सत्वगुण माणसाला विकाररहीत होण्यास सहाय्य करतो
अध्याय नववा
आपण माया आणि त्रिगुणांची माहिती गुणैस्त्रिभिरियं देहे बध्नाति पुरुषं दृढम्। यदा प्रकाशऽ शान्तिश्च वृद्धे सत्त्वं तदाधिकम् ।। 31 ।। ह्या सध्या अभ्यासत असलेल्या श्लोकातून घेत आहोत. त्यानुसार मायेने जीवाला देहाचे ठिकाणी बांधून ठेवलेले असते. जीव स्वत: अविनाशी असून त्रिगुणात बांधला जातो व अहंता आणि ममता वाढीला लागते. माणसाच्या मूळ स्वभावात रज आणि तम गुणाचे प्रमाण जास्त आणि सत्वगुण कमी प्रमाणात असतो. रज, तम गुणांच्या पकडीतून जीवाची सुटका होण्यासाठी ज्ञान आणि क्षमा यांची वाढ झाली की, सत्वगुणात वाढ होते.
माणसाला चांगले काय, वाईट काय हे कळण्याइतकी प्रगत बुद्धी ईश्वराने दिलेली आहे. त्यामुळे मनुष्य जन्मातच माणसाला स्वत:चा उध्दार करून घेणे शक्य आहे. त्यासाठी सत्वगुणाचे प्रमाण त्याच्या स्वभावात वाढणे आवश्यक आहे. ते होण्यासाठी माणसाने ईश्वरभक्ती करून, स्वत:ला ईश्वराला समर्पित करावे म्हणजे विकारांची मात्र त्याच्यावर चालणार नाही. असे केल्याने वाढलेल्या सत्वगुणामुळे त्याला शांती प्राप्त होते. तिन्ही गुणांमध्ये सत्वगुण मलरहीत आहे. तो ज्ञानवर्धक आहे त्यामुळे वाढलेल्या ज्ञानाच्या प्रकाशात आत्मोद्धाराचा मार्ग स्पष्ट दिसतो. त्याचबरोबर रजोगुण व तमोगुण यांच्यापासून उत्पन्न होणारे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ हे षड्रिपु व त्यामुळे होणारे नुकसान यांची स्पष्ट जाणीव होते. सत्वगुणाची वाढ झाल्याने इंद्रियांना चेतना, प्रकाश आणि हलकेपणा विशेषत्वाने जाणवतो. त्यामुळे आकलनात वाढ होऊन पारमार्थिक व लौकिक बाबी लवकर समजून घेण्यासाठी बुद्धी पूर्णतया काम करते आणि कार्य करण्यास मोठा उत्साह वाटतो.
सत्वगुण माणसाला विकाररहीत होण्यास सहाय्य करतो. सत्वगुणी माणसाची वृत्ती सात्विक असते. त्यामुळे तो सुखशांतीचा धनी होतो. हळूहळू त्याच्या मनात असे विचार येतात की, असे सुख, अशी शांती नेहमी मिळावी. अशीच निर्विकारता कायम असावी. कारण जेव्हा सुखशांती, निर्विकारता नसते तेव्हा तो अस्वस्थ असतो. हे हवे नको वाटणे यालाच आसक्ती म्हणतात आणि आसक्तीमुळे सत्वगुणी मनुष्यसुद्धा बंधनात अडकतो. तसेच सत्वगुणामुळे त्रिगुणांचे ज्ञान होते. त्यामुळे पूर्वी कधीही लक्षात न आलेल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी समजतात.
सत्वगुणी माणसाला आत्म्याचा प्रकाश स्पष्ट दिसत असतो. त्यामुळे त्याची ब्रह्मप्राप्तीच्या दिशेने वाटचाल सुरु होते. भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायात ह्याबाबत असे सांगितले आहे की, प्रकाश स्थिरता सौख्य अंतरी लाभली जया । ब्रम्ह होऊनि तो योगी ब्रम्ह-निर्वाण मेळवी ।। 24 ।। त्याच्या सर्व शंका फिटलेल्या असल्याने त्याचे मन त्याच्या ताब्यात असते. त्याने सर्व इच्छा सोडलेल्या असतात. त्याने मन आणि बुद्धी ईश्वराला अर्पण केलेली असते. त्यामुळे त्याने इच्छा, भय आणि क्रोध ह्यावर नियंत्रण मिळवलेले असते. ह्या सर्व साधनेमुळे त्यांची संसार बंधनातून सुटका होते.
सत्वगुणाची शुद्ध आणि मलीन अशी दोन रूपे आहेत. शुद्ध सत्वगुणामध्ये परमात्म्याकडे वाटचाल करण्याची स्वाभाविक आवड असते तर मलिन सत्वगुणात पदार्थांचा संग्रह व सुखोपभोगांचा उद्देश असल्याने संसारिक प्रवृत्तीची आवड असते. यात मनुष्य बांधला जातो पण तो सत्वगुणी असल्याने त्याची बुद्धी लौकिक अभ्यासातील विषय समजून घेण्यात पारंगत असते. उदाहरणार्थ सत्वगुणी शास्त्रज्ञ लोककल्याण साधण्यासाठी निरनिराळे शोध लावतात परंतु त्यांचा उद्देश परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याचा नसल्याने ते अहंकार, मान सन्मान, धन इत्यादींमुळे संसार बंधनात अडकतात.
क्रमश: