बेळगाव जिल्ह्याचा पाणीप्रश्न निकाली काढणार
डी. के. शिवकुमार यांचे विधानपरिषदेत आश्वासन : सी. टी. रवी यांच्याकडून मुद्दा उपस्थित
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ‘आमचे पाणी, आमचे हक्क’ याद्वारे उत्तर कर्नाटकातील सर्व दुष्काळी भागात पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी, अथणी, रामदुर्ग, कागवाड व गोकाक जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर असला तरी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विधानपरिषदेत दिले. भाजपचे विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांनी शून्य प्रहरात बेळगाव जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे तेथील नागरिकांसह शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
काही ठिकाणी तर पिण्यासाठी पाणी नसून पाण्याविना शेतकऱ्यांची पिकेही वाया जात आहेत. यामुळे त्यांच्या समस्येत भर पडत आहे. पाण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. बेळगाव जिल्हा हा कृषीप्रधान असल्याने पाण्याची मागणीही अधिक असते. सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे सर्वांना फटका बसत आहे. यामुळे बेळगाव जिल्ह्यात पाणी योजना मार्गी लावावी, अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना पाटबंधारे मंत्रीही असणारे डी. के. शिवकुमार यांनी,उत्तर कर्नाटकातील पाणी समस्या निकाली काढण्याठी यापूर्वी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. काही ठिकाणी पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, काही ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत आहेत. काही ठिकाणी अडथळे येत असल्याने कामे संथगतीने होत आहेत.
सरकार सदैव कटिबद्ध
बुधवारी सायंकाळी याबाबत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली बैठक घेण्यात येणार असून पाणी समस्येवर तोडगा काढण्यात येईल. तसेच निधीची तरतूद करून बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकातील पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी सरकार सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.