कासारी नदीची पाणी पातळी खालावली ! चौदा गावच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
उत्रे /प्रतिनिधी
ऐन रब्बी हंगामात यवलूज ते कसबा ठाणे (ता.पन्हाळा) या बंधाऱ्या दरम्यानचे कासारी नदीची पाणी पातळी खूपच खालावली असून जागोजागी नदीचे पात्र कोरडे पडले आहे.यामुळे कृषी पंपाचे ' फुटबॉल ' उघड्यावर पडले आहेत. परिणामी या बंधारा पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या चौदा गावच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाटबंधारे विभागाने नदीत पाणी सोडून पाणी पातळीत वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
कासारी नदीला गेळवडे या मध्यम प्रकल्पासह,पडसाळी, नांदारी, पोंबरे, कुंभवडे, केसरकर या लघु पाटबंधारे प्रकल्पात पाणी पुरवठा केला जातो. या नदीवर उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत.या नदीवरील यवलूज पोर्ले हा शेवटचा बंधारा आहे.या बंधारा पाणलोट क्षेत्रात यवलूज,पडळ, सातार्डे, माजगाव,पोर्ले, खोतवाडी, देवठाणे,शिंदेवाडी, माळवाडी, उत्रे, पिंपळे, आळवे, वाघवें, गोलिवडे आदी चौदा गावांचा समावेश आहे.तीन वर्षांपूर्वी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाले आहे.पण पाटबंधारे विभागाकडून या बंधारा क्षेत्रात नदीमध्ये पुरेशा दाबाने पाणी सोडले जात नाही. यामुळे वारंवार नदीची पाणीपातळी खूपच खालावते . सद्यस्थितीत नदीचे पात्र जागोजागी कोरडे पडले आहे. कृषी पंपाचे ' फुटबॉल 'व सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेचे इंटेक चेंबर उघडे पडले आहेत.परिणामी पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे रब्बी हंगामातील ऊसाला जादा पाण्याची गरज भासत असताना नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.