Panhala News | लग्नाचा बस्ता बांधला, वऱ्हाडही तयार होतं; पण ऐनवेळी मित्रांचा बनाव उघड, दोघांना कोठडी
पन्हाळ्याच्या दोन भामट्या मित्रांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पन्हाळा - पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे येथील फिर्यादी प्रवीण सर्जेराव अतिग्रे यांचे लग्न ठरत नव्हते याचा फायदा घेत त्यांच्या दोन मित्रांनी लग्नाचे आमिष दाखवून अतिग्रे यांची 1 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक केलीय. पृथ्वीराज शहाजी भोसले आणि विकास अर्जुन चौगुले अशी संशयित आरोपींची नावे आहेत, त्या दोघांना पन्हाळा पोलिसांनी अटक केली असून पन्हाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
...पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे येथील फिर्यादी प्रवीण सर्जेराव अतिग्रे हे गावातील भैरवनाथ देवाचे पुजारी आहेत.त्याचे लग्न ठरत नव्हते. लग्न ठरत नसल्याचा फायदा घेऊन अतिग्रे यांचे मित्र पन्हाळा तालुक्यातील तेलवे येथील पृथ्वीराज शहाजी भोसले आणि कोतोली येथील विकास अर्जुन चौगुले या दोन मित्रानी लग्नासाठी एक मुलगी तयार आहे म्हणून बोगस मुलीचा फोटो अतिग्रे यांना दाखविला,त्या मुलीला वडील नाहीत, त्या मुलीच्या चुलत्याला, भाऊजीला पैसे द्यावे लागतील, नाहीतर ते मुलीचे दुसरीकडे लग्न ठरवतील असे सांगून प्रवीण अतिग्रे यांचेकडून पैसे घेतले. त्यानंतर आम्ही मुलीच्या नातेवाईकांशी बोलणी करायला जातोय, असे सांगून पुन्हा पैसे घेतले.
मुलीच्या मामाला पैशांची गरज आहे, ते पैसे परत देतील असे सांगून पैसे घेतले. त्यानंतर मुलीचे चार तोळे दागिने आहेत, ते पॉलिश करायला गुजरीत दिले आहेत, ते आणायला 15 हजार रुपये पाहिजेत, असे सांगून पैसे घेतले. नंतर संशयित आरोपींनी स्वतःच कापड दुकानात जाऊन लग्नाचा बस्ता काढला आणि त्याचे पैसे घेतले. त्यानंतर प्रवीण अतिग्रे यांची नरसोबाची वाडी येथे नारायण नागबळी शांती करून आठ हजार घेतले. त्यानंतर मुलीची आजी वारली असे सांगून लग्न 3 मे 2025 पर्यंत पुढे ढकलावे लागेल असे सांगितले, 3 मे 2025 रोजी आपले लग्न असणार म्हणून 1 मे 2025 रोजी फिर्यादी प्रवीण अतिग्रे आणि कुटुंबातील सदस्यांनी जेवणासाठीचे तसेच लग्नासाठीचे सर्व साहित्य खरेदी करून वऱ्हाडाला गाड्या सांगून तयारीत बसले होते.
दोन मे 2025 रोजी मुलगी लग्नाला तयार नाही आपण अजून महिनाभर थांबू असे अचानक संशयित आरोपीं पृथ्वीराज भोसले आणि विकास चौगुले यांनी सांगितले, या करणावरून फिर्यादी प्रवीण अतिग्रे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर अतिग्रे यांनी त्या संशयित आरोपीं पृथ्वीराज भोसले आणि विकास चौगुले यांचेकडे मार्च 2025 ते जून 2025 पर्यंत 1 लाख 82 हजार रुपये दिले होते, दिलेले पैसे परत मागितले,वारंवार पैशाची मागणी करून ही पैसे दिले नसल्यामुळे अखेर प्रवीण अतिग्रे यांनी संशयित आरोपीं पृथ्वीराज भोसले आणि विकास चौगुले यांचे विरुद्ध आपल्या भावनाशी खेळून फसवणूक केल्याबद्दल आणि कुटुंबीयांची बदनामी केल्या बद्दल पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.पन्हाळा पोलिसांनी संशयित आरोपीं पृथ्वीराज भोसले आणि विकास चौगुले यांना ताब्यात घेतलं असून त्यांना पन्हाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.अधिक तपास पन्हाळा पोलीस करत आहेत.