आभासी जगाचा विळखा .......
आपल्याला वास्तव जीवनात एकही मित्र नसला तरी चालेल पण फेसबुकवर मित्र पाहिजेत. वास्तव जीवनात आपल्याला कोणीही चांगले बोलले नाही तरी चालेल, पण सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट्स भरपूर आल्या पाहिजेत. या आभासी जगामुळे पिढीच्यापिढी बरबाद होण्याच्या वाटेवर आहे. याला वेळीच आवर घातला पाहिजे.
भारतामध्ये इंटरनेट 15 ऑगस्ट 1995 मध्ये आले. फेसबुक 26 सप्टेंबर 2006 आणि व्हॉट्सअप नोव्हेंबर 2009 मध्ये आले. भारतामध्ये पसरायला त्याला 2-3 वर्षे लागली. 2010 पासून आभासी जगाला सूरुवात झाली. 2010 पूर्वीचा समाज आणि 2010 नंतरचा समाज त्यांच्या जीवनमानात बराच फरक पडला आहे. 2010 पूर्वीची लहान मुले, तरुण वर्ग मैदानावर असायचे, प्रौढ एकमेकांशी गप्पा मारायचे, एकमेकांना भेटायचे. पण 2020 नंतर लहान मुले, तरुण वर्ग मैदानावर दिसेनाशी झालीत. 1-2 वर्षाच्या लहान बाळाला मोबाइलची काहीच माहिती नसते. पण बाळ रडत असेल तर त्याला मोबाइलवर कार्टून लावून दिले जाते. काही काम करायचे तर लहान मुलाच्या हातात मोबाइल दिला जातो. शाळेत इतके इतके टक्के गुण मिळवले तर मोबाईल देण्याची भाषा पालकांकडून सर्रास वापरली जाते आणि एकदा का हातामध्ये मोबाइल आला की, त्याचा कसा वापर करायचा यावर कुणाचेच बंधन राहात नाही. म्हणजे लहान मुलाला आभासी जगामध्ये त्यांचे पालकच ढकलतात. मोबाईल लहान मुलाकडे देताना त्याच्यावर लक्ष ठेवणे काळाची गरज आहे. सध्याच्या जगातील हे आभासी वास्तव समजून घेतले, तर अनेक समस्या, प्रश्न समोर येत आहेत.
मोबाईल गेम: इंटरनेट आणि मोबाइल गेमच्या विळख्याचे व्यसन हा एक मनोविकार होऊ पाहात आहे. या विळख्याची चिंता व्यापक आहे. मोबाईल गेमच्या माध्यमातून माणसाच्या मनाचा ताबा घेतला जातो आणि त्याला वास्तवाच्या जगातून दूर ढकलले जाते. मोबाइल गेमच्या नादात 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच हवेली तालुक्यातील पेरणेफाता येथे घडली, ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ गेम हे याचे उदाहरण आहे. मोबाईल न दिल्यामुळे मारहाणीचे प्रकारही काही कमी नाहीत.
खोटे प्रोफाईल बनवून फसवणूक: अलीकडे काही विशिष्ट प्रकारच्या गुह्यामध्ये वाढ झाली आहे. ती म्हणजे अपहरण किंवा बलात्कार. यामध्येही असे लक्षात आले आहे की, फेसबुकवरील ओळखीमुळे प्रत्यक्ष भेट ठरते आणि नंतर ती व्यक्ती वेगळीच असते..... त्यामुळे कुणीतरी त्या आभासी जगाची बळी ठरते. म्हणून आता मुंबई पोलिसांनी ही ‘हर एक फ्रेंड जरुरी नही होता’ या आशयाची जाहिरात करून अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात सोशल मीडियावर राहू नका, असे सांगण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आपला स्वत:चा जीव अनमोल आहे. तो जपणे महत्त्वाचे आहे.
नैराश्य: सेल्फीशिवायचे वास्तव आयुष्य खूप वेगळे आणि चांगले आहे. केवळ आभासी लाईक्स आणि फेव्हरिट म्हणजे आयुष्य असा गैरसमज करून घेतला तर पुढे प्रत्यक्ष आयुष्यात नैराश्याला सामोरे जावे लागेल. ते टाळण्यासाठी वेळीच समजून घ्या, हा आभास आहे, वास्तव नाही! व्यक्ती संकुचित बनत चालली आहे का, आयुष्याविषयीचे आभासी चित्र चुकीच्या पद्धतीने रंगवले जात आहे का, नैराश्य वाढत चालले आहे का, द्वेषभाव वाढत चालला आहे का, आभासी जगामुळे किशोरवयीन मुले स्वत:ची निर्णयक्षमता हरवून बसतात किंवा डिसिजन पॅरालिसिसची शिकार ठरतात.
या आभासी जगातून लहान मुलांना बाहेर काढावेच लागेल. वयाच्या 14 वर्षांपर्यंत लहान मुलांची पाटी कोरी असते. या वयात मुलांवर केलेले संस्कार हे लवकर होतात आणि कायमस्वरूपी टिकतात. त्यामुळे या वयातच त्यांच्यावर संस्कार करताना वास्तव जग आणि आभासी जग ह्यातील फरक दैनंदिन जीवनातील घटनांमधून समजावून सांगा. मुद्दामहून त्यांना शिकवायला जाल तर ते शिकणार नाहीत. तसेच त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात गुंतवा मग तो कुठलाही खेळ असेल किंवा कला आणि आवडीच्या विषयामध्ये त्यांना झोकून देऊन काम करायला सांगा. त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. लहान मुलांशी संवाद वाढवा, कितीही व्यस्त असाल तरी त्यांच्यासाठी थोडा वेळ काढा, त्यांच्यासोबत मैदानावर खेळा, आऊटडोर-इनडोर गेम त्यांच्या सोबत खेळा. अर्थात, हे घडविणे आताच्या टप्प्यावर सोपे नाही, अवघड असले तरी अशक्य नाही आणि त्याला दुसरा पर्यायही नाही! मग बघा 2010 च्या पूर्वीसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होईल. वास्तव जगाला ‘आभासी’ जगाचा विळखा बसणार नाही, तर उलट तरुण पिढी आभासी जगाचा हुशारीने आपल्या फायद्यासाठी वापर कारायला शिकेल आणि स्वत:च्या जीवनाचा, समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास करायला शिकेल.
-डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी