संपूर्ण देश राममय, रामराज्यात जनताच राजा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आंध्र प्रदेशात उद्गार, रामाचा आदर्श पाळण्याचा निर्धार
वृत्तसंस्था / लेपाक्षी
‘आज सारा देश राममय झाला आहे. जणू देशात रामराज्य अवतरले आहे. या रामराज्याचा राजा जनताच आहे,’ असे भावपूर्ण उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील एका कार्यक्रमात काढले असून महात्मा गांधींनाही या देशात रामराज्यच हवे होते, असे प्रतिपादनही त्यांनी या कार्यक्रमात केले आहे.
राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थ अकादमीच्या उद्घाटन कार्यक्रमात भाषण करीत होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मूळ विषयाला धरुन रामायणाचाही उल्लेख केला. या अकादमीला प्रभू रामचंद्रांच्या जीवनापासून पुष्कळ काही शिकता येईल. भगवान रामांचा आदर्श या अकादमीला योग्य आहे. असे प्रतिपादन करताना त्यांनी रामायणातील एक संवादही उधृत केला.
राम आणि भरताचा संवाद
भगवान राम भरताला संदेश देतात, की, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू कोणतेही काम विनाविलंब करतोस. त्यामुळे प्रत्येक काम लवकरात लवकर पूर्ण होते आणि त्यासाठी खर्चही कमी येतो. वेळेवर कामे पूर्ण करण्याचे अनेक लाभ असतात. हा संवाद स्पष्ट करुन त्यांनी केंद्र सरकारही गेली 10 वर्षे प्रभू रामचंद्रांच्या याच आदर्शाचे पालन करीत आहे, असे स्पष्ट केले. यामुळे या कालावधीत असंख्य प्रकल्प आम्ही वेळेत पूर्ण केले. परिणामी, त्यांना खर्च कमी आला आणि त्यांच्यापासून परतावाही लवकर मिळू लागला. आमचे सरकार त्याच्या प्रत्येक कृतीत रामाचा आदर्श पाळण्याचा प्रयत्न करते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
जनता राजा, जनता प्रजा
आज देशात सर्वांनाच अयोध्येतील भव्य राममंदिराची उत्सुकता आहे. प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची सर्वजण आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. देशात रामराज्य अवतल्याचे दिसत आहे. अशा रामराज्यात प्रजाचा राजा असते आणि तीच प्रजा असते. असे राज्य या देशात आणण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत, अशीही मांडणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात केली.
अनेक आर्थिक सुधारणा
गेल्या 10 वर्षांमध्ये देशात अनेक आर्थिक सुधारणा करण्यात आल्या. वस्तू-सेवा करासारखी आधुनिक प्रणाली देशात लागू केली आहे. प्राप्तीकरात मोठी सूट देण्यात आली आहे. आज योग्य प्रकारे गुंतवणूक केली, तर वाषिर्क 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होऊ शकते. यामुळे जनतेच्या दीड लाख कोटी रुपयांच्या कराची बचत झाली आहे. संकलित केलेल्या कराचा योग्य विनियोग होत आहे, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे अधिकाधिक लोक आता कर भरण्यास प्रवृत्त झाले आहेत. त्यामुळे करसंकलन मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
वीरभद्र मंदिरात पूजाआर्चा
आंध्र प्रदेशातील लेपाक्षी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीरभद्र मंदिरात पूजाआर्चा केली आहे. तसेच रंगनाथ रामायणातील ओव्यांचेही श्रवण केले. हे रामायण तेलगु भाषेत असून ते या राज्यात अत्यंत लोकप्रिय आहे. वीरभद्र हा भगवान शंकरांचा उग्रावतार म्हणून मानला जातो. हे मंदीर विजयनगर शैलीतील असून ते 16 व्या शतकात निर्माण करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.
लेपाक्षीचे महत्व
आंध्र प्रदेशातील लेपाक्षीचे रामायणात मोठे महत्व आहे. सीतामातेचे रावणाकडून अपहरण झाल्यानंतर तिच्या शोधार्थ निघालेल्या प्रभू रामचंद्रांची याच स्थानी जटायूशी भेट झाली होती. जटायूनेच त्यांना सीतेचे अपहरण कोणी केले याची माहिती देऊन प्राणत्याग केला होता, असे रामायणात स्पष्ट करण्यात आले आहे.