कुंडलिनीशक्तीचे प्रताप
भगवंत म्हणाले, ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणाऱ्या योग्याने शांत अंत:करणाने, निर्भय होऊन, माझ्या ठिकाणी चित्त ठेवून, मनावर संयम ठेवून आसनावर बसावे. सद्गुरूंचे स्मरण करून चित्त व इंद्रिये यांच्या क्रियांचे नियमन करून योगाभ्यासास सुरवात करावी. ह्या अर्थाचा शांत निर्भय मच्चित्त ब्रम्हचर्य-व्रती स्थिर । मन रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण ।।14।। हा श्लोक आपण पहात आहोत. श्लोकाचे विवरण करताना माउली म्हणतात, योगाभ्यास उत्तम जमू लागला की, उडीयानबंध साधला जातो. अशाप्रकारे दीर्घकाळ सराव केल्यावर आसनसिद्धी होऊन अनुभव येऊ लागतो. मूलबंधात कोंडला गेलेला अपानवायू ऊर्ध्वगतीने माघारा फिरून मणिपूर चक्राला धक्के देतो. ह्या प्रक्रियेमध्ये तो रोगांचा नाश करतो आणि शरीरातील पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश एकात एक कालवतो. दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागृत करते.
जागृत झालेली कुंडलिनी शक्ती तिचे प्रताप दाखवायला सुरवात करते. आधीच तिला पुष्कळ दिवसांची भूक लागलेली असते. त्यामुळे ती चवताळते आणि उलटे तोंड सरळ करून हृदयकोशाच्या खाली असलेल्या वायूला खाऊन टाकते. मुखाच्या ज्वाळांनी ती तेथील सर्व जागा व्यापते आणि मांसाचे घास घ्यायला लागते. ज्या ज्या ठिकाणी मांसल भाग असेल त्या ठिकाणी वरच्यावरच मोठा लचका तोडते शिवाय हृदयाच्या ठिकाणचे सुद्धा एक दोन घास घेते. नंतर तळहात व तळपाय शोधून त्यातील रक्त, मांस खाऊन वरच्या भागाचे भेदन करते व प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा घेते. आपले ठिकाण न सोडता नखातले सत्व देखील काढून घेते. त्वचा धुवून पुसून त्या त्वचेला हाडांच्या सापळ्यास चिकटवून ठेवते. हाडांच्या नळ्या निरपून घेते व शिरांच्या काड्या ओरपून घेते. त्यावेळी बाहेरच्या केसांची वाढ होण्याची शक्ती जळून जाते. मग तहानेने पीडित असलेली कुंडलिनी शक्ती सप्तधातूंना एका घोटात पिऊन टाकते. त्यामुळे शरीरात जिकडे तिकडे खडखडीत उन्हाळा करते. दोन्ही नाकपुड्यातून बारा बोटे वहात असलेल्या वायूला गच्च धरून त्यास आत खेचते. असे झाले की, खालचा अपानवायु वरती आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायु खाली खेचला जातो. त्या प्राणापानांच्या भेटीमध्ये षट्चक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात. अशा परिस्थितीत प्राण व अपान या दोहोंचा मिलाफ व्हायला हवा परंतु क्षोभलेली कुंडलिनी त्यांना म्हणते, तुम्ही इथे काय करताय? इथून चालते व्हा. तिने असे फर्मावल्यामुळे ते रोधले जातात आणि एकमेकात न मिसळता आहेत तेथेच थांबतात. नंतर कुंडलिनी पृथ्वीसंबंधी सर्व धातु खाऊन काहीएक शिल्लक ठेवत नाही आणि पाण्याचा भाग तर केव्हाच चाटून पुसून टाकते. याप्रमाणे पृथ्वी व जल ही दोन्ही भूते खाल्ल्यावर तिची संपूर्ण तृप्ती होते. आणि मग ती शांत होऊन सुषुम्नेजवळ रहाते. ती आता तृप्त होऊन समाधानी झाल्यावर तोंडाने जे गरळ ओकते त्या गरळरूपी अमृताच्या योगाने प्राणवायु जगतो.
तो गरळरूपी अमृताचा अग्नी तिच्या तोंडातून निघतो खरा परंतु तो शरीरात कुठेही दाह निर्माण न करता आत व बाहेर थंडावा निर्माण करू लागतो, त्यामुळे सर्व गात्रांची गेलेली शक्ती पुन्हा येऊ लागते. नाड्यांचे वहाणे बंद पडते व वायूचे नऊ प्रकार संपल्याने शरीराचे धर्म रहात नाहीत. इडा व पिंगळा ह्या दोन्ही नाड्या एक होतात आणि तिन्ही गाठी सुटून सहा चक्रांचेही पदर फुटतात.
क्रमश: