‘एक्झिट पोल’चा कौल काँग्रेसच्या बाजूने
हरियाणात भाजप बॅकफूटवर जाण्याचा अंदाज : जम्मू काश्मीरमध्येही काँग्रेस-एनसीचा वरचष्मा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल निकाल शनिवारी जाहीर झाले आहेत. सर्व एक्झिट पोल दोन्ही राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल असा अंदाज वर्तवत आहेत. या अंदाजांमध्ये काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळू शकतात. तर भाजपला 20-25 जागा मिळू शकतात, अशी सरासरी आकडेवारी दिसून येत आहे. दोन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी 90 जागा असून बहुमतासाठी 46 जागांची आवश्यकता आहे. विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर शनिवारी जम्मू काश्मीर आणि हरियाणामधील निवडणुकीचे एक्झिट पोल अंदाज जाहीर झाले. हरियाणातील बहुतांश एक्झिट पोल (90 जागा) काँग्रेसला बंपर विजय दाखवत आहेत. तर भाजप 10 वर्षांनंतर सत्तेतून बाहेर पडल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, काश्मीरमधील अंदाजांमध्येही भाजप पिछाडीवर दिसून येत आहे. येथे काँग्रेस-एनसी यांची आघाडी बहुमताजवळ असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले.
हरियाणा विधानसभेसाठी दैनिक भास्करच्या एक्झिट पोलने काँग्रेसला 44 ते 54 आणि भाजपला 15 ते 29 जागा दिल्या आहेत, तर ध्रुव रिसर्चने भाजपला 22 ते 32 आणि काँग्रेसला 50 ते 64 जागा दाखवल्या आहेत. पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलने काँग्रेसला 49 ते 61 आणि भाजपला 20 ते 32 जागा दिल्या आहेत. तसेच रिपब्लिक भारत-मॅट्रीझने काँग्रेसला 55 ते 62 जागा आणि भाजपला 18 ते 24 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी शनिवारी एकाच टप्प्यात मतदान झाले. हरियाणात 2014 पासून भारतीय जनता पक्षाचे सरकार असून मनोहरलाल खट्टर हे 2014 ते मार्च 2024 पर्यंत मुख्यमंत्री होते. सध्या येथे नायबसिंग सैनी हे पद सांभाळत असले तरी हरियाणातील सत्ता भाजपच्या हातून निसटण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
काश्मीरमधील अंदाजही भाजपच्या विरोधात
जम्मू-काश्मीरच्या एक्झिट पोलमध्ये (90 जागा) काँग्रेस आणि एनसी आघाडीवर आहेत. पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 46 ते 50 असे बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दैनिक भास्करने 35 ते 40 जागा म्हणजेच त्रिशंकू सरकारचा अंदाज व्यक्त केला आहे. इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 27-32 जागा, काँग्रेस आणि एनसीला 40 ते 48, पीडीपीला 6-12 आणि इतरांना 6-11 जागा मिळण्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. या एक्झिट पोलच्या निकालांनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि एनसी यांचे सरकार स्थापन होऊ शकते.
जम्मू-काश्मीरमधील निकालाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. येथे 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका झाल्या असून जम्मू काश्मीरला सहा वर्षांनी मुख्यमंत्री मिळणार आहे. शेवटच्या मुख्यमंत्री पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती होत्या. ज्यांनी 4 एप्रिल 2016 ते 19 जून 2018 पर्यंत मुख्यमंत्रिपद भूषवले होते. 2019 मध्ये अनुच्छेद 370 हटवल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले.