युद्धाचा प्रवास अणुयुद्धाच्या दिशेने!
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर इराण देश प्रचंड संतापलेला दिसतो. खामेनेई यांच्या हत्येनंतर कदाचित युद्ध पुढे चालणार नाही आणि इराण शरणागती पत्करेल, असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कयास होता. प्रत्यक्षात मात्र इराण सर्व शक्तीनिशी युद्धाच्या रणांगणावर उतरलेला दिसतोय आणि त्यांनी अमेरिकेचे तळ ज्या ज्या राष्ट्रांमध्ये आहेत, त्या त्या ठिकाणी बॉम्ब हल्ले करून अमेरिकेचे अतोनात नुकसान करून ठेवले आहे. अमेरिकेला देखील आपले एवढे मोठे नुकसान होईल, असे वाटले नव्हते. ‘युद्धस्य कथा रम्या’ असे म्हटले जाते. युद्धाच्या कथा या अशा न संपणाऱ्या असतात. सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिका असे हे युद्ध चालू आहे. इस्रायल आणि अमेरिका एकत्र आहेत. त्यांनी इराणला संपवण्याचा विडा उचललेला आहे. इराणचे अनेक नेते आतापर्यंत गेल्या चार दिवसांमध्ये मारले गेले, मात्र इराण तसा ताकदवान देश आहे. त्यांनी आपल्याच मुस्लीम बांधव असलेल्या राष्ट्रांनादेखील चांगलाच धडा शिकविलेला आहे. हे युद्ध लवकर थांबेल, असे वाटत नाही. त्याचा जेवढा फटका इराणला बसलेला आहे, तेवढाच फटका अमेरिकेलादेखील बसलेला आहे. अमेरिकेला आसरा दिल्यामुळे कुवेत, युएई, इराक, सौदी अरेबिया, बहरीन इत्यादी अनेक राष्ट्रांनाही फटका बसलेला आहे. त्यातून लाखो लोकांना सध्या जबरदस्त फटका बसलेला आहे. अनेक निरपराधी मंडळी मारली जात आहेत. अमेरिकेचा डोळा केवळ तेलावर आहे आणि त्यातूनच तेल निर्माण करणाऱ्या अनेक राष्ट्रांना अमेरिकेने निर्माण होणारे सर्व तेल आपल्याला विकले पाहिजे, असा धाक दाखवलेला आहे. प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य आहे, परंतु अमेरिकेची दादागिरी ही दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे. त्यातच अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे प्रकरण काही औरच आहे. त्यांचे एकंदरीत वागणे आणि दररोज मोठमोठे गौप्यस्फोट करण्याचे त्यांचे प्रकार पाहता त्यांचे काही खरे नाही. त्यांच्यावर ठाम विश्वासून कोणी राहू शकत नाही. आखाती राष्ट्रांमध्ये आग पेटविलेली आहे आणि हे सारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याने. युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. एकूण दहा राष्ट्रे या युद्धात अडकलेली आहेत. अमेरिकेची मंडळी जी अमेरिकेत आहेत ती अत्यंत सुरक्षित आहेत, मात्र आपले तळ अमेरिकेने इराणभोवती असलेल्या इतर राष्ट्रांमध्ये वसविलेले आहेत आणि तिथून अमेरिकेचे सैनिक इराणवर हल्ला चढवीत आहेत. यामुळे इराणने आपल्या बचावासाठी आणि अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी आपल्या शेजारील राष्ट्रांवर हल्ले चढविले आहेत. हे हल्ले अमेरिकन तळावरच आहेत, परंतु त्यातील काही हल्ले हे त्या त्या राष्ट्रातील विविध ठिकाणी चढविल्याने त्या राष्ट्रांचे देखील प्रचंड नुकसान झालेले आहे. हे युद्ध लवकर संपेल अशी डोनाल्ड ट्रम्प यांची समजूत होती ती पूर्ण होणारी नाही. यामध्ये इतर राष्ट्रांचे देखील प्रचंड नुकसान होत आहे. त्याहीपेक्षा हे युद्ध चालू असताना एका बाजूने इराणमध्ये आणि दुसऱ्या बाजूने अमेरिकेमध्ये भूकंप झालेला आहे. इराणमधील भूकंप हा चार पूर्णांक तीन रिश्टर स्केल नोंदविला गेला आहे आणि त्यातून इराणच्या काही भागाला तडे