For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रगाडा नदीची पाणी पातळी वाढली

12:42 PM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
रगाडा नदीची पाणी पातळी वाढली
Advertisement

आपत्कालीन यंत्रणा सतर्क : अंजुणे धरणाचे दरवाजे खुलेच : गुळेली- मुरमुणे रस्ता दिवसभर पाण्याखाली

Advertisement

वाळपई : गेल्या 24 तासांत  सत्तरी तालुक्यांत पडलेल्या धुवाधार पावसामुळे म्हादई, वेळूस, रगाडा या नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. मात्र रगाडा नदीने  धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आसपास परिसरातील भागामध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान गुळेली भागातून जाणाऱ्या मुरमुणे शेळ आदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. यामुळे गुळेली व इतर गावाचा संपर्क तुटला. जवळपास दिवसभर वाहतूक ठप्प झाली होती. तालुक्याचे मामलेदार वीरेंद्र बाणावलीकर व संयुक्त मामलेदार विष्णू राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. संध्याकाळी उशिरापर्यंत रगाडा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली नव्हती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

चोवीस तास धुवाधार पाऊस

Advertisement

गेले 24 तास धुवाधार पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. मात्र कोणत्याही ठिकाणी मोठी हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. गुरुवारी संध्याकाळी पावसाने उग्ररूप धारण केले होते. यामुळे  तालुक्यात ठिकठिकाणी पाणी साचून अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. होंडा येथे मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे येथील मार्गावरील वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. यामुळे वाहनचालक बरेच त्रस्त झाले. सकाळपासून रगाडा नदीच्या पाण्याची पातळी वाढण्यास सुरूवात झाली. दुपारपर्यंत नदीने उग्र रूप धारण केले होते. यामुळे गुळेली भागातून मुरमुणे धडा पैकूळ भागात जाणारे रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे या भागाचा मुख्य गावांशी संपर्क तुटला. यामुळे दिवसभर वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

मामलेदारांकडून परिस्थितीचा आढावा 

रगाडा नदी परिसरात तालुक्याचे मामलेदार वीरेंद्र बाणावलीकर व संयुक्त मामलेदार विष्णू राणे यांनी भेट देऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. एकूण परिस्थितीवर नजर ठेवून विशेष काळजी घेण्यात येणार आहे. कोणत्या प्रकारची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी आपत्कालीन यंत्रणा तैनात ठेवली जाईल, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

मंत्री विश्वजित राणे अधिकाऱ्यांच्या संपर्कात

आरोग्य मंत्री तथा स्थानिक आमदार विश्वजित राणे पूरसदृश स्थितीचा आढावा घेऊन लक्ष ठेवून आहेत. ते सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असूत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश विश्वजित राणे यांनी दिले आहेत.

पावसाचा जोर असल्याने अंजुणे धरणाचे दरवाजे खुलेच 

चोर्ला घाटात मुसळधार पाऊस असल्यामुळे अंजुणे धरणात पाणी वाढले आहे. त्यामुळे चारही दरवाजे उघडून विसर्ग सुरू ठेवला आहे. यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे समजते. पावसाचे प्रमाण कमी होईपर्यंत दरवाजे खुलेच राहणार, अशी माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.