विक्रमवीर मोदी
जून 2026 हा दिवस भारतीय राजकारणाच्या इतिहासात विशेष नोंदला जाईल. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 4,399 दिवस पंतप्रधानपदावर राहून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 4,398 दिवसांचा विक्रम मागे टाकतील आणि देशाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपद भूषविणारे नेते ठरतील. 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतलेल्या मोदी यांनी बारा वर्षांचा टप्पा पूर्ण करताना भारतीय राजकारणात एक वेगळे पर्व निर्माण केले आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या दोन नेत्यांच्या दीर्घ कार्यकाळांनी राजकीय इतिहासाला दिशा दिली. 1947 ते 1952 हा पहिला कार्यकाळ वगळता निवडणूक जिंकून नेहरूंनी 13 मे 1952 ते 27 मे 1964 या कालावधीत सलग 12 वर्षे देशाचे नेतृत्व केले. त्यांचा 4,398 दिवसांचा विक्रम तब्बल सहा दशकांहून अधिक काळ अबाधित राहिला. इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 या काळात सलग 4,077 दिवस पंतप्रधानपद भूषविले. जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधींचा विक्रम मागे टाकला आणि आता नेहरूंचाही विक्रम मोडून ते नव्या शिखरावर पोहोचत आहेत. हा विक्रम केवळ दिवसांच्या गणितापुरता मर्यादित नाही. लोकशाही व्यवस्थेत सलग तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनतेचा कौल मिळवणे, राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व टिकवून ठेवणे आणि बदलत्या राजकीय परिस्थितीत स्वत:ची लोकप्रियता कायम राखणे हे कोणत्याही नेत्यासाठी मोठे आव्हान असते. मोदी यांनी ते साध्य केले. काँग्रेसव्यतिरिक्त पूर्ण बहुमतासह सलग दोन सरकारांचे नेतृत्व करणारे ते पहिले पंतप्रधान ठरले. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांचा एकत्रित प्रशासकीय अनुभव 8,900 दिवसांहून अधिक आहे, हीदेखील उल्लेखनीय बाब आहे. मोदी यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत भारतात पायाभूत सुविधांच्या विस्ताराला गती मिळाली. महामार्ग, रेल्वे, विमानतळ, डिजिटल व्यवहार, थेट लाभ हस्तांतरण, घरकुल योजना, स्वच्छता अभियान आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासन यांसारख्या उपक्रमांनी शासन व्यवस्थेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. भारताची जागतिक प्रतिमा उंचावण्यावरही विशेष भर देण्यात आला. अमेरिका, युरोप, मध्यपूर्व आणि आशियातील देशांशी वाढलेले संबंध, जागतिक परिषदांमधील भारताची वाढती भूमिका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सक्रिय उपस्थिती यामुळे भारताचा प्रभाव विस्तारल्याचा दावा समर्थक करतात. जागतिक राजकारणातही दीर्घकाळ प्रभावी नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची उदाहरणे आढळतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांनी महामंदी आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेतृत्व केले. ब्रिटनच्या मार्गारेट थॅचर यांनी आर्थिक सुधारणांचा नवा अध्याय लिहिला. सिंगापूरचे ली कुआन यू यांनी एका छोट्या राष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्रात रूपांतरित केले. या नेत्यांप्रमाणेच नरेंद्र मोदी यांनीही विकास, राष्ट्रवाद आणि प्रभावी नेतृत्व यांचे मिश्रण भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. मोदी यांच्या यशामागील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांची लोकप्रियता. देशातील विविध सामाजिक घटकांशी थेट संवाद साधण्याची क्षमता, निवडणुकांमधील प्रभावी प्रचारशैली आणि सरकारी योजनांचे राजकीय समर्थनात रूपांतर करण्याचे कौशल्य यामुळे त्यांनी स्वत:ची वेगळी राजकीय ओळख निर्माण केली. त्यांच्या अनेक निर्णयांना मिळालेले जनसमर्थन मतदानपेटीतही दिसून आले आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सलग निवडणूक विजय मिळाले. परंतु कोणत्याही दीर्घ सत्ताकाळाप्रमाणे मोदी सरकारचाही प्रवास वादमुक्त राहिलेला नाही. नोटाबंदी, कृषी कायदे, बेरोजगारी, महागाई, सामाजिक ध्रुवीकरण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संस्थांच्या स्वायत्ततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले. विरोधी पक्षांनी सत्तेचे केंद्रीकरण आणि लोकशाही संस्थांवरील प्रभावाबाबत सातत्याने टीका केली. खरे तर मोदी यांच्या बारा वर्षांच्या कारभाराने भारतीय राजकारणाची भाषा आणि स्वरूप बदलले. विकास, राष्ट्रीय अस्मिता, डिजिटल प्रशासन, कल्याणकारी योजना आणि व्यक्तिकेंद्रित नेतृत्व यांचा संगम त्यांनी घडवून आणला. समर्थकांच्या दृष्टीने ते परिवर्तनाचे शिल्पकार आहेत; तर टीकाकारांच्या मते ते सत्तेचे अभूतपूर्व केंद्रीकरण करणारे नेते आहेत. इतिहासाचा अंतिम निर्णय भविष्यातील पिढ्या देतील. मात्र एवढे निश्चित 10 जून 2026 रोजी नोंदविला जाणारा हा विक्रम केवळ एका व्यक्तीच्या राजकीय यशाचा नाही, तर भारतीय लोकशाहीतील एका महत्त्वपूर्ण युगाची नोंद आहे.