बावड्यातील पाण्याची टाकी बनली सेल्फी पॉईंट
कसबा बावडा / सचिन बरगे :
येथील प्रिन्स शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात अमृत योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले असून टाकी भोवती संरक्षक कठडा नसल्यामुळे ही टाकी हुल्लडबाज तरुणांच्या सेल्फी पॉईंट सह येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनली आहे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
कसबा बावडा येथील काही भागात पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक वर्षापासून आहे. अपुरा व अनियमित पाणीपुरवठामुळे नागरिकांची गैरसोय होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शुगर मिल कॉलनी, उलपे मळा, गोळीबार मैदान, राजाराम कॉलनीसह इतर कॉलनीना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अमृत योजनेतून 2018 साली येथील प्रिन्स शिवाजी शाळेच्या पटांगणात दहा लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू झाले. गतवर्षी रंगरंगोटीसह या टाकीचे बांधकाम पूर्ण झाले असून एक वर्ष झाले तरी या टाकीमध्ये अद्यापही पाणी सोडलेले नाही. तसेच या टाकी भोवती संरक्षक कठडा न बांधल्यामुळे ही पाण्याची टाकी अति उत्साही तरुणांचा सेल्फी पॉइंट बनला आहे. काही नवदाम्पत्याने तर लग्नादिवशी या रंगरंगोटी केलेल्या टाकीवर जाऊन फोटोशूट करण्याचा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर आता शेजारीच असलेल्या प्रिन्स शिवाजी विद्यालयातील विद्यार्थी या पाण्याच्या टाकीच्या पाय्रयांवर खेळताना दिसत आहेत. या टाकीची उंची अधिक असल्याने येथे शालेय विद्यार्थ्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या या पाण्याच्या टाकीच्या सुरुवातीस संरक्षक कठडा नसल्यामुळे येथील पाय्रयांवर नशेखोरांची गर्दी वाढू लागली आहे.
वर्षापूर्वी बांधलेल्या या टाकीमध्ये पाणी तर आलेच नाही पण संरक्षक कठड्याअभावी याचा गैरवापर होताना दिसत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रिन्स शिवाजी शाळेच्या पटांगणातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम चांगले झाले आहे. यामुळे प्रभाग क्रमांक एक मधील काही भागातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पण टाकीचे बांधकाम करत असताना टाकी भोवती संरक्षक कठडा बांधणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागाशी तसे बोलणे झाले आहे.
सुभाष बुचडे : माजी नगरसेवक