ओटवणे घाटरस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत
रस्त्यालगत खोदलेल्या मोठ्या चरामुळे अपघाताची शक्यता
ओटवणे प्रतिनिधी
चराठा - ओटवणे घाटरस्त्या दरम्यान संरक्षक भिंत बांधकामाच्या पायासाठी मोठा चर खोदण्यात आला. परंतु महिना उलटूनही अद्याप कामाचा पत्ता नाही. त्यामुळे घाट रस्त्यातील या धोकादायक वळणावरील रस्त्यालगतचा चर हा धोकादायक ठरला असून अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचा संबंधित ठेकेदाराने याची तात्काळ दखल घेऊन एकतर हा धोकादायक चर बुजवावा किंवा तात्काळ संरक्षक भिंतीच्या कामास सुरुवात करावी अशी मागणी या भागातील वाहन चालकांमधून होत आहे.ओटवणे दशक्रोशीत वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग असून हा रस्ता पुढे दोडामार्ग तालुक्यात जातो. ओटवणे दशक्रोशीतील जनतेला सावंतवाडीत येण्या जाण्यासाठीही हा सर्वात जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. चराठा - ओटवणे घाटरस्त्यातील अनेक धोकादायक वळणांचे यावर्षी रुंदीकरण तसेच संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे वाहन चालकांमध्ये समाधान होते. मात्र याच घाट रस्त्यातील यु आकाराच्या वळणानजीक संरक्षक भिंतीच्या कामासाठी चर खोदण्यात आला. याला एक महिना होऊनही कामाचा पत्ताच नाही. धोकादायक वळणावरील रस्त्यालगतचा हा चर अपघाताला निमंत्रण देणारा आहे. गेल्या महिन्याभरापासून हे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे संबंधित खात्यासह ठेकेदाराने याची तात्काळ दखल घेऊन त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी ओटवणे दशक्रोशीतील वाहन चालकांमधून होत आहे.