सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य भवनात सिंधुदुर्गच्या आरोग्य प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
मुंबई / प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार आरोग्य भवन, मुंबई येथे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयांतील समस्या, रिक्त पदे, महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ, तसेच आयुष व पंचकर्म सुविधा केंद्रांच्या उभारणीसह विविध आरोग्य विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.बैठकीस आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे आरोग्य व शिक्षण सभापती श्री. प्रितेश राऊळ, राजघराण्याचे युवराज श्री. लखमराजे भोसले, राजघराण्याचे जावई श्री. कुमार भोगले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी अभियान आयुक्त सुनील भोकरे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, कोल्हापूर परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबुडकर, जिल्हा शल्यचिकित्सक श्री. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सौ. सई धुरी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती
सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेसंदर्भातील न्यायालयीन प्रकरणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम रखडले होते. यासंदर्भात बैठकीत राजघराण्याच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात आली. युवराज श्री. लखमराजे भोसले व श्री. कुमार भोगले यांनी हॉस्पिटलचे बांधकाम तातडीने सुरू व्हावे, यासाठी आमची कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट करत आवश्यक ‘नाहरकत प्रतिज्ञापत्र’ लवकरच न्यायालयात सादर करण्याचे मान्य केले.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर होऊन सुमारे सात वर्षांचा कालावधी लोटल्याने नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी संबंधित विभागाला दिले. तसेच प्रस्तावित हॉस्पिटललगत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाची इमारत दोन मजली करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. त्यामुळे सावंतवाडीतील बहुप्रतिक्षित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीचा मार्ग आता मोकळा होण्याची चिन्हे आहेत.
रिक्त पदे महिनाभरात भरण्याचे आदेश
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची मंजूर पदे दीर्घकाळ रिक्त असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत होत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तात्काळ दखल घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रिक्त पदे येत्या महिनाभरात भरण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले.
महात्मा फुले योजनेअंतर्गत गोवा व बेळगावमधील सुविधा पुन्हा सुरू होणार
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना पूर्वी गोवा मेडिकल कॉलेज आणि के.एल.ई. हॉस्पिटल, बेळगाव येथे उपचाराची सुविधा उपलब्ध होती. मात्र संबंधित पोर्टलवरील कोड व सुविधा बंद झाल्याने ही सेवा थांबली असून रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. यावर मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने कार्यवाही करून ही सुविधा पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले.
आरोग्य केंद्रांच्या इमारतींना निधी व मंजुरी देण्याचे निर्देश
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर तसेच प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या इमारत बांधकाम प्रस्तावांना लवकर मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार संबंधित कामांना गती देण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले.
सिंधुदुर्गात पंचकर्म व आयुष वेलनेस केंद्रांना चालना
पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गात वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आयुर्वेद, पंचकर्म, योग व नेचरोपॅथी सेवांचा विस्तार करण्याची मागणी करण्यात आली. रेडी, आंबोली आणि आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पंचकर्म सुविधा केंद्र तसेच आयुष वेलनेस क्लिनिक सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला.जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे शिक्षण व आरोग्य सभापती श्री. प्रितेश राऊळ यांनी या मागणीचा जोरदार पाठपुरावा केला. त्यानुसार संबंधित प्रस्तावांना लवकर मंजुरी देऊन कार्यवाही करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले.
परिचारिकांच्या रिक्त पदांवरही लवकर तोडगा
जिल्ह्यातील आरोग्य विभागात परिचारिकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने सेवा पुरविताना अडचणी निर्माण होत असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. यावरही तातडीने उपाययोजना करून समस्या निकाली काढण्याचे निर्देश आरोग्यमंत्री यांनी दिले.
आरोग्य सुविधांबाबत सकारात्मक निर्णयांची अपेक्षा
सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीपासून ते उपजिल्हा रुग्णालयांच्या समस्या, रिक्त पदे, आरोग्य योजना व आयुष सुविधांपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध आरोग्य प्रश्नांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सर्व प्रश्न लवकर मार्गी लावून जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये मोठा बदल घडवून आणण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.