ईश्वराच्या मायेचं काम दोन प्रकारे चालते
अध्याय सहावा
माणसाच्या दैनंदिन जीवनात अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या आणि त्यातील ईश्वरी अस्तित्व जाणवणाऱ्या गोष्टींचा परिचय बाप्पांनी राजाला करून दिला पण मनुष्य ईश्वराचे त्याच्या शरीरातील असलेले अस्तित्व मान्य करत नाही. कारण त्याच्यात आणि ईश्वरात असलेला मायेचा पडदा त्याला तसे करु देत नाही. सर्वसामान्य मनुष्य मायेच्या प्रभावाखाली असल्याने त्याला माझी भेट होत नाही असे बाप्पा सांगत असलेला न मां विन्दति पापीयान्मायामोहितचेतनऽ । त्रिविकारा मोहयति प्रकृतिर्मे जगत्त्रयम् ।। 11 ।। श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार मनुष्याचं जीवनचक्र कोरडं आणि रसहीन होऊ नये म्हणून मायेचं आवरणही ईश्वरानं घातलेलं आहे. मायेचं काम दोन प्रकारे चालते. पहिल्यांदा ती माणसाला भोगविलासाचे आकर्षण दाखवते, त्यामुळे मनुष्य त्यात आकंठ बुडून जातो. इतका की, भोग भोगून भोगून शेवटी त्याला त्यांचा कंटाळा येतो आणि आता पुरे असे त्याला वाटू लागते. येथून मायेचे दुसऱ्या प्रकारचे काम सुरु होते. ते असे, भोग भोगून कंटाळलेला मनुष्य त्यातून मिळणारे सुख हे तात्पुरते आहे अशा निष्कर्षाला आलेला असतो. त्यामुळे तो कायम टिकणारे सुख कुठे आहे ह्याचा शोध घेऊ लागतो. त्यातून त्याच्या हे लक्षात येते की, ईश्वर प्राप्तीत खरे सुख आहे. त्यानुसार त्यांची पुढे वाटचाल सुरु होते.
मायेच्या प्रभावाखाली असलेल्या सामान्य माणसात सत्व, रज, तम ह्या गुणांपैकी प्रसंगानुसार त्यातील एक इतर दोघांपेक्षा वरचढ ठरत असतो. उदाहरणार्थ दुसऱ्याला उपदेश करताना सत्वगुण प्रभावी असतो. स्वत:चा फायदा करून घ्यायचा असला की, रजोगुण प्रभावी असतो. स्वत:ची चुक आहे असं ढळढळीत दिसत असलं तरी माझंच कसं बरोबर आहे हे तावातावाने सांगत असताना त्याच्यातील तमोगुण जोर करत असतो. ईश्वराची अशी इच्छा असते की, मनुष्याने त्रिगुणांचा वापर तारतम्याने करावा. हे तारतम्य बाळगण्यासाठी त्यानं या तिन्ही गुणांच्याही पलीकडे असलेल्या ईश्वराला ओळखावं आणि या त्रिगुणांच्या साम्यावस्थेत राहून त्यांच्या प्रभावातून बाहेर पडावं म्हणजे त्याला ईश्वरस्वरूप होता येईल व त्याचे जीवन धन्य होईल. मनुष्य योनीत जन्माला आलेल्या जीवाने स्वत:चा उद्धार करून घ्यावा. निदान त्या दृष्टीने प्रयत्न तरी चालू करावेत अशी ईश्वराची इच्छा असते. त्यासाठी देवाने माणसाला विचार आणि आचार स्वातंत्र्य दिलेले आहे. भोगविलासाला कंटाळलेल्या माणसाने उद्धाराच्या दिशेने आपला प्रवास कसा होईल ह्यावर विचार करून त्याप्रमाणे आचरण करणे देवाला अपेक्षित आहे.
बालपणी म्हणजे मनुष्य जन्माला आल्यावर ईश्वराने नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये हे तिन्ही गुण एकसारख्या प्रमाणात असतील अशी योजना केलेली असते पण पुढे मोठेपणी काही लोक स्वार्थी व संधीसाधू निघतात. त्यांच्यात रज किंवा तम गुणाचे आधिक्य असते. त्यामुळे त्यांना त्यांनी जीवनात मिळवलेले यश स्वत: मिळवले आहे असा भ्रम होतो. वास्तविक पाहता सर्वच प्राणिमात्रांच्या नाड्या ईश्वराच्या हातात असतात आणि तोच सर्वांचे विधिलिखित ठरवत असतो. ज्यांच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते. ते सत्वगुणाची वाढ करून त्यांच्यातील रज व तम गुणांचे अस्तित्व निष्प्रभ करून टाकतात पण ज्यांना ईश्वरी अस्तित्वाबद्दल शंका असते ते स्वत:चा स्वार्थ साधण्यात किंवा त्यांचे म्हणणे इतरांवर लादण्यात गुंग असल्याने त्यांच्यातील सत्व गुणाचा लोप होऊन रज व तम गुणाचे आधिक्य होते आणि ते मायेच्या बंधनात सापडतात. जीवनात निर्माण झालेल्या सुखदु:खात त्याबद्दल वाटणाऱ्या आसक्तीपोटी गुंतत जातात आणि जन्ममृत्युच्या फेऱ्यात अडकतात.
क्रमश: