महिलेला हवी होती किडनी, युवकाला होता कॅन्सर
कॅन्सरने ग्रस्त युवक आणि किडनीच्या समस्येने त्रस्त एका महिलेने परस्परांशी एक करार केला होता. या करारात दोघांचा विवाहही सामील होता. मग अटींवर विवाह करूनही दोघेही कधी परस्परांच्या प्रेमात पडले हे त्यांनाच कळले नाही. चीनमधील किडनीच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या एका महिलेने कॅन्सर रुग्णाशी विवाह केला. हा विवाह दोघांनी परस्परांशी एका अटीवर केला होता. कॅन्सरने मृत्यू झाल्यावर पती स्वत:ची किडनी पत्नीला दान करेल, अशी अट होती. तर कॅन्सर रुग्णाचा मृत्यू होईपर्यंत महिला स्वत:च्या पतीची सेवा करत राहिल्। अशी त्याची अट होती.
अनोखी प्रेमकहाणी
जसजसा काळ उलटत गेला, दोघांदरम्यान एक बॉन्डिंग तयार होऊ लागले. मग हळूहळू हे अनपेक्षित प्रेमकहाणीत बदलले. आता या कहाणीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शांक्सी प्रांतातील 24 वर्षीय वांग जियाओला यूरीमिया आजार झाला होता. किडनी प्रत्यारोपणाशिवाय ती एक वर्षाहून अधिक काळ जगू शकत नसल्याचे तिला सांगण्यात आले होते. स्वत:च्या नातेवाईकांकडून कुठलाही दाता न मिळाल्याने हताश वांगने एक अनपेक्षित पाऊल उचलले. तिने एकाच्या सल्ल्यानुसार कॅन्सर सहाय्य समुहात विवाहाची जाहिरात प्रकाशित केली. यात तिने एका अशा असाध्य रुग्ण पुरुषाचा शोध सुरु केला, जो तिच्याशी विवाह करण्यास तयार असेल, जेणेकरून त्याच्या निधनानंतर ती त्याची किडनी प्राप्त करू शकेल.
विवाहासाठी केली पोस्ट
वांगने स्वत:च्या जाहिरातीत विवाहानंतर मी तुमची सर्वात चांगली काळजी घेईन, मला माफ करा, मी केवळ जगू इच्छिते असे नमूद केले होते. काही दिवसांनी 27 वर्षीय यू जियानपिंगने तिच्या या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली. तिचा रक्तगट यू जियानपिंगशी मॅच झाला. यू पॅन्सरला तोंड देत होता, तो एकेकाळी बिझनेस मॅनेजर होता. त्याच्या पित्याने मुलाच्या उपचारासाठी स्वत:चे घर विकले होते. तो केवळ औषधांमुळेच जिवंत होता. जुलै 2013 मध्ये दोघांनी गुपचूपपणे स्वत:च्या विवाहाची नोंदणी करविली. ते स्वत:च्या विवाहाबद्दल गुप्तता बाळगणे, स्वत:च्या वित्तीय स्थितीचे व्यवस्थापन स्वत: करण्यावर सहमत झाले आणि यू च्या निधनानंतर तो स्वत:ची एक किडनी वांगला दान करेल, असे ठरले.
देखभाल करण्याची अट
किडनीच्या बदल्यात वांगने त्याच्या उपचारादरम्यान देखभाल करण्याचे आश्वासन दिले. परंतु हा करार प्रारंभी केवळ परस्परांचे जीवन वाचविण्यासाठी करण्यात आला होता. मग हळूहळू हे दृढ बंधात बदलले आणि दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले. दोघेही दररोज बोलू लागले. स्वत:च्या आरोग्य आणि जीवनाविषयी अपडेट शेअर करू लागले. वांगचा चंचल स्वभाव यू च्या जीवनात हास्य आणत होता आणि त्याच्या उत्साहामुळे यूचे मनोबल वाढले. त्याने तिच्यासाठी सूप तयार करण्यास सुरुवात केली, आणि ती प्रत्येक उपचारात त्याच्यासोबत जायची.
पतीसाठी विकू लागली फुलं
यूच्या बोन मॅरो प्रत्यारोपणाचा खर्च उचलण्यास मदत करण्यासाठी वांगने रस्त्यांवर एका स्टॉलवर फुलांचे गुच्छ तयार करून विकण्यास सुरुवात केली. तिने फुलांसोबत कार्डही ठेवले. ज्यावर त्यांची कहाणी लिहिली होती. यामुळे ग्राहक आणि स्थानिक दुकानदारांचीही गर्दी होऊ लागली. स्वत:ची विक्री आणि बचतीच्या माध्यमातून ती 5 लाख युआन जमविण्यास यशस्वी ठरली, ही रक्कम यूच्या शस्त्रक्रियेसाठी पुरेशी होती. जून 2014 पर्यंत यूची स्थिती स्थिर झाली होती आणि वांगच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. तिचे डायलेसिस सेशन आठवड्यातून दोनवेळा पासून कमी होत महिन्यात एकदा झाले होते. तसेच डॉक्टरांनी आता तिला प्रत्यारोपणाची अजिबात गरज नसेल, असे संकेत दिले होते.
दोघेही आता तंदुरुस्त
फेब्रुवारी 2015 मध्ये स्वत:चे प्रेम आणि पुन्हा स्वस्थ होण्याच्या आनंदाप्रित्यर्थ या जोडप्याने एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये प्रीतिभोजनाचे आयोजन पेले, त्यांच्या कहाणीला नंतर विवा ला विडा या चित्रपटात रुपांतरित करण्यात आले. ज्याचा प्रीमियर मागील वर्षी चीनमध्ये झाला. या चित्रपटाने आतापर्यंत 276 दशलक्ष युआनहून अधिक कमाई केली आहे. आता हे दांपत्य शांक्सी प्रांतातील शियान येथे एका फुलांचे दुकान चालविते तसेच शांततेत जीवन जगत आहे.