भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
सत्ताधाऱ्यांचा बदली अर्ज फेटाळला
कोल्हापूर
शाहूनगर परिते ता. करवीर येथील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाला मुदतवाढ दाखवून धर्मादाय उपायुक्तांकडे मंजुरीसाठी केलेला बदली अर्ज फेटाळण्यात आला. याविरुध्द याच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, संचालिका सौ. पुष्पा पाटील व सभासद राजेंद्र आडके यांनी हरकत घेतली होती. हा वाद धर्मादाय उपायुक्तासह उच्च न्यायालयामध्येसुद्धा 3 वर्षांपासून सुरु होता. त्यामुळे भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 2016 मध्ये धर्मादाय उपायुक्त कार्यालयामार्फत घेतली होती. या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत 2021 मध्ये संपली. त्यानंतर विद्यमान संचालकांनी धर्मादाय उपायुक्त व सभासदांना विश्वासात न घेता आहे त्याच संचालकांना मुदतवाढ दाखवली. तसा खोटा बदली अर्ज क्र. 439/22 ने धर्मादाय उपायुक्तांकडे मंजुरीसाठी दाखल केला होता. याविरुद्ध राजेंद्र आडके आरे, सर्जेराव पाटील हळदी व सौ. पुष्पा पाटील चाफोडी यांनी हरकत घेतली होती. 3 वर्षे हा वाद धर्मादाय कार्यालय व उच्च न्यायालयात सुरू होता. याबाबत धर्मादाय उपायुक्त का. रा. सुपाते जाधव यांनी 18 डिसेंबर 2024 रोजी आदेश करून हा खोटा बदली अर्ज नामंजूर केला आहे. त्यामुळे 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणेच धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत पुढील पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
नोकर भरतीसाठी सर्वकाही
भोगावती शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात काही जागा रिक्त असूनही आणखीन काही जागा रिक्त होणार आहेत. या रिक्त जागांच्या भरतीवर डोळा ठेवूनच कोर्टकचेरीची कामे सुरु आहेत. येथील रिक्त जागांच्या नोकर भरतीसाठी यापूर्वीच काही आजी, माजी संचालकांनी लाखोंच्या घरातून कोटींची उड्डाणे केल्याची चर्चाही लपून राहिलेली नाही. त्यामुळे सभासदांनी नुसती मते देण्याचेचं काम करायचं की काय? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.