वक्फ विधेयक हा संविधानावर हल्ला!
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित राष्ट्रीय काँग्रेसच्या दोन दिवशीय अधिवेशनाचा बुधवारी समारोप झाला. याप्रसंगी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकावरून सरकारवर हल्लाबोल केला. काही दिवसांपूर्वी भाजपने लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर केले. हा धार्मिक स्वातंत्र्य आणि संविधानावर हल्ला आहे. सरकार भविष्यात ख्रिश्चनांविरोधात कायदा करेल असा इशारा देतानाच हे धर्मविरोधी विधेयक असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच बांगलादेशचे नेते भारताविरुद्ध विधाने करत असताना ‘तुमची 56 इंचाची छाती कुठे गेली?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवशीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक चार तास चालली. त्यानंतर दुस्रया दिवशी बुधवारी मुख्य अधिवेशन साबरमती रिव्हरफ्रंट येथे पार पडले. याप्रसंगी देशभरातील 1700 हून अधिक काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची मुख्य उपस्थिती होती. मात्र, अधिवेशनात प्रियांका गांधी हजर राहू शकल्या नाहीत.
निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात : खर्गे
पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अधिवेशनामध्ये ईव्हीएमवर पुन्हा एकदा भाष्य करत निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात, अशी मागणी केली. खर्गे यांनी निवडणुकीत झालेल्या कथित गैरव्यवहार आणि संवैधानिक संस्थांच्या गैरवापरावरून त्यांनी केंद्र सरकारवर तीव्र हल्ला चढवला. भाजप तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्यामुळे विरोधकांचे नुकसान होत असल्याचे ते म्हणाले. सरकारने विशेष तंत्रज्ञान विकसित केले असून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल आणि विरोधकांना नुकसान पाहोचेल, असा संशय त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या निवडणुकाही फसवणुकीने जिंकल्या गेल्या. महाराष्ट्रात 150 जागा लढल्या गेल्या आणि 138 जागा जिंकल्या गेल्या, म्हणजेच 90 टक्के विजय. अशी किमया यापूर्वी कधीही पाहिली नव्हती असा दावा करतानाच चोर आज ना उद्या पकडला जाईल, असेही ते पुढे म्हणाले.
गेल्या 11 वर्षांत भाजप सरकार संविधानावर सतत हल्ला करत आहे. आपल्या संवैधानिक संस्थांवर हल्ले होत आहेत. सरकारचा विस्तार संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत केला जात आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लोकसभेत बोलण्यापासून रोखण्याच्या घटनेचे वर्णन खर्गे यांनी लोकशाहीसाठी लाजिरवाणी असल्याचे म्हटले. वक्फ दुरुस्ती विधेयकावर रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली, तर मणिपूरसारख्या गंभीर मुद्यावर चर्चा करण्यासाठी फक्त काही मिनिटे देण्यात आल्याबाबत त्यांनी सरकारला धारेवर धरले.
जातीच्या जनगणनेची मागणी
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांचे स्मरण करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी जातीय जनगणना होण्याची गरजही व्यक्त केली. ‘आम्ही तेलंगणात जातीय जनगणनेचे एक क्रांतिकारी पाऊल उचलले. यासंबंधी मी संसदेत भाषण दिले होते. मी पंतप्रधान मोदींना सांगितले की तुम्ही जातीय जनगणना करा. या देशात दलित, मागासवर्गीय, अत्यंत मागासलेले, अत्यंत दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, गरीब सामान्य वर्गातील किती लोक आहेत हे देशाला माहित असले पाहिजे.’ असे राहुल गांधी म्हणाले.