गेलेले आहेतच, याशिवाय भविष्याचा विचार करता हा भूकंप काहीतरी अघटित घडविण्याचा इशारा तर देत नाही ना? यावर जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. इराणवर सर्व बाजूंनी हल्ले चढविले जात आहेत, एवढे असतानादेखील इराणने आपल्या बाजूनेदेखील सर्व ठिकाणी हल्ले चढवून शत्रू राष्ट्रांना पाणी पाजले आहे. तरीदेखील अमेरिकेकडून वारंवार दिले जाणारे इशारे तसेच इस्रायलने आपल्या हल्ल्यांमध्ये केलेली वाढ, हे सर्व विचारात घेता इराण एका मोठ्या निर्णयापर्यंत येणार नाही ना, हा विचार मनात येतो आणि इथेच पाल चुकचुकते. इराण हा युद्धामध्ये फार तयारीनिशी उतरलेला आहे. जरी इराणचे अनेक नेते मारले गेले तरीदेखील इराणने आपल्याकडे फार मोठा अणुसाठा तयार करून ठेवलेला आहे. जवळपास 25 ते 26 अणुबॉम्ब तयार करता येतील, एवढा अणुसाठा आपल्याकडे आहे, असा दावा इराणने केलेला आहे. हे लक्षात घेता हे युद्ध चालू असताना इराणने अणुबॉम्बची चाचणी तर घेतली नाही ना ! असा संशय निर्माण झालेला आहे. जर इराणने अणुबॉम्बचा वापर केला, तर जगात सर्वत्र हाहाकार माजेल. एवढी मोठी विषाची परीक्षा घेतली जाऊ नये. इराणने आपण गप्प बसणार नाही, असे या अगोदरच सांगितलेले आहे. त्यांच्याकडे असलेला युरेनियमचा साठा हा अनेक अणुबॉम्ब तयार करण्यासाठी उपयुक्त आहे. इराणच्या लक्षात आले की आता आपण पूर्णत: चक्रव्यूहामध्ये सापडलेलो आहोत. आपण किंवा आपला देश काही राहणार नाही किंवा आपल्यावर आलेले संकट हे आता आपल्याला संपविणारे आहे, तर मग आपल्याबरोबर इतरांना देखील संपविण्याचा विचार इराणच्याही डोक्यात पिंगा घालत असेल, यात शंका नाही. त्यामुळेच हे युद्ध आणि त्याची तीव्रता आता कमी होणे आवश्यक आहे. एक इराण राष्ट्र इतर नऊ राष्ट्रांशी संघर्ष करीत आहे. त्यातल्या त्यात त्यांचे खरे शत्रू इस्रायल आणि अमेरिका. त्यामुळे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे इस्रायला संपवणे. दोन दिवसांपूर्वी इराणने जाहीर केले होते की अमेरिका आणि इस्रायलला आम्ही असा धडा शिकवू की कायमचे त्यांच्या लक्षात राहील. एकदम टोकाची भूमिका घेण्यापर्यंत इराण पोहोचत आहे, हा जागतिक पातळीवर अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण करणारा प्रवास ठरत आहे. अमेरिकेने यापूर्वी 6 आणि 9 ऑगस्ट 1945 मध्ये जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी
अणुबॉम्बचा वापर केला होता आणि त्यामध्ये दोन्ही शहरांमधील मिळून सुमारे चार लाखपेक्षा जास्त नागरिक मरण पावले होते. आजही ही घटना कोणी विसरलेले नाहीत. सध्या सुडाने पेटून उठलेले इराण कोणत्याही स्तराला जाऊ शकते आणि हे जवळपास तिसरे महायुद्ध सुरू झाले अशीच अवस्था सध्या दिसत आहे. परंतु त्याचे दुष्परिणाम अनेक वर्षे दिसून येतील. एवढ्या टोकाची भूमिका इराणने घेऊ नये, त्याचबरोबर अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांनी आता कुठेतरी युद्ध संपुष्टात आणण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. हे युद्ध म्हणजे नरसंहार आणि मोठ्या मालमत्तेची हानी करणे एवढ्याच उद्दिष्टापर्यंत राहिलेले आहे. जागतिक पातळीवर हे युद्ध म्हणजे फार मोठे संकट आहे, हे विसरता कामा नये. अणुयुद्धाचा हा प्रकार होऊ नये आणि सुडाने पेटलेल्या या राष्ट्रांनी सामंजस्याची भूमिका घेतली नाही, तर फार मोठा अनर्थ निर्माण होईल, त्याची प्रचिती येऊ नये एवढीच अपेक्षा आहे.