‘बाटल्यां’चे गाव...
आपल्या देशातील प्रत्येक शहराच्या किंवा गावाच्या आपल्या स्वत:च्या अशा काही विशिष्ट समजुती किंवा श्रद्धा असतात, ही माहिती बहुतेकांना आहे. प्रत्येक गावाची किंवा स्थानाची एक आगळीवेगळी परंपरा असते. या परंपरांच्या तर्कशास्त्रात न जाता या गावातील लोक त्यांचे मनोभावे आणि पिढ्यान्पिढ्या पालन करीत असतात. अशा परंपरा समस्यानिवारक असतात अशीही समजूत असते आणि त्यामुळे त्यांचे पालन कसोशीने करण्याचा प्रयत्न केला जातो.
पंजाबमधील बरनाला जिल्ह्याच्या एक वस्ती अशी आहे, की तेथील एक परंपरा सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. या वस्तीतील प्रत्येक घराच्या समोरच्या भिंतीवर दरवाजाजवळ दोरीला बांधलेली एक प्लॅस्टिक किंवा काचेची बाटली आढळते. ही बाटली निळ्या रंगाची असून तिच्यात एक द्रवपदार्थ भरलेला असतो. अशी बाटली टांगलेली नसलेले एकही घर या वस्तीत नाही. त्यामुळे अन्य गावांहून येथे येणाऱ्या लोकांना या परंपरेचे आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. या गावात अन्य राज्यातून आलेल्या काही युवकांनी या प्रथेसंबंधी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना असे समजले की, ही प्रथा धार्मिक नाही. तर या गावात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी आहे. हे कुत्रे घराजवळ येऊ नयेत म्हणून बाटली टांगलेली असते. निळ्या रंगाच्या वस्तूच्या जवळ कुत्रे येत नाहीत, ही समजूत या प्रथेचा आधार आहे. त्यामुळे ‘नीळ’ हा पदार्थ पाण्यात विरघळवून तो द्रव पारदर्शक बाटल्यांमध्ये भरुन ती घराबाहेर टांगली जाते. ‘बाटली’चा हा असाही उपयोग खरोखरच थक्क करणारा आहे, अशी प्रतिक्रिया बाहेरचे लोक व्यक्त करतात.
‘