समर्थ रामदासांच्या वाङ्मयातून दिसणारी प्रपंच-परमार्थाची वाटचाल
(उत्तरार्ध)
वास्तविक पाहता प्रपंच म्हणा, संसार म्हणा भगवंतानेच निर्माण केला आहे तर तो कोणाला तरी सुटेल काय? प्रपंच सोडा असे कुणी सांगतही नाही आणि सांगितले तरी कुणी सोडणारही नाही. मनुष्य स्वत:ला कर्ता समजत असल्याने प्रपंच त्याचा घात करतो. गोष्टी मनासारख्या घडल्या तर तो सुखी होतो आणि मनाविरुद्ध घडल्या तर त्याला वाईट वाटते. प्रपंचात सुखापेक्षा दु:खाचेच प्रसंगच जास्त येतात. तरी माणसे तो सोडायला तयार होत नाहीत. ज्याला प्रपंचात सुख आहे असे वाटते त्याला समर्थ परममूर्खातला मूर्ख असे म्हणतात. परममूर्खामाजी मूर्ख। जो संसारी मानी सुख। या संसारदु:खा ऐसे दु:ख ।आणिक नाही । म्हणून मनुष्याने आपण कर्ते आहोत ही कल्पना सोडून द्यावी आणि भगवंताचे कर्तेपण मान्य करावे. भगवंताचे कर्तेपण एकदा मान्य केले की, मनुष्य करत असलेला संसारही भगवंताचाच होतो, त्यामुळे त्यातील यशापयशाचे महत्त्व उरत नाही. परमेश्वर मोठा दयाळू आहे जर आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्या हिताची असेल तर तो नक्की देतो ह्यावर विश्वास ठेवून निष्काळजी होऊन प्रपंच करावा. अर्थात माणसाचा अहंपणा खोल मुरलेला असल्याने, ही कल्पना सहजासहजी त्याच्या गळ्यात उतरत नाही. त्यामुळे परिस्थितीचे धक्के खाऊनही प्रपंचाचा लोभ काही त्याला सुटत नाही. त्याच्या परिस्थितीबद्दल समर्थ दासबोधात सांगतात, कोळिष्टकांच्या नाजूक धाग्याने हत्ती बंधनात सापडावा किंवा सुगंधाच्या लोभाने भुंगा कमळात अडकून मरून जावा, त्याप्रमाणे मनुष्य मायेच्या कोमल धाग्यांमुळे प्रपंचातच गुंतून पडतो, तो पढतमूर्खच होय. ईश्वरकृपेने जे मिळेल त्यात समाधानी राहण्यास शिकावे म्हणजे प्रपंच आनंदाचा होतो, नेटका होतो. वर सांगितल्याप्रमाणे जो निरपेक्षतेने कर्तव्य निभवतो त्याचाच प्रपंच नेटका होतो. म्हणून प्रपंची माणसाला सल्ला देताना समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका। मग ध्यावे परमार्थविवेका। येथें आळस करूं नका । विवेकी हो । माणसाने विवेकाने सत्य परिस्थिती समजून घ्यावी म्हणजे प्रपंच नेटका होतो. असा नेटका प्रपंच करत असतानाच माणसाने परमार्थाचे रहस्य जाणून घ्यावे व मिळालेल्या मनुष्यदेहाचे सार्थक करायचा प्रयत्न करावा.
ज्याप्रमाणे नाण्याला छापा आणि काटा ह्या दोन्ही बाजू असतात त्याप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने माणसाच्या वाट्याला प्रपंच आणि परमार्थ एकाचवेळी येतात. जो ईश्वरस्मरणात राहून प्रपंचातील कर्तव्ये कोणतीही अपेक्षा न बाळगता करतो त्याने परमार्थ साधला असे सगळे संत सांगतात. समर्थ दासबोधात म्हणतात, प्रपंच आणि परमार्थ। जाणता तोचि समर्थ। नेणता जाणिजे वेर्थ। नि:कारण । जो ईश्वरस्मरणात प्रपंच करतो त्याचे ह्यालोकी आणि परलोकी भले होते हे जो जाणतो त्याला समर्थ जाणता म्हणतात. मात्र नेणत्याला प्रपंच आणि परमार्थाचे हे रहस्य माहित नसल्याने त्याचे मात्र आयुष्य व्यर्थ जाते. निरपेक्ष राहण्याचे महत्त्व माहित नसल्याने, तो प्रपंचातली कर्मे अपेक्षा ठेऊन करतो, त्यासाठी भलेबुरे मार्ग चोखाळतो आणि त्यातून पापपुण्याच्या राशी रचतो. त्यामुळे त्यांची फळे भोगण्यासाठी तो पुन: पुन: जन्म घेत राहतो.
