पावसाची लहर
महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत जूनमध्ये पावसाने ताण दिला असला, तरी जुलैमध्ये बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाल्याचे दिसून येते. एल निनोचे सावट असतानाही समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे महत्त्वाची धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. तथापि, असमान पाऊसमानामुळे काही जिल्हे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
यंदा प्रशांत महासागरात मान्सूनच्या कालावधीदरम्यान एल निनो उद्भवणार असून, याच्या प्रभावामुळे देशावर दुष्काळाची गडद छाया पसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला होता. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या 90 टक्केच पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर जूनमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजासह देशवासियांमध्ये चिंतेचे ढग निर्माण झाले होते. परंतु, देशाच्या अनेक भागांत जुलैमध्ये दमदार पाऊस झाल्याचे पहायला मिळते. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा विचार करता अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची आकडेवारी सांगते. उजनी, कोयना, भंडारदरासह अनेक धरणे भरल्याचे वा भरण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते. स्वाभाविकच मुंबई, पुण्यासह महत्त्वाच्या काही शहरांमधील पाण्याची चिंता मिटली आहे. तरीदेखील विदर्भ व मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पुणे, कोकणातील पाणीसाठा 70 टक्क्यांवर, तर नाशिक व नागपूरमधील साठा 58 व 47 टक्क्यांवर असताना अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभागातील जलसाठा मात्र अनुक्रमे 43 ते 28 टक्क्यांपर्यंत सीमित असल्याची आकडेवारी सांगते. अर्थात काही विभागांतील पाण्याचा प्रश्न मिटला असला, तरी शेतीभातीच्या दृष्टीने पुढच्या दोन महिन्यांत सर्वदूर पाऊस कसा होईल, हेही महत्त्वाचे असेल. इतर राज्यांचा विचार करता असमान पावसाचा मुद्दा ठळकपणे समोर येतो. एकीकडे जम्मू काश्मीर, आसामसारख्या राज्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आसाममध्ये तर पुराने हाहाकार उडवून दिला. तथापि, दुसऱ्या बाजूला दक्षिण भारत, ईशान्य भारतासह उत्तरेतील काही राज्यांना पावसाने ताण दिला आहे. तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या काही भागांत तसेच गुजरात व राजस्थानमध्येही पावसाची समाधानकारक स्थिती दिसते. संबंध देशाचा विचार केला, तर 1 जून ते 28 जुलै यादरम्यान देशात सरासरी 418.9 मिमी पाऊस होतो. परंतु, या तारखेपर्यंत देशात 352.9 मिमी इतकाच पाऊस नोंदवला गेला आहे. हा पाऊस उणे 15 टक्के इतका असून, ऑगस्ट व सप्टेंबरमधील पावसावर आता खऱ्या अर्थाने मदार असेल. वास्तविक, यंदाचे वर्ष हे सुपर एल निनो असल्याने देशावर दुष्काळाचे सावट असल्याचे वातावरण तयार झाले होते. परंतु, जुलैच्या पावसाने अनेक जिल्ह्यांना तारले आहे. एल निनोचा पाऊसमानावर परिणाम होतो. परंतु, पाऊस पूर्णपणे थांबतो, असे होत नाही. तर अनेक ठिकाणी पाऊस सारख्या प्रमाणात पडत नाही. काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण होते, तर काही भागांत अवर्षणसदृश स्थिती उद्भवते. सध्याचा ट्रेंड पाहिला, तर अशीच काहीशी स्थिती आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरील वाढलेले तापमान आणि बाष्पामुळे ढगांची निर्मिती होत असून, त्यातूनच जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याचे सांगण्यात येते. मुळात मागच्या काही वर्षांपासून हवामान बदलाचा अर्थात ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कमी वेळात अधिक पाऊस म्हणजेच ढगफुटी किंवा अतिवृष्टी होण्याचे प्रमाणही यातून वाढले आहे. याशिवाय पावसाची ओढ हादेखील याच ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येते. त्यामुळे एकूणच मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे. अशा या लहरी हवामानामुळे दिवसेंदिवस शेती करणेही कठीण बनत चालले आहे. भारतासारख्या देशात आजही 60 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. या शेतीचे भरणपोषण होते, ते नैत्य मोसमी पावसातून. परंतु, हाच पाऊस लहरी बनला, तर त्याचे कृषी अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतात. या वर्षाबद्दल म्हणायचे झाल्यास ते वाटते तितके वाईट असल्याचे आत्तापर्यंत तरी दिसत नाही. त्यामुळे शेतीभातीकडून नक्कीच आशा असतील. मात्र, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कमी पावसाचा अंदाज आहे. हे बघता पावसाचा लहरीपणा येथून पुढे कसा दिसतो, यावर देशाचे चित्र ठरेल.