करवीरचा पश्चिम भाग शहराशी थेट जोडला जावा ! त्यासाठी गंगाई लॉन ते महे फाटा रस्ता होणे महत्वाचं- राजेंद्र सूर्यवंशी
कसबा बीड / वार्ताहर
करवीर पश्चिमचा भाग कोल्हापूर शहराला जोडण्याची नागरिकांची बऱ्याच वर्षांची मागणी असून गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारा हा रोड पुर्ण होण्यासाठी जून 2023 मध्ये शेतकऱ्यांनी आपली उभे पीक कापून रस्ता तयार करून दिला आहे. त्यामुळे हा रोड पुर्ण होणे गरजेचे असल्याचे मत राजेंद्र सुर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे. जवळपास सहा महिने खडीकरण व डांबरीकरणच्या प्रतिक्षेत असलेल्या या रस्त्याची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाणी केली त्यावेळी ते बोलत होते.
बालिंगापासून घानवडेपर्यंतच्या मार्गावर असणाऱ्या गावांमध्ये असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या मार्गावरून कोल्हापूरला येताना दिवसभर मुख्यमार्गावर वाहतुकीची गर्दी होऊन वाहतूकाचा ताण सर्वांनाच सोसावा लागत आहे. ट्रॅफिक जॅम सह छोटे मोठे अपघात नेहमीच घडत असतात. तसेच वाहतूक खर्चही वाढल्याने नागरिकांना व युवकांना त्रास होत आहे. त्यामुळे या रत्याचे काम लवकारत लवकर होणे गरजेचं असल्याचं राजेंद्र सुर्यवंशी यांनी म्हटलं आहे.
तसेच पुढे बोलताना राजू सुर्यवंशी यांनी महापूर आला तर कोल्हापूरला सर्वांत कमी अंतरात जाणारा हा मार्ग आहे. तसेच आता शिंगणापूर फाटा व जाऊळाचा गणपती येथे दररोज होणारे ट्रॅफिक जॅम यांचा विचार केला तर पर्यायी मार्ग महत्त्वाचा असल्याची माहीती देऊन या मार्गाचे सर्वेक्षण, रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण होणे आवश्यक असल्याची माहीतीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री एस. आर. पाटील यांना दिली.
ग्रामपंचायत सरपंच तानाजी पालकर यांनी पाडळी खुर्द गावातील रस्त्यात ज्या शेतकऱ्यांचे शेत येत आहे. त्यांनी सर्वांनी सहकार्य केले आहे, त्यामुळे शासन स्तरावर यांचा पाठपुरावा होऊन लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस आर पाटील, अभियंता करवीर एस . व्ही . कांजर, पाडळी खुर्द सरपंच तानाजी पालकर, शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष जी.डी.पाटील, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, योगेश पाटील, प्रकाश पाटील, शिवराज पाटील, संदिप कांबळे, सचिन सोहनी, आदी उपस्थित होते.