आपल्या संस्कृतीने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत. ह्या चारीतील मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे, त्यालाच परमार्थ असे म्हणतात. मोक्ष मिळवण्याचा अधिकार स्त्राr व पुरुष ह्या दोघांनाही सारखाच आहे. ज्याला संतसंगती लाभते त्याला परमार्थ सुलभ होतो. त्यांच्या सांगण्यानुसार जे साधना करतात त्यांना जीव आणि ब्रह्म एकच असल्याची अनुभूती येते. परमार्थाने मनुष्यजीवन अर्थपूर्ण होते. तो भवसागर तरुन पुढे जाऊ शकतो. पुण्यकृत्य केल्याने केवळ स्वर्गलोकाची प्राप्ती होते पण मोक्ष मिळत नाही. आत्मज्ञान मिळवणे हे परमार्थ करण्याचे मुख्य उद्दिष्ट असते. ते ज्याला साध्य होते त्याला सायुज्य मुक्ती मिळून त्याचा आत्मा परमेश्वरात विलीन होत असल्याने त्याचे जन्म मरणाचे चक्र संपुष्टात येते. जीवनात परमेश्वराने नेमून दिलेले कर्म कोणत्याही अपेक्षेविना जो करतो तो परमार्थाचा अधिकारी होतो. निरपेक्षतेने कर्म केल्याने त्यातून पाप, पुण्याच्या राशी रचल्या जात नाहीत आणि त्याने केलेल्या मागील जन्मातील कर्मामुळे जे संचित जमा झालेले असते ते त्याला झालेल्या आत्मज्ञानाच्या धगीत जळून नष्ट होते. ह्या जन्मीचे भोग भोगून झाल्यावर त्याचे आयुष्य संपुष्टात येते. मागील संचित काहीही उरले नसल्याने त्याचा पुनर्जन्म होत नाही.
परमार्थसाधनेची सुरवात म्हणून माणसाने निरपेक्षता बाळगून कर्म करावे आणि मुखाने नामस्मरण करावे. नामाचे महत्त्व सांगताना समर्थ म्हणतात, नामे संकटे नासती । नामे विघ्ने निवारती। नामस्मरणे पाविजेती । उत्तम पदे।। जो हरिवर विश्वास ठेऊन नामस्मरण करतो त्याचा स्वभाव निरपेक्ष होत जातो. ज्या प्रमाणत निरपेक्षता त्याच्या अंगी बाणते त्या प्रमाणात त्याला स्वत:तील व इतरांच्यातील ईश्वर दिसू लागतो. असे समर्थ मनाच्या श्लोकात सांगतात. ते म्हणतात, करी काम निष्काम या राघवाचे । करी रुप स्वरुप सर्वां जिवांचे? करि छंद निर्द्वद्व हे गुण गातां । हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होतां? नामस्मरणाने साधकाचा स्वभाव जसजसा निरपेक्ष होत जातो तसतसे सद्गुरुंचे लक्ष त्याच्याकडे वेधले जाते. गूळ असेल तिथे मुंग्या आपणहून येतात त्याप्रमाणे प्रामाणिकपणे साधन करणाऱ्याकडे सद्गुरू स्वत:हुन येऊन उपदेश करतात. ह्याबद्दल पंचसमासी मध्ये समर्थ म्हणतात. सद्गुरूसी जातां शरण । शीघ्र तुटे जन्ममरण ।सर्व मनोरथ पूर्ण। शीघ्रहोती वचनमात्रे। अमृतवाणी मध्ये समर्थ म्हणतात, सद्गुरू हे कैवल्यदानी आहेत.
सद्गुरूभेट व्हावी म्हणून, प्रथम आपल्या आवडत्या दैवताच्या नामस्मरणाने सुरवात करावी मग सद्गुरू भेट झाल्यावर ते देतील त्या नामाचे नित्य स्मरण करावे. सद्गुरूंनी दिलेल्या नामाचा जप जो करतो त्याच्यामागे सद्गुरू उभे असतात. त्यांनी दिलेल्या नामात भगवंताची शक्ती असते आणि ती नाम घेणाऱ्याची शेवटपर्यंत सोबत करते. नाम घेत असताना सदाचरण कधी सोडू नये, नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत, निराश कधी होऊ नये, देहाला कधी कष्ट देऊ नयेत. कर्तव्याचे फळ प्रारब्धाधीन असल्याने जे फळ मिळेल त्यात समाधानाने रहावे. परमार्थ साधना करताना पाळावयाचे पथ्य म्हणजे परमात्म्याने जे जे दिले आहे, ते ते त्याचे म्हणून सांभाळावे आणि अर्थात त्याने ते आपल्याला केवळ वापरायला दिले आहे हे लक्षात घेऊन त्याच्या लोभात गुंतू नये. सर्व सूत्रे भगवंताच्या सत्तेने हलतात आणि तो करतो ते आपल्या भल्याचेच असते हे लक्षात ठेवले म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सुखाचे होतात. भगवंत कर्ते आहेत हे एकदा मान्य केले की, प्रपंचात पुढे काय होईल, कसे होईल ह्या विचारांनी सतत काळजी करणारा मनुष्य काळजीमुक्त होऊन निर्धास्त होतो. परमार्थसाधना अतिशय शांतपणे आणि प्रसन्न चित्ताने व्हावी म्हणून मनुष्याने कुणाचे मन दुखवू नये. मन ही भगवंताची विभूती आहे. त्यामुळे आपण कुणाचे मन दुखावले की, भगवंतांना दुखवल्यासारखे होते. अर्थात असे वागताना आपल्या संयमाची परीक्षा होत असल्याने आलेला राग गिळायला, लोकांचे कटू बोलणे सहन करायला शिकावे एव्हढेच नव्हे तर लोक जरी आपल्याशी अविचाराने वागले तरीही आपण नम्रपणे बोलावे. अर्थात ह्यासाठी श्रेष्ठ धारिष्ट्याची गरज आहे. समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावें? स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे। मना सर्व लोकांसि रे नीववावे ।।7।। सगळ्यांशी नम्रपणे बोलण्यात आपला अहंकार आडवा येतो. जो नाम घेतो त्याचा अहंकार विस्तवाजवळ ठेवलेल्या लोण्याप्रमाणे विरघळून जातो.
जय जय रघुवीर समर्थ
-विश्वनाथ छत्रे