For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भेट त्यांची माझी स्मरते...

12:29 PM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
भेट त्यांची माझी स्मरते
Advertisement

बेळगाव  : आपल्या कर्तृत्वाने अफाट यश मिळविणारी माणसे तितकीच साधी असतात. याची प्रचिती येते, तेव्हा आश्चर्यचकित व्हायला होते. भारतीय उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची ठसठशीत नाममुद्रा उमटविणारे उद्योजक रतन टाटा यांच्या बाबतीत माझ्या भावना नेमक्या अशाच आहेत. बेळगावमध्ये असणाऱ्या माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याला 80 च्या दशकामध्ये त्यांनी ज्या आपुलकीने वागविले आणि माझे करिअर घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ते रतन टाटा खरोखरच एक अवलिया होते. या भावना आहेत जी. डी. वेर्णेकर यांच्या.मूळचे बेळगावचे असलेले जी. डी. वेर्णेकर आपल्या पेशानिमित्त बऱ्याच देशात भ्रमंती करून आले असले तरी सध्या ते निवृत्तीनंतर बेळगावला स्थायिक झाले आहेत. रतन टाटा यांच्या सहवासात काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

Advertisement

या कुतुहलापोटी विचारता ते म्हणाले, 1981 च्या सुमारास मी इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण करून अहमदाबाद येथील ‘एनआयडी संस्थेमध्ये इंडस्ट्रीयल डिझाईन’ या विषयात फेलोशिप करत होतो. त्यावेळी रतन टाटा यांची नियुक्ती नेको नावाच्या कंपनीत झाली आहे व त्यांनी यूएस कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून आर्किटेक्ट पदवी घेतली आहे, असे माझ्या वाचनात आले. डिझाईन आणि आर्किटेक्ट या दोन्ही विषयांमध्ये साम्य असल्याने मी त्यांना पत्र लिहून ‘मला आपल्या कंपनीमध्ये काम करायचे आहे’ असे कळविले.

साधारण एक आठवड्यानंतर मी एनआयडीमध्ये असतानाच बॉम्बेहून तुम्हाला कॉल आला आहे, असा निरोप आला. मला जरा आश्चर्य वाटले. मी कॉल अटेंड केला तेव्हा एका वयस्कर महिलेने मला I am mrs Shastri from bombay house and mr. Ratan Tata wish to meet you at your convinence. can you inform any suitable time for this meeting ? या कॉलची मला अपेक्षाच नव्हती. परंतु माझ्या एका पत्राची दखल घेऊन टाटांनी मला भेटायची संधी दिली होती. ठरल्याप्रमाणे भेटण्याची वेळ नक्की करण्यात आली. मी मुंबईला निघालो. परंतु मला खूप दडपण आले होते. मात्र, ठरल्यानुसार मी दुपारी 12.30 वाजता फोर्टमधील बॉम्बे हाऊसमध्ये गेलो व ते ऑफीस बघून अक्षरश: चाट पडलो, अशी आठवण वेर्णेकर यांनी सांगितली.

Advertisement

अवघ्या 10 मिनिटांमध्ये रतन टाटा आपल्या केबिनच्या बाहेर आले व म्हणाले, s mr. Vernekar how are you doing? please come in एका शिकावू विद्यार्थ्याला इतक्या मानाने वागविणे हे फक्त रतन टाटा यांच्यासारखे रत्नच करू शकतात, असे वेर्णेकर यांना वाटते. त्या आठवणींना उजाळा देत वेर्णेकर म्हणाले, 15 मिनिटे मुलाखत ठरली होती, परंतु जवळ जवळ 40 मिनिटे त्यांनी माझ्याशी गप्पा करत माझी सर्व माहिती विचारून घेतली व s mr vernekar what is your expection it? असा प्रश्न केला. तेव्हा मी मोठ्या आत्मविश्वासाने 2 हजार रुपये, असे सांगितले. त्यावेळी त्यांच्याही भुवया उंचावल्या.

ते म्हणाले, this is your expection? and I said s वेर्णेकर सांगतात, त्यावेळी माझ्या मित्राचा साधारण पगार 800 ते 1000 रुपये होता. त्यामुळे ही तुझी अपेक्षा आहे, असा प्रश्न त्यांनी केला व पंधरा मिनिटांनी नेल्को मार्केटिंग मॅनेजर इनामदार यांना चकला अंधेरी येथील प्लांटमध्ये भेटण्यास सांगितले. तेथे पोहोचताच इनामदार यांचा पहिला प्रश्न होता ‘तुम्हाला रतन टाटा कसे माहीत आहेत? मी त्यांना माझ्या पत्राबद्दल व मुलाखतीबद्दल सांगितले.

खरे तर, या पुढचा प्रवास मजेशीर होता. कारण इनामदार म्हणाले, विद्यार्थ्यांना आम्ही 800 ते 1000 रुपये पगार देतो, तुला 2000 रुपये का द्यावे? मी जरा गेंधळलो व नंतर त्यांना माझा पगार 1600 रुपये ठरवून ज्युनियर डिझायनर म्हणून नियुक्ती केली. टाटा स्वत: ‘प्रॉडक्ट डिझाईन’मध्ये विशेष रस घेत असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करता करता मी त्यांच्याकडून खूप शिकलो. आणि पुढे ‘चिफ इंडस्ट्रीयल डिझायनर’ कधी झालो हे समजलेच नाही, असे वेर्णेकर यांनी नमूद केले. रतन टाटा यांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या करिअरच्या प्रारंभीच ते मला भेटले. आणि रत्नासारख्या या माणसाच्या सहवासामुळे माझ्या करिअरची वाटचाल दमदारपणे सुरू झाली. परंतु त्याहीपेक्षा माणूस म्हणून माझा प्रवास अधिक समृद्ध झाला, असे वेर्णेकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.