‘मातोश्री’वरील शब्द मागे फिरणार नाही; सांगली लोकसभेचे मैदान मारणार- चंद्रहार पाटील
विरोधकांनी विचारानेच लढावे
सांगली प्रतिनिधी
शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि माझ्यामध्ये फक्त ‘मातोश्री’ आहे. अन्य कोणताही नेता नाही. मातोश्रीमध्ये ठाकरे यांनी मला उमेदवारीचा शब्द दिला आहे. तो पूर्ण होणारच. मातोश्रीवरून आलेला शब्द मागे फिरणार नाही. सांगली लोकसभा शिवसेनाच लढणार असा ठाम विश्वास शिवसेनेचे लोकसभा संघटक डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला. सांगली शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
हेही वाचा >>> भाजपचे पुन्हा संजयकाकाच उमेदवार; समर्थकांमध्ये उत्साह !
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना ठाकरे गटातील प्रवेशानंतर सांगलीत ठाकरे गट रिचार्ज झाला आहे. पैलवान चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा ठाकरे गट शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा सांगलीवाडीत पार पडला. यामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याची आक्रमक भुमिका जाहीर केली. यावेळी बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले, ठाकरे यांनी लोकसभा उमेदवारीबाबत शब्द दिला आहे. याचा साक्षीदार ‘मातोश्री’ असून कोणत्याही परिस्थितीत सांगलीची लोकसभा निवडणूक आपण लढवणारच आणि ती जिंकणार देखील आहे. चंद्रहार पाटलांबरोबर लढताना विचाराने लढा, दुसऱ्या कोणत्याही भानगडीत पडू नका, आपण कुठेच तुम्हाला अडवणार नाही आणि कमी पण पडणार नाही, असा इशारा दिला.
चंद्रहार पाटील म्हणाले की, मला सातत्याने विचारणा करण्यात आली. कोणताही पक्ष नसल्याने त्यामुळे सातत्याने काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होतो. काहींनी विचारलं बैलगाडी स्पर्धा भरून मते मिळतात का? पण मी काहीतरी करू शकतो. मात्र, निक्रिय नाही. गेल्या दोन वर्षापासून मी नुसताच फिरत होतो. मात्र माझ्या फिरण्याला शिवसेनेनं आधार दिला. तो मी कधीच विसरणार नाही. ते पुढे म्हणाले की, मला आदेश असल्याने फारसं बोलता येणार नाही. मात्र, मी फार काळ शांत राहू शकत नाही. कारण आता पैलवान आणि शिवसेना एकत्र आले आहेत. त्यामुळे चंद्रहार पाटलांशी लढताना विचार करून लढा, असे आव्हान त्यांनी दिले. आपल्यावर विश्वास टाकला तो विश्वास पात्र ठरवण्याचा आपण प्रयत्न करणार असून सांगली लोकसभेची जागा शंभर टक्के जिंकणार असल्याचे ते म्हणाले.