स्वच्छतागृहाचा फलक अखेर हटविला
नगरसेवक शंकर पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव : शहरातील सर्वात जुन्या शाळांपैकी एक असलेल्या गणपत गल्ली येथील शाळा क्रमांक 2 च्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छतागृहाचा फलक लावला होता. परंतु यामुळे मराठी शाळेचे नावदेखील दिसत नव्हते. हे लक्षात येताच नगरसेवक शंकर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वच्छतागृहाचा फलक हटवून त्या ठिकाणी मराठी शाळेचा फलक बसविला आहे. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बेळगावचे माजी आमदार फिरोज सेठदेखील याच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. गणपत गल्ली कॉर्नर येथे शाळेची कमान असून त्यावर शाळेचे नाव होते. परंतु या परिसरात पे अॅण्ड यूज तत्त्वावरील स्वच्छतागृह असून याचा फलक शाळेच्या फलकावर लावण्यात आला होता. ही बाब काही सुजान नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी नगरसेवक शंकर पाटील यांना याबाबत कळविले.
सध्या या शाळेमध्ये ग्रामीण गटशिक्षणाधिकारी कार्यालय देखील सुरू आहे. त्यामुळे शाळेचा फलक दिसणे आवश्यक होते. यासाठी स्वच्छतागृहाचा फलक हटवून त्या ठिकाणी शाळेचा कन्नड व मराठी भाषेतील फलक रविवारी रात्री बसविण्यात आला. यामुळे माजी विद्यार्थी तसेच पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी गंगाधर पाटील, दर्शन मोरे, हरिष गवळी, गौरव सांबरेकर, अजय फुलारे यासह इतर उपस्थित होते.