुंभ पूर्ण झाल्याचा माहिती फलक मात्र 15 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जलकुंभ शेजारी उभारला आहे. त्यामुळे देवगणहट्टी गावात हा चर्चेचा विषय बनला असून याबद्दल येथील नागरिकांनी लोकप्रतिनिधींना माहिती दिली. लोकप्रतिनिधींनी शासकीय अधिकाऱ्यांची या प्रकाराबद्दल कानउघाडणी केल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.