सत्वगुण माणसाचा अहंकार वाढवू शकतो
अध्याय नववा
सध्या आपण गुणैस्त्रिभिरियं देहे बध्नाति पुरुषं दृढम्। यदा प्रकाशऽ शान्तिश्च वृद्धे सत्त्वं तदाधिकम् ।। 31।। ह्या श्लोकाचा अभ्यास करत आहोत. त्यानुसार मायेने जीवाला देहाचे ठिकाणी बांधून ठेवलेले असते. त्यातून त्याची सुटका होण्यासाठी त्याच्या मन:शांतीत वाढ होणे आवश्यक असते. माया किंवा प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. पंचमहाभूतांनी तयार केलेल्या देहात ईश्वर आत्म्याच्या रूपाने वास करत असतो. मायेमुळे त्याला जीवपण प्राप्त होते आणि तो जीव मायेच्या तालावर नाचू लागतो. स्वत:ला कर्ता समजू लागतो आणि जीवनातील सर्व सुखदु:खाना स्वत:ला जबाबदार मानू लागतो. हा सर्व खेळ सत्व, रज आणि तम या त्रिगुणांचा असतो. लहानपणी हे त्रिगुणसारख्या प्रमाणात कार्य करत असतात, त्यामुळे लहान मुले निरागस असतात. तेव्हढ्यापुरता हट्ट करतात, मित्रांशी भांडण करतात आणि चटकन विसरून जातात. त्यांच्या मनात कुणाबद्दल आकस नसतो पण मनुष्य जसजसा मोठा होत जातो तसतशी त्याला अनेक गोष्टी आपल्याकडे असाव्यात अशी आस लागून राहते. पुढे या आशेचे रूपांतर हव्यासात होते. म्हणजे त्या गोष्टी हव्यातच असं वाटू लागतं आणि नंतर त्या गोष्टी मिळवण्याचा त्याला ध्यासच लागतो. म्हणजे त्या गोष्टींचा त्याला लोभ सुटतो. हे सर्व घडत असताना सत्वगुण दुबळा होऊन रज आणि नंतर तमोगुण जोर करतात आणि मनुष्य ईश्वरापासून दूर जातो. माणसाला केलेल्या कर्माची फळे भोगावी लागतात. ती भोगण्यासाठी पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनं असा क्रम चालूच राहतो. हे ओळखून ते टाळण्यासाठी माणसाने सत्वगुणाची वाढ केली तर रज व तम गुण हळूहळू निष्प्रभ होऊ लागतात. म्हणून बाप्पा सांगतायत की, माणसाने ज्ञान आणि क्षमा यांची वाढ करावी म्हणजे सत्वगुणाची वाढ होते. सत्व म्हणजे सद्भाव, शुद्धता, निर्मलता, चांगुलपणा होय. ज्याच्यात सत्वगुणाचे प्राबल्य असते तो शरीराने, मनाने आणि स्वभावाने अत्यंत निर्मळ असतो. तो समाधानी असल्याने त्याच्या कार्यात तो अत्यंत कुशल असतो. फसव्या गोष्टींच्या नादात त्याला कधी वाकड्या वाटेने जावे लागत नाही पण चांगल्या वाटेतही खाच खळगे असतात. सत्वगुणाची वाढ करू इच्छिणाऱ्याने तेही लक्षात ठेवले पाहिजेत ते कोणते ते पाहू.
सत्वगुणाचे महत्त्व लक्षात घेऊन बाप्पांच्या सांगण्याबरहुकूम माणूस स्वत:च्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावून ज्ञान वाढवू लागला की, त्याला बऱ्याच गोष्टी नव्याने कळत जातात आणि आपण आता ज्ञानी झालो असून अपल्याएव्हढी कुणालाच माहिती नाही, माझ्यासारखा सुखी आणि ज्ञानी मीच अशी अभिमानाची बेडी त्याच्या पायात त्याची तोच अडकवून घेतो. कसे ते पाहू. सत्वगुणाच्या वाढीतून त्याच्या हातून लोककल्याणकारी कार्ये होऊ लागतात, त्यातून त्याची मानसन्मानाची अपेक्षा वाढू लागते. ज्ञानामुळे सत्वगुण वाढतो खरा पण त्याचा उपयोग ईश्वरप्राप्तीसाठी न केल्यामुळे अहंकार वाढून मनुष्य वाया जाण्याची शक्यता असते. हा मलिन सत्वगुण होय. याउलट जो मनुष्य सत्वगुण वाढवून त्याचा उपयोग ईश्वरप्राप्तीसाठी करेल त्याला शुद्ध सत्वगुणी म्हणता येईल. सत्वगुणापासून सुख आणि ज्ञान प्राप्त झाल्यास माणसाने सावध होऊन सुख आणि ज्ञान मिळवणे हे माझे ध्येय नसून ती ईश्वरप्राप्तीसाठी साधने आहेत हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे. रेल्वेच्या प्रवासात एखादी आवडीची गोष्ट एखाद्या मधल्या स्टेशनवर मिळत असेल तर मनुष्य त्या गोष्टीच्या किती मागे लागेल तर त्याची गाडी सुटण्याची वेळ होईस्तोवर, एकदा वेळ झाली की, निमूटपणे गाडीत येऊन बसेल, त्याप्रमाणे सत्वगुण वाढवण्याच्या नादात त्याने ईश्वरप्राप्ती हा मूळ ध्येयविषय विसरू नये.
क्रमश: