For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Political News | सारा गाव मामाचा एकही नाही कामाचा

12:50 PM Jun 02, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
political news   सारा गाव मामाचा एकही नाही कामाचा
Advertisement

मंत्री विनायकराव पाटील शिंदे सेनेत 

Advertisement

चापोली : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर-चाकूर मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री व माजी आमदार विनायकराव पाटील यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. या मतदारसंघाचे नेतृत्व राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे करत असून ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत तर महायुतीचे मंत्री म्हणूनही सरकारमध्ये कार्यरत आहेत.

तसेच या मतदारसंघात भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्यासह अनेक नेते राजकीय स्तरावर असलेले नेते आहेत. परंतु, या नेत्याचा प्रत्यक्षात मतदारांना कुठलाही फायदा नसल्याचे दिसून येते. मतदारसंघातील शेतकऱ्यांना यावर्षीच्या पीक विम्यापासून वंचित राहावे लागले.

Advertisement

त्यामुळे महायुतीतील मोठे नेते या मतदारसंघात असले तरी प्रत्यक्षात या नेत्यांचा जनतेस (शेतकऱ्यास) काहीच उपयोग होत नसल्याने 'सारा गाव मामाचा, एकही नाही कामाचा' असेच मतदारसंघातील नागरिकांतून बोलले जात आहे.

लातूर जिल्ह्यातील इतर मतदारसंघापेक्षा अहमदपूर हा जागरूक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात विद्यमान आमदार पुन्हा निवडून येत नाही, अशी परंपरा आहे. परंतु, या निवडणुकीत अपवादात्मक परिस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे दुसऱ्यांदा निवडून आले. त्यानंतर पक्षाने दखल घेत त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड केली.

अजितदादा पवार गटाचे ते एक पॉवरफुल्ल मंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यात ओळख निर्माण केलेली असताना त्याच मतदारसंघातील त्यांचे प्रतिस्पर्धी माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

एवढेच नव्हे तर जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण एकदा शब्द दिला की, माघार घेत नाही असे सांगून एक प्रकारे राज्यातील सत्तेचे अधिकारच विनायकराव पाटील यांना जाहीर सभेत दिले. वास्तविक या मतदारसंघात बाबासाहेब पाटील यांचे वर्चस्व असताना महायुतीत मिठाचा खडा टाकण्यासारखी खेळी एकनाथ शिंदे यांनी केल्याचे जाहीरपणे बोलले जाते.

येणाऱ्या काळात मतदारसंघात विकासकामांऐवजी सत्ताधारी पक्षातच अडवाअडवीचे प्रकार यापुढे सातत्याने होतील. एवढेच नव्हे तर मतदारसंघातील शेतकऱ्यांना २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा विमा मिळाला नाही. विमा कंपन्या टाळाटाळ करत आहेत. येणाऱ्या काही दिवसात पेरणी सुरू होतील.

आता शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत असताना सत्ताधारी पक्षातील गटातटात यापुढील राजकारण होणार असल्याने मतदारसंघात यापुढील काळात शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. मतदारसंघात एखादे काम झाले तर आमच्याच प्रयत्नाने झाले असून श्रेयवादाची लढाई यापुढील काळात मतदारसंघात पाहावयास मिळणार आहे.

त्यामुळे काही प्रमाणात मतदारसंघातला होत असलेल्या विकासाला यामुळे आपोआपच खिळ बसेल व मतदारसंघात विकासाची कामे होणार नाहीत, अशी शक्यता सर्वसामान्यांतून व्यक्त करण्यात येत आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदारसंघात विरोधक नसले तरी सत्ताधाऱ्यातच विरोधाचे राजकारण पाहायला मिळणार आहे.
 

Advertisement
Tags :

.