वारकऱ्यांना आस विठुरायाची अन् रेल्वेचीही!
पाच वर्षांपासून एक्स्प्रेस बंद : नव्या रेल्वेची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
पंढरपूरच्या विठुरायाचे महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक मोठ्या प्रमाणात आहेत. आषाढी एकादशीनिमित्त हजारोंच्या संख्येने बेळगाव, खानापूर, धारवाड, हुबळी, कारवार परिसरातील भाविक पंढरपूरला जातात. आषाढी एकादशी अवघ्या एका महिन्यावर आली असल्याने बेळगाव-पंढरपूर विशेष रेल्वेची मागणी वारकऱ्यांकडून होत आहे. यावर्षी तरी वारकऱ्यांच्या पदरी रेल्वेचा प्रवास पडणार का? हे पहावे लागणार आहे.
कोविडपूर्वी बेळगाव-पंढरपूर या मार्गावर दररोज दोन एक्स्प्रेस उपलब्ध होत्या. त्यामुळे बेळगावच्या प्रवाशांना पंढरपूरला ये-जा करणे सहज शक्य होते. बेळगाव-पंढरपूर मार्गावर दुपारी अडीच वाजता थेट एक्स्प्रेस उपलब्ध होती. तर सायंकाळी 4 वाजता चिकजाजूर-परळी या मार्गावर दुसरी एक्स्प्रेस वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी मिळत होती. त्यामुळे रेल्वेलाही चांगला महसूल मिळत होता.
मागील पाच वर्षांपासून या दोन्ही एक्स्प्रेस बंद असल्याने बेळगावमधून पंढरपूरला जाण्यासाठी थेट एक्स्प्रेस उपलब्ध नाही. मागील वर्षभरात सुरू असलेली बेंगळूर-पंढरपूर एक्स्प्रेसदेखील बंद करण्यात आली आहे. यामुळे बेळगावच्या वारकऱ्यांना बेळगाव ते मिरज व तेथून मिळेल त्या एक्स्प्रेसने पंढरपूर गाठावे लागत आहे. त्यामुळे वारकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
आषाढी एकादशीनिमित्त कोरोनापूर्वी हुबळी-पंढरपूर मार्गावर विशेष एक्स्प्रेस सोडली जायची. बेळगावचे माजी खासदार व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी हे दरवर्षी पंढरपूरसाठी विशेष रेल्वेचे नियोजन करायचे. परंतु सध्या लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा केला जात नसल्याने एक्स्प्रेस सोडण्याकडे नैर्त्रुत्य रेल्वेही इच्छुक नसल्याचा आरोप वारकऱ्यांतून केला जात आहे.