For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी बुद्रुकमधील जलशुद्धीकरण यंत्र तीन महिन्यांपासून बंदच

10:41 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी बुद्रुकमधील जलशुद्धीकरण यंत्र तीन महिन्यांपासून बंदच
Advertisement

पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती : शासनाचा लाखो रुपयांचा खर्च वाया : दुरुस्तीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

पाणी शुद्धीकरण यंत्रातील शुद्ध पाणी नागरिकांना पिण्यासाठी मिळावे म्हणून शासन लाखो रुपये खर्च करून जलशुद्धीकरण यंत्रे बसवित आहे. परंतु याच्या देखभालीकडे मात्र शासनच कुचकामी ठरत आहे. कंग्राळी बुद्रुक येथील जलशुद्धीकरण यंत्र गेल्या दोन तीन महिन्यापासून बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी काकती किंवा कंग्राळी खुर्द गावातून भटकंती करत शुद्ध पाणी आणावे लागत आहे. ग्रा. पं. शासकीय अधिकारी व ग्रा.पं. अध्यक्ष व सदस्य यांना कोणतेच सोयरसुतक नाही. यामुळे कंग्राळी बुद्रुक नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने गावातील नागरिकांना दररोज पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून गावोगावी करोडो रुपये खर्च करून जलशुद्धीकरण यंत्रे बसविली आहेत. परंतु जर यंत्र नादुरूस्त झाले तर त्याची दुरुस्ती ग्रा. पं. सदस्य व ग्रा. पं. अधिकारी यांनी त्वरित करून नागरिकांची पिण्याच्या पाण्यापासून गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेणे अगदी गरजेचे आहे. परंतु कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. मध्ये नागरिकांच्या गैरसोयींना कोणत्याच कामाची त्वरित दखल घेतली जात नाही. त्यातच लोकप्रतिनिधींनीसुद्धा नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शासन जागे आहे की झोपी गेले आहे, असे म्हणण्याची वेळ कंग्राळी बुद्रुकवासीय नागरिकांवर आली आहे. ता. पं. व जि. पं.च्या संबंधित अधिकाऱ्यांचे इकडे त्वरित लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याचीही मागणी करण्यात येत आहे.

Advertisement

शासनानेच दुर्लक्ष 

आज कंग्राळी बुद्रुक गावामध्ये अनेक नागरी ससम्या आवासून आहेत. निवडणुकीवेळी मतासाठी मतदारांकडून जोगवा मागणारे ग्रा. पं. सदस्यांचेही नागरिकांच्या नागरी समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. ग्रा. पं. कार्यालयास लागूनच बसविण्यात आलेले जलशुद्धीकरण यंत्र तर वर्षातून सहा महिने नादुरुस्त अवस्थेतच असते. नागरिकांची शुद्ध पाण्याविना मोठी गैरसोय होते. यामुळेच नागरिक काकती ग्रा. पं. किंवा कंग्राळी खुर्द ग्रा.पं.मधील शुद्ध पाण्याच्या यंत्रातील पाणी आणत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये असा विचार कधी येणार, अशा नाराजीच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

साई कॉलनी येथील यंत्र दोन वर्षापासून बंदच

कंग्राळी बुद्रुक गावची लोकसंख्या 30 हजारच्या घरात असल्यामुळे एका जलशुद्धीकरण यंत्रामुळे नागरिकांना शुध्द पाणी मिळण्यास विलंब होत होता म्हणून साई कॉलनी परिसरामध्ये दुसरे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले. परंतु थोड्याच दिवसात सदर यंत्रही दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे. यामुळे शासनाच्या लाखो रुपये पाण्यातच गेले आहेत. शासन नागरिकांचाच पैसा अशा विकास योजनांच्या नावाखाली खर्च करते. यंत्र म्हटले तर बिघाड हा राहणारच. परंतू अशी बिघडलेली यंत्रे त्वरीत दुरूस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करणे गरजेचे आहे.

कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी 

शासन नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विकास योजनांच्या माध्यमातून अनेक विकास योजना राबवतात. यासाठी सरकारी तिजोरीतून करोडो रुपये खर्च झालेले असतात. याच्या देखाभालीसाठी शासनानेच मोठमोठ्या हुद्यावर कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. तरीसुध्दा नागरिकांची गैरसोय होत आहे. तेव्हा अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर कुणाचा अंकुश आहे की, नाही? अशाही संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होताना दिसत आहेत.

Advertisement
Tags :

.