धनाढ्यांची संपत्ती दुप्पट, गरिबांचे घटले उत्पन्न
ऑक्सफॅमच्या अहवालात दावा : पुढील 229 वर्षांपर्यंत दूर करता येणार नाही गरिबी
वृत्तसंस्था/ लंडन
जगातील सर्वात 5 धनाढ्या लोकांची संपत्ती 2020 नंतरच्या कालावधीत वाढून दुप्पट झाली असल्याचा दावा ऑक्सफॅम या संस्थेने एक अहवाल जारी करत केला आहे. हा अहवाल वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या दावोस येथे झालेल्या बैठकीत जारी करण्यात आला. जगातील 5 सर्वात धनाढ्यांची एकूण संपत्ती 2020 नंतरपासून आतापर्यंत 405 अब्ज डॉलर्सवरून वाढून 869 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या सर्वात धनाढ्या लोकांची संपत्ती दर तासाला सरासरी एक कोटी 40 लाख डॉलर्स या प्रमाणात वाढली आहे. तर दुसरीकडे याच कालावधीत 5 अब्ज लोकांचे उत्पन घटले असून गरिबांची संख्या वाढल्याचे ऑक्सफॅमचे सांगणे आहे.
इनइक्विलिटी इंक या नावाने हा अहवाल जारी करण्यात आला आहे. यात धनाढ्यांची संपत्ती 2020 नंतरच्या काळात सरासरी 3.3 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नसताना त्यांच्या संपत्तीत ही वाढ झाली आहे. ऑक्सफॅमच्या अहवालात जगभरात वाढत असलेल्या आर्थिक विषमतेवरून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. एलव्हीएमएचचे प्रमुख बर्नार्ड अर्नोल्ट, अमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस, गुंतवणुकदार वॉरेन बफे, ओरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. पुढील 229 वर्षांपर्यंत गरीबी या जगातून दूर करता येणार नसल्याचे अहवालात नमूद आहे.
आम्ही विभागणीच्या दशकाची सुरुवात पाहत आहोत. अब्जावधी लोक महामारी, आर्थिक दुरवस्था, महागाई आणि युद्धाच्या संकटाला सामोरे जात आहेत. तर अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. ही विषमता अचानक निर्माण झालेली नाही. वर्तमान व्यवस्थेत इतरांच्या किमतीवर आपल्याला सर्वाधिक लाभ व्हावा हे अब्जाधीश लोक सुनिश्चित करत असल्याचा दावा ऑक्सफॅम इंटरनॅशनलचे अंतरिम कार्यकारी संचालक अमिताभ बेहर यांनी केला आहे.
कॉर्पोरेटची भूमिका आणि एकाधिकारवादी शक्तींमुळे जगात विषमता वाढत आहे. कामगारांवर दडपशाही करून, करसवलतीचा लाभ घेत, शासकीय कंपन्यांचे खासगीकरण करून, हवामान बदल न रोखून धनाढ्या लोक स्वत:ची संपत्ती वाढवत आहेत. तसेच ते सत्तेचा दुरुपयोग करून लोकांचे अधिकार, लोकशाहीला कमकुवत करत असल्याचा आरोप बेहर यांनी केला.