अख्खी पॅरिस नगरी झाली ऑलिम्पिकमय
परंपरेला छेद देत नदीतून झालेले खेळाडूंचे संचलन ठरले खास आकर्षण, रंगीबेरंगी सोहळ्यात संपूर्ण विश्व दंग
वृत्तसंस्था/ पॅरिस
ऑलिम्पिकच्या पॅरिसमधील अपारंपरिक उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सीन नदीतील खेळाडूंचे संचलन हे राहिले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक यांच्यावर कॅमेरा केंद्रीत होऊन या शोची सुऊवात झाली. त्यानंतर विश्वचषक विजेत्या संघातील फुटबॉलपटू झिनेदिन झिदानला पूर्वी चित्रीत केलेल्या व्हिडीओमध्ये ऑलिम्पिक मशालसह पॅरिसच्या रस्त्यावर धावताना दाखविण्यात आले.
सहा किलोमीटरची परेड ऑस्टरलिट्झ ब्रिजपासून सुरू झाली आणि जमलेल्या गर्दीकडून होणाऱ्या जयजयकारात 85 बोटींनी 6800 हून अधिक अॅथलीट्सना वाहून नेले. अनेक खेळाडूंना मात्र शनिवारी असलेल्या स्पर्धांमुळे या परडेमध्ये सहभागी होता आले नाही.
पथकांच्या आगमनाचा क्रम फ्रेंच वर्णमालेनुसार होता. प्रथम ग्रीक दल आले, त्यानंतर निर्वासितांचा संघ आला. यजमान देश या नात्याने फ्रान्स सर्वांत शेवटी येऊन त्यांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. 2028 च्या ऑलिम्पिकचे यजमान अमेरिकेचा चमू फ्रान्सच्या आधी आला, तर 2032 च्या खेळांचे यजमान ऑस्ट्रेलियाचे पथक अमेरिकेच्या आधी आले.
पाच वर्षांपूर्वी आगीत जळून खाक झालेले नोट्रे डेमचे पुनरुज्जीवित कॅथेड्रल, विश्वविख्यात लूव्रे म्युझियम यासह शहरातील काही प्रसिद्ध स्थळे तसेच खेळांतील स्पर्धांची काही ठिकाणे यांच्याजवळून या नौका गेल्या. जमलेल्या गर्दीवर भुरळ घालणाऱ्या सुरुवातीच्या आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये अमेरिकन पॉप सुपरस्टार लेडी गागा यांचा समावेश राहिला. या सोहळ्याचे दिग्दर्शन आर्टिस्टिक डायरेक्टर थॉमस जॉली यांनी केले.
रहस्यमय मशालधारकाचे आकर्षण
या रंगीबेरंगी सोहळ्यादरम्यान एका रहस्यमय मशालधारकावर देखील लक्ष केंद्रीत झाले होते. त्याने मशाल धरून शहरात आणि त्यातील सर्वांत प्रसिद्ध ठिकाणांभेवती फेरफटका मारला. कॅब्रे कलाकारांनी त्यांचे सादरीकरण पूर्ण केल्यानंतर त्याने झिप-वायरवरून इले सेंट-लुईस येथून सीन नदी देखील पार केली. मुलांना आवडणारे जगप्रसिद्ध मिनियन्स आणि मोनालिसाही या सोहळ्यात झळकली. हरवलेली मोनालिसा नंतर सीन नदीत तरंगताना सापडली. परेड मार्गावर ठिकठिकाणी असलेल्या पुलांवर चाहत्यांसाठी नृत्ये सादर केली गेली.
या सोहळ्याची एक लाखाहून अधिक तिकिटे विकली गेली होती, तर दोन लाखांहून अधिक विनामूल्य तिकिटे वितरित करण्यात आली होती. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या संख्येने रसिक जमले होते. जिथे खेळांसाठी पदके बनवली गेली आहेत त्या मोनाई डी पॅरिसच्या कार्यशाळेची एक झलक शहरातील प्रसिद्ध कारागिरीचा सन्मान करण्यासाठी सादर केली गेली. यंदाच्या स्पर्धेसाठी एकूण 5084 पदके तयार केली गेली आहेत आणि त्या सर्वांमध्ये आयफेल टॉवरचा तुकडा अंतर्भूत आहे.
या समारंभात ’मुक्ती’ नावाच्या विभागात एक राजकीय संकल्पना देखील राहिली, जी 18 व्या शतकातील ‘फ्रेंच क्रांती’ला धरून होती. तत्कालीन सम्राट राजा लुई 16 वा याची मृत्युदंड ठोठावण्यात आलेली पत्नी मेरी अँटोइनेट हिच्या धडाचा पुतळा हाही त्याचा भाग राहिला. संपूर्ण शहराला समारंभाचे ठिकाण बनविताना अभूतपूर्व सुरक्षा व वाहतूक आव्हानांवर मात करून आयोजकांनी एक अविस्मरणीय देखावा सादर करण्याचे जे वचन दिले होते ते त्यांनी पूर्ण केले. आयोजकांनी हा सोहळा खेळांच्या इतिहासातील सर्वांत मोठा असेल असा दावा केला होता. 3 लाखांहून अधिक लोकांनी सीनच्या काठावरून, तर कोट्यावधी लोकांनी टेलिव्हिजनवर या सोहळ्याचा आनंद घेतला. 1900 आणि 1924 नंतर पॅरिस ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची ही तिसरी वेळ आहे.