For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सारा देश हाच माझा परिवार !

06:58 AM Mar 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
सारा देश हाच माझा परिवार
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लालू यादवांच्या आरोपांचा चोख समाचार : भाजपचाही हल्लाबोल

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

‘सारा देश हाच माझा परिवार आहे. काही लोक म्हणतात मला कुटुंबच नाही. पण या देशातील 140 कोटी लोक हे माझे कुटुंबीय आहेत. त्यांच्या हितासाठी मी अखंड कार्यरत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. रविवारी बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांनी जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदी यांना परिवारच नाही, अशी खोचक टिप्पणी केली होती. या टिप्पणीला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Advertisement

भारतीय जनता पक्षानेही लालू यादव यांच्या या टिप्पणीला कृतीने प्रत्युत्तर दिले आहे. या पक्षाच्या अनेक नेत्यांनी आपल्या इंटरनेट माध्यमांवर तशा प्रकारचा मथळा टाकून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवारातीलच आहोत, असे दर्शवून दिले आहे. लालू यादव यांच्यावर हल्लाबोल करताना भारतीय जनता पक्षानेही सर्व देशच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिवार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तेलंगणातील सभेत प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिलाबाद येथे एका जाहीर सभेत लालू यादव यांचा समाचार घेतला. ‘मी ज्यावेळी घराणेशाही आणि परिवारवादावर टीका करतो, तेव्हा काही लोक मला परिवारच नाही, अशी टिप्पणी करतात. भारताच्या राजकारणाला परिवारवादाचा अडथळा निर्माण झाला आहे. लोकांनाच आता घराणेशाही नोकशी झालेली आहे. अशा स्थितीत मला परिवार नसल्याची भाषा करणे हास्यास्पद आहे. सारा देशच माझा परिवार असून या देशातील 140 कोटी लोक हेच माझे कुटुंबिय आहेत, असा प्रतिपादन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले. या सभेत त्यांनी केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांच्या काळात गरीब जनतेसाठी कोणत्या योजना आणल्या, तसेच त्यांचे परिणाम म्हणून गरीबांची परिस्थिती कशी सुधारली, याची माहिती दिली. या कालावधीत केंद्र सरकारने पूर्ण केलेले विकास प्रकल्पांमुळे पैशाची मोठी बचत झाली आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

काय म्हणाले होते लालू यादव

पाटणा येथील रविवारच्या सभेत लालू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती, असा आरोप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परिवारवादावर टीका करतात. पण त्यांना मुले का झाली नाहीत, याचे कारण त्यांनी स्पष्ट करावे. त्यांच्याकडे परिवारच नाही, त्यांना परिवारवादावर टीका करण्याचा अधिकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदूही नाहीत. त्यांच्या मातेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी आपले केस कापून क्षौर करुन घेतले नव्हते. यावरुन ते हिंदू नाहीत हे सिद्ध होते, अशी टीका त्यांनी केली होती.

भाजपचे जोरदार अभियान

लालू यादव यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार अभियान हाती घेतले आहे. या पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या एक्स, इन्स्टाग्रॅम किंवा अन्य सोशल मिडिया खात्यांवर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिवार’ असा मथळा टाकला आहे. आम्ही सर्व त्यांच्या परिवारातीलच आहोत, असा संदेश या मथळ्यातून साऱ्या देशात दिला जाणार आहे. लालू यादव यांचे बोल विरोधी पक्षांच्या अंगावर उलटविण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी साऱ्या देशाचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली दिवाळी दरवर्षी सीमेवरील सैनिकांच्या समवेत साजरी करतात. त्यांनी त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना सोडून साऱ्या देशासाठी त्याग केला आहे. आपला पूर्ण वेळ ते देश या आपल्या परिवारासाठी व्यतीत करतात. अशा देशभक्त नेत्यासंदर्भात ‘तुम्हाला परिवारच नाही’ अशी भाषा करणे हा उद्धटपणा आहे, अशा अर्थाची टीका सुधांशू त्रिवेदी यